पहिली प्रतिक्रिया पुणेकरांची…
श्री. सतीश नाईक, 8
ऑक्टोबर, 2013
संपादक "चिह्न', ठाणे.
,सप्रेम नमस्कार
"चिह्न'चा यत्न-प्रयत्न विशेषांक बऱ्याच प्रतीक्षेनंतर हातात पडला. अंक पाहिल्यावर तुम्ही किती कष्ट घेतले असतील याची कल्पना आली. या अंकाविषयी माझी स्वत:ची काही मते काही जाणिवा आपल्याला कळवाव्यात यासाठी हे पत्र लिहित आहे. मी काही साहित्य-समीक्षक, कला-समीक्षक किंवा चित्रकारही नाही. तथापि चित्रकलेविषयी आपुलकी असणारा एक सर्वसामान्य माणूस आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माझे हे पत्र वाचावे ही विनंती.
संपादकीयापासून हा अंक एका ठाय लयीत सुरु झाला आहे. "यत्न-प्रयत्न' शीर्षकाचे भान ठेवून लेखांची योजना आपण केली आहे. संपादकीयामधे तुमची मते तुम्ही ठामपणे पण ऋजू भाषेत मांडली आहेत त्या बद्दल अभिनंदन! कोणताही अभिनिवेश न आणताही तुम्ही तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणून गेला आहात.
सुबोध केरकरांच्या मुलाखतीवरून "गोंयचो सिंदबाद' हा शर्मिला फडके यांनी लिहिलेल्या लेखापासून सुरुवात झाली आहे. मी वर ठाय लयीचा उल्लेख केला तो हा लेख मनात धरूनच. दीर्घ आणि संथ असा हा लेख आहे. एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण आलेखच लेखिकेने मांडला आहे आणि श्री. सुबोध केरकरांची संपूर्ण कारकीर्द आणण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत असे मला वाटते. तथापि हा लेख बऱ्यापैकी दीर्घ आहे, आणि काहीवेळा द्विरुक्ती ही झाली आहे. काही गोष्टींचा संक्षेप करून हा लेख अजून ठीकठाक झाला असता. तरीही यात लेखनाची लय खूपच चांगली पकडली आहे. सुंदर लेख! वाचताना चित्रकला या कलेमध्ये किती नवीन प्रवाह आहेत याची कल्पना आली. आणि खरे सांगायचे तर सर्वसामान्यांना "इन्स्टॉलेशन' हा प्रकारच माहित नाही किंवा त्यामागे सौंदर्याची कोणती जाणीव असते, कष्ट असतात, नियोजन असते हे माहीत नाही. मला स्वत:ला तर हा प्रकार माहीतच नव्हता. खरे तर या प्रकारावर एक संपूर्ण स्वतंत्र लेख होऊ शकेल. तुम्ही विचार करण्यास हरकत नाही.
श्री. प्रभाकर कोलते यांनी वासुदेव गायतोंडेंवर लिहिलेला लेखही अप्रतिम आहे. स्मरणरंजनात्मक पैलू या लेखाला आहे. गायतोंडे हे काय प्रकरण आहे याची थोडीशी झलक दिसते. अर्थात श्री. प्रभाकर कोलते यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकाराने संयत शब्दात-जी त्यांची खासियतच आहे- हा लेख लिहिला आहे. हा लेख संक्षिप्त आहे. तो संपूर्णपणे वाचायला आवडेल.
या अंकातील सर्व लेखांमधे मला अशोक राणे यांनी लिहिलेला श्री. मूर्ती यांच्यावरचा "अमर चित्र-कथा' लेख सर्वात जास्त आवडला, अंत:करणाला भिडला. कॅमेऱ्यासारख्या निर्जीव यंत्रातून मूर्तींनी जी जिवंत कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली त्याला खरोखरच तोड नाही. मी स्वत: गुरुदत्त-आणि-मूर्ती या द्वयीचे सर्व चित्रपट पाहिलेले आहेत. ते पाहूनही आता बरीच वर्षे लोटली. तथापि ते मनावर कोरले गेलेले चित्रपट आहेत. काव्यमय आहेत. हा लेख वाचून ज्या गोष्टींची जाणीव अद्याप झाली नव्हती ती जाणीव विजेसारखी मनाला स्पर्शून गेली.
एका अनोख्या दृष्टिकोनाचा साक्षात्कार लेख वाचल्यावर झाला आणि अक्षरश: मन भरून आले आणि संपूर्ण दिवस त्याच अवस्थेत गेला. त्यानंतर मी त्यादिवशी पुढील कोणतेही लेख वाचू शकलो नाही. यावरूनच या लेखाने मी किती भारलो गेलोय त्याची कल्पना येईल.या लेखाबद्दल लिहायला माझ्याकडे शब्द नाहीत.
त्यानंतर अधुरे स्वप्न, लक्ष्मण श्रेष्ठ, स्मरणगाथा, यशवंत चित्र हे लेख येतात. हे ही स्मरणरंजनात्मक लेख आहेत. सुदैव म्हणजे चित्रकारांसंबंधी आहेत. त्यातील सर्व चित्रकारांची ओझरती ओळख झाली. त्यापैकी लक्ष्मण श्रेष्ठ यांच्याबद्दल काहीच माहित नव्हते. कारण चित्रकला किंवा चित्रकार यांच्याविषयी लिहिण्याची परंपराच नाही. (आता "चिह्न' ने ती कमतरता भरून काढली आहे हे खरेच!) त्यामुळे या चित्रकारांबाबत चित्रवर्तुळाबाहेर इतरांना काही माहिती असण्याचे कारण नाही.
श्री. श्याम भुतकर यांनी लिहिलेला लेख ठीक आहे. तथापि चित्रकले बाबत काहीच अन्वय नाही. जक्कलची मानसिक घडण त्याच्या चित्रातून दिसत होती का? त्याबाबत भुतकर जक्कलच्या एवढ्या जवळ असूनही त्यांना काही जाणवले होते का याबाबत लिहिलेले नाही ते लिहिले असते तर लेख अजून उठावदार झाला असता. पुण्यातील त्या भयंकर दिवसांची आठवण जागी करून पुनर्प्रत्ययाची जाणीव या लेखाने झाली हे निश्र्चित.
एक डाव पावसाचा या लेखाबाबत लिहायचे तर एका माणसाने निसर्गाशी केलेल्या दोन हाताचे वर्णन असेच करावे लागेल. आणि विशेष हे की हे सर्व करूनही श्री. कदम यांनी कुठेही "चमको' गिरी त्या प्रसंगानंतर केली नाही. नाहि चिरा नाही पणती या व्याख्येतील जे लोक असतात त्यापैकी श्री. निकम हे एक आहेत. ना मान, ना सन्मान, ना पुरस्कार ना दखल. दुसऱ्यांच्या व्यथा कॅश करून चॅनेलवर दाखवणारे तथाकथित पुरोगामी, सामाजिक जाणीव असलेले चॅनेलश्रेष्ठ यांनीही दखल घेतली नाही हे खूपच वेदनादायक आहे. चिह्न ला धन्यवाद!
आता विशेष विभाग. अतिशय जबरदस्त! एका अस्पृश्य आणि वाळीत टाकलेल्या विषयाबाबत अनुपम धैर्य दाखवून ज्या चित्रकत्रींनी प्रयोग केले त्याबद्दल हॅट्स् ऑफ! या सर्व गोष्टींना खरोखरीच धैर्य लागते.
शुभा गोखले काय, विक्रम बावा काय, कोणी अनामिका काय या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे. संतोष मोरे आणि नितिन दादरावाला यांचेही लेख असेच अपूर्व. या विभागाबाबत काय बोलावे?
हे सर्व लेखन मला या अंकातील लेखाबाबत काय आवडते याबाबत आहे. अंकाची मांडणी सर्व व्यावसायिकांनी केलेली असल्याने त्यात न्यून काहीच जाणवले नाही. हां, एका बाबतीत मात्र लक्ष देणे जरूर आहे. सादरीकरण जसे सौंदर्यपूर्ण हवे तसेच भाषेबाबतही आहे. भाषा शुद्ध असणे हे आवश्यकच आहे. काही ठिकाणी भाषेच्याबाबतीत काही दोष आहेत तसेच ते मांडणी करताना झालेल्या शब्दांच्या मोडतोडीचे आहेत. ओळ जेव्हा कॉलमच्या शेवटी येते तेव्हा काही ठिकाणचे अक्षर व त्या अक्षराचे काने, मात्रे हे स्वतंत्रपणे खालील ओळीत आहेत. कदाचित हा सॉफ्टवेअरचाही दोष असू शकेल. पण खटकले हे खरेच.
अमूर्त चित्र कसे पहायचे, कसे समजून घ्यायचे व शेवटी त्याचा आनंद कसा घ्यायचा या बाबत काही प्रयत्न झाले आहेत का? आणि असतील तर पुढील काही अंकात त्यावर लेख असतील का? कारण माझ्यासारख्याला जर माझ्या चित्रकलेविषयी जाणिवा अजून समृद्ध करायच्या असतील तर अशा लेखांचा उपयोग निश्र्चित होऊ शकेल व त्यानंतर अमूर्त चित्रे पाहताना अधिक रसास्वाद घेणे शक्य होईल असे वाटते.
असो! माझे हे पत्र फारच लांबले आहे. पुढील अंकांची आतुरतेने वाट पहात आहे.
आपला स्नेहाभिलाषि,
माधव अच्युत शाळिग्राम
माधव शाळिग्राम,
69/8, स्नेह सोसायटी,
रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे-411038. madhav.shaligram@yahoo.in
चिन्ह ची वेबसाईट उघडत नाहीये.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGlad to read the detailed feed back.
ReplyDeleteAll credit goes to Satish Naik.
ReplyDeleteTHANK YOU SIR