Monday, February 28, 2011



फक्त १०० दिवसांत 
नाबाद २,००,००० (हिट्स)!

२४ वर्षांपूर्वी ‘चिन्ह’ सुरू करताना ते एक उत्कृष्ट दर्जाचं ‘आर्ट मॅगझिन’ म्हणून प्रसिद्धीला यावं हेच प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं. त्यावेळी संगणक आपल्याकडे नुकताच येऊन स्थिरावला होता. इंटरनेट, संकेतस्थळ, ब्लॉग, फेसबुक वगैरेंचा शोध लागायचा होता. त्यामुळे उद्दिष्ट खूपच मर्यादित होतं. पण तरीसुद्धा ते गाठता गाठता रौप्यमहोत्सवी वर्षं कधी जवळ येऊन ठेपलं काही कळलंच नाही. आता मात्र ‘चिन्ह’चं एक परिपूर्ण “आर्ट मॅगझिन” प्रसिद्ध करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात यायला फक्त थोड्याच दिवसांचा अवधी उरला आहे.

दरम्यानच्या काळामध्ये जागतिकीकरण झालं आणि संगणक क्रांती अवतरली. पाठोपाठ आलेल्या, संपर्क आणि दळणवळणाच्या तसंच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीनं तर मुद्रित माध्यमांचं स्वरूपच पालटून टाकलं. ‘चिन्ह’चं या उलाढालींकडे बारकाईनं लक्ष होतं. (२४ वर्षांपूर्वी पहिला अंक प्रसिद्ध करताना ‘चिन्ह’नं चक्क मराठी टाईपरायटरचा वापर केला होता.) म्हणूनच ‘चिन्ह’नं माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात अवतरलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं.

www.chinha.in या संकेतस्थळाची निर्मिती हे पहिलं पाऊल होतं. संकेतस्थळ म्हणजे काय? ते कशाशी खातात? याचं जुजबी ज्ञान नसतानाही संकेतस्थळाच्या कामाला सुरूवात झाली. सहा – सात महिने त्यातच गेले. पण त्याची कारणं वेगळी होती. (त्याविषयी कधीतरी सविस्तर लिहायचं आहेच.) १५ नोव्हेंबर २०१० रोजी ‘चिन्ह’चं संकेतस्थळ रीतसर सुरू झालं. ते काम पूर्ण झाल्यावर नवीन अंकाच्या कामास सुरूवात करायची असं आधी ठरलं होतं. त्याप्रमाणे संकेतस्थळाचं काम पूर्ण होताच संबंधित सर्वांनीच सहा – सात महिन्यानंतर पहिल्यांदाच दोन तीन दिवसांची छान रजा घेतली आणि ‘चिन्ह’च्या आगामी अंकाच्या कामाला हात घातला. पण इथं तर काही भलतंच घडून गेलं होतं.
कुठलीही जाहिरात नाही, कुठल्याही वृत्तपत्रात बातमी नाही, कुठलीही संपर्क मोहिम नाही अशी सगळी परिस्थिती असताना पहिल्याच दिवशी ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला एक नाही, दोन नाही तब्बल ५००० हिट्स मिळाल्या होत्या; त्याही फक्त मुंबई अथवा महाराष्ट्रातून किंवा फक्त भारतातून नाही तर संपूर्ण जगभरातून आल्या होत्या. विश्वास बसू नये अशी सारी परिस्थिती होती.

आपल्याला यातलं तांत्रिक ज्ञान नसल्यानं आपला काही गैरसमज झालाय की काय असंही वाटू लागलं होतं. संकेतस्थळाशी संबंधित सारेच अक्षरश: चकरावून गेले होते. म्हणून मग संकेतस्थळ तज्ज्ञांशी फोनाफोनी सुरू झाली, विचारणा सुरू झाल्या. ‘हिट्स’ म्हणजे काय?, व्हिझिट्स म्हणजे काय? वगैरे माहिती घेणं सुरू झालं, एका तज्ज्ञाच्या मतावर विश्वास बसेना म्हणून दुसर्‍याला विचारणं सुरू झालं. त्या दिवशी ज्या ज्या तज्ज्ञांना आम्ही गाठलं त्या त्या तज्ज्ञांचं एकच उत्तर होतं “तुम्हाला पहिल्या दिवशीच ५००० हिट्स मिळाल्या आहेत.” त्यांच्या प्रत्येक उत्तरागणिक आम्हाला नवनवीन ज्ञानही मिळत होतं आणि आश्चर्याचे प्रचंड धक्केही बसत होते. कधीच विसरता येणार नाही असा तो अनुभव होता.

दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच घडलं. तिसर्‍या दिवशीही तेच झालं. चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशीही तेच घडलं. फरक इतकाच होता चौथ्या दिवशी ती संख्या ५००० वरून थेट ९००० पर्यंत पोहोचली. इतकंच नाही तर चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संकेतस्थळ चक्क बंद पडलं. सारे अक्षरश: हवालदिल. चौकशी केल्यावर असं कळलं ‘चिन्ह’चं संकेतस्थळ पाहण्यासाठी आंतरजालावर असंख्य सर्व्हरसवरून जगभरातल्या असंख्य लोकांनी अक्षरश: एकाच वेळी, एकाच क्षणी लॉग इन केल्यामुळे संकेतस्थळ, संगणकाच्या भाषेत “हँग” झालं! त्यामुळे इंटरनेटवर संकेतस्थळासाठी जी बॅंडविड्थ आरक्षित करण्यात आली होती ती वाढवावी लागली. पाचव्या, सहाव्या, सातव्या दिवशी सकाळी उठल्यावर हाच उपद्‍व्याप संकेतस्थळाशी संबंधितांना करावा लागला. हे प्रकरण जेव्हा फारच हाताभार जाऊ लागलं तेव्हा ज्या एजन्सीकडून बॅंडविड्थची सुविधा घेतली होती तिच्याकडून (संपूर्ण वर्षाचं शुल्क भरलेलं असतानासुद्धा) नाईलाजास्तव ते काम काढून घेऊन दुसर्‍या एजन्सीला द्यावं लागलं. त्यामुळं थोडासा आर्थिक तोटा सोसावा लागला पण संकेतस्थळ बंद पडण्याची घटना नंतर आजतागायत कधीच घडली नाही.

१५ नोव्हेंबरपासूनच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ५०,००० हिट्स नोंदवल्या गेल्या होत्या. हे सारं अवाक् करणारं होतं. ज्या अंकांचे २४ वर्षांत अवघे तेराच अंक निघाले, ज्यांची प्रिंट ऑर्डर प्रत्येकी २००० असावी म्हणजेच १३ गुणिले २००० = २६,००० प्रती इतकीच असताना त्याच अंकाच्या संकेतस्थळानं सुरू होतानाच्या पहिल्या आठवड्यातल्या फक्त सहा – सात दिवसांतच तब्बल ५०,००० हिट्स (तेही तीन ते चार वेळा तास, दोन – दोन तासांसाठी वर्दळीमुळे बंद पडले असताना) मिळवाव्यात हे सारं संकेतस्थळाशी संबंधित सार्‍यांचीच मती कुंठित करून टाकणारंच होतं. तो सिलसिला त्यानंतर अगदी आजतागायत तसाच चालू राहिलेला आहे. आज दि. २८ फेब्रुवारी २०११ पर्यंत म्हणजेच गेल्या १०० दिवसांत या संकेतस्थळाला जगभरातल्या जवळजवळ सर्वच देशांतून दोन लक्ष हिट्स मिळाल्या आहेत. ही अतिशयोक्ती नव्हे किंवा जाहिरातबाजीही नव्हे ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाची जेथे नोंदणी करण्यात आली आहे त्या एजन्सीची ही आकडेवारी आहे. ती तपासून घेण्यासाठी ‘गुगल अ‍ॅनॅलिटिकल’ची मदतही घेण्यात आली. या दोघांच्या आकडेवार्‍या तपासूनच ही संख्या ‘चिन्ह’ जाहीर करत आहे.

‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकाची निर्मिती ही निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येकालाच प्रचंड ऊर्जा देणारी घटना असायची पण नंतरचा साराच खटाटोप हा प्रचंड मनस्ताप देणारा ठरायचा याला काहीसा अपवाद फक्त गेला अंक ठरला. या पार्श्वभूमीवर ‘चिन्ह’चं संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर घडलेल्या, घडत आलेल्या सर्वच घटना या केवळ आश्चर्यकारकच नव्हेत तर उत्साह आणि उमेद वाढविणार्‍या ठरल्या आहेत, यात शंकाच नाही. ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला दोन लक्ष हिट्स देणार्‍या सर्वांचेच जाहीर आभार!  
(उद्याच्या उत्तरार्धात वाचा : ‘चिन्ह’ लवकरच दररोज प्रसिद्ध होणार!)

Friday, February 25, 2011

‘चिन्ह’ची साद..... चित्रकारांचा प्रतिसाद..!

 



‘चिन्ह’चा १९८७ सालचा पहिला अंक गेली तब्बल २४ वर्षं सातत्यानं वाचला जात आहे, तो आणि अर्थातच पुढले अंकही आणखी किती वर्षं वाचले जाणार आहेत, याविषयी कोणतंही अनुमान करता येत नाही. पण ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला अवघ्या १०० दिवसांत जगाच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या लक्षावधी विविधभाषी कलारसिकांच्या हिट्समुळे ते, पुढली आणखी किमान २५ – ५० वर्षं निश्चितपणानं वाचले जातील याविषयी शंकेला कोणतीही जागा उरलेली नाही.

‘चिन्ह’ सातत्यानं नवनवीन प्रयोग करीत आलं आहे. गतवर्षी ‘चिन्ह’नं केलेला चित्रकार, शिल्पकारांच्या प्रायोजकत्व जाहिरातींचा प्रयोग हा असाच एक नवा प्रयोग होता. महाराष्ट्रातील समकालीन कलावंत आणि त्यांची कला ही जागतिकीकरणामुळे अचानकपणे गवसलेल्या ‘ग्लोबल’ कलारसिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल या विस्तृत भूमिकेतूनच ‘चिन्ह’च्या जाहिरात प्रायोजकत्त्व पुरवणीची संकल्पना गतवर्षी प्रत्यक्षात आली आणि यंदाच्या वर्षी ती पूर्ण रूपानं साकार होताना पहावयास मिळते आहे.

‘चिन्ह’ गतवर्षी पहिल्यांदाच रंगीत आणि तोही आर्ट पेपरवर प्रसिद्ध होणार होता. अर्थकारण खूप अवघड होतं, यश कितपत मिळेल याविषयी काहीशी साशंकताही होती. म्हणूनच महाराष्ट्रातल्या कलावंतांनाच ‘चिन्ह’नं साद घातली आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत तसंच तरूण कलावंतही ‘चिन्ह’च्या रंगीत पानांचं प्रायोजकत्त्व घेण्यासाठी पुढे सरसावले. कलावंतांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच २० – २२ वर्षांत ‘चिन्ह’ला पहिल्यांदाच एका परिपूर्ण कलावार्षिकाचं स्वरूप देता आलं.

‘चिन्ह’च्या वाचकांना ‘चिन्ह’नं हाताळलेल्या लोकविलक्षण विषयांसोबत समकालीन कला आणि  कलावंतांचा परिचय व्हावा, त्यांना जर त्या कलाकृती विकत घ्यावयाच्या असतील तर त्या संदर्भातली  सर्वच माहिती एकत्रितपणे मिळावी या हेतूनंच सहभागी झालेल्या कलावंतांच्या; कलाकृतींसोबत तांत्रिक माहिती आणि संपर्कासाठी स्टुडिओ इ. पत्ते, दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट वगैरेची माहितीही दिली गेली. जिचं वाचक आणि कलारसिकांकडून अतिशय उत्साहानं स्वागत केलं गेलं. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात कलाकृती विकत घेण्यासाठी जरी खूप मोठा प्रतिसाद लाभला नसला तरी भविष्यात यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल होऊ शकेल याचे उत्साहवर्धक संकेत मात्र या प्रयोगानं ‘चिन्ह’ला दिले. जगभरातल्या इंग्रजी वाचकांसाठी ‘चिन्ह’ तर्फे यावर्षात प्रकाशित होणार्‍या ‘Chinha : the visual idiom’ या इंग्रजी आवृत्तीतही प्रायोजकत्त्व योजनेतील पानं पुनर्मुद्रित केली जाणार असल्यानं महाराष्ट्रातल्या कलावंतांना आता स्वत:चं आणि हक्काचं असं एक ‘ग्लोबल’ व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ‘Chinha : the visual idiom’ ची फक्त प्रिंट एडिशनच प्रसिद्ध होणार नाहीये तर ई – मॅगझिन आवृत्ती आणि  संकेतस्थळाव्दारे महाराष्ट्रातला कलावंत आणि त्याची कला जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या कलारसिकांपर्यंत पोहचू शकणार आहे. जगभरातील कलारसिक आणि महाराष्ट्रातील कलावंत यांच्यातला दुवा जोडण्याचं काम फक्त ‘चिन्ह’ करणार आहे. ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला  गेल्या अवघ्या १०० दिवसांत जगाच्या अक्षरश: कानाकोपर्‍यातून ज्या तब्बल दोन लाख हिट्स पडल्या आहेत, त्या पाहता ‘चिन्ह’च्या या प्रयत्नांना संपूर्ण यश लाभेल याची केवळ ‘चिन्ह’लाच नव्हे तर गेली तब्बल २४ वर्षं ‘चिन्ह’चं कार्य जवळून पाहाणार्‍या महाराष्ट्रातील कलावंतांचीही बहुधा खात्री पटली असावी. त्यामुळेच ‘चिन्ह’च्या आगामी ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ अंकाच्या पृष्ठ प्रायोजकत्त्वासाठी ‘चिन्ह’नं केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातील कलावंतांनी अक्षरश: भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्याचा हात दिला आहे.

‘चिन्ह’च्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करणार्‍या :
प्रफुल्ला डहाणूकर, सुधीर पटवर्धन, शिवाजी तुपे,
दीपक शिंदे, शुभा गोखले, रवी मंडलिक, दिनेश कुरेकर, अरूण कालवणकर, प्रमोद कांबळे, यशवंत शिरवडकर, भगवान रामपुरे, प्रकाश घाडगे, रत्नदीप आडिवरेकर, दत्ता बनसोडे, संजय म्हात्रे, गोपाळ नेने
वासुदेव कामत, उत्तम पाचारणे, चंद्रजित यादव, प्रकाश बाळ जोशी, प्रकाश राजेशिर्के, रावसाहेब गुरव, तानाजी अवघडे, सुभाष गोंधळे,
सुहास निंबाळकर, फिलीप डि’मेलो, शशी बने, प्रकाश भिसे, शिरीष मिठबावकर, रामकृष्ण कांबळे,  
रमेश थोरात आणि जयंत जोशी
या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत.

‘चिन्ह’नं महाराष्ट्रातल्या सर्वच कलावंतांना वैयक्तिक आवाहन करणारी पत्र पाठवली आहेत. ‘चिन्ह’ दूरध्वनीव्दारे संपर्कही साधत आहे. पत्ता बदलल्यामुळे किंवा दूरध्वनी क्रमांक बदलल्यामुळे संपर्कात विलंब होत असल्यास संबंधितांनी ‘चिन्ह’शी जरूर संपर्क साधावा. 

Thursday, February 24, 2011

‘चिन्ह’ आणि ‘कलाकीर्द’


 

‘चिन्ह’ची स्थापना१९८५ साली झाली. १९८६ साली पहिलं प्रकाशन होतं ‘कलाकीर्द : आर्ट अ‍ॅंड आर्टिस्ट डिरेक्टरी’! तोपर्यंत भारतात अशा स्वरूपाची डिरेक्टरी प्रकाशित झाली नव्हती. दिल्लीच्या ललित कला अ‍ॅकॅडमीने आर्टिस्ट डिरेक्टरी प्रसिद्ध केली होती पण त्यात चित्रकारांची फक्त वैयक्तिक माहिती आणि चित्रंच प्रसिद्ध करण्यात आली होती. कलाकीर्दमध्ये मात्र चित्रकारांच्या वैयक्तिक माहितीखेरीज कलादालनं, कलामहाविद्यालयं, कलासंस्था, कलासाहित्य इत्यादी माहितीचा समावेश करण्यात आला होता. संगणकाचा त्यावेळी नुकताच उदय झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कलाकीर्दमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीचं मोल मोठं होतं. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणाकाची एक कळ दाबली की, हवी असलेली सर्वच माहिती क्षणार्धात संगणकाच्या पडद्यावर अवतरते. पण ‘चिन्ह’नं कलेच्या क्षेत्रात २५ वर्षांपूर्वीच हे सारं प्रत्यक्षात आणून दाखवलं होतं. दुर्दैवानं त्याचं मोल कलाक्षेत्राला उमगलं नाही म्हणा किंवा ‘चिन्ह’ मार्केटिंगमध्ये कमी पडलं म्हणून म्हणा; ‘चिन्ह’ला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. 

‘चिन्ह’नं जे काम २५ वर्षांपूर्वी केलं ते काम आज इतक्या वर्षांनंतरही भारतातल्या कुणाही कलासंस्थेला अथवा प्रकाशनसंस्थेला शक्य झालेलं नाही, या वस्तूस्थितीकडेही डोळेझाक करता येणार नाही. म्हणूनच ‘चिन्ह’नं १९८५ सालचं ते आव्हान पुन्हा स्वीकारायचं ठरवलंय. फरक फक्त माध्यमाचा असणार आहे. तेव्हा ते मुद्रित स्वरूपात होतं, आता ते माऊसच्या एका क्लिकवर संपूर्ण जगातल्या कलारसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. प्राथमिक जुळवा जुळवीस सुरूवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच नव्या स्वरूपातली कलाकीर्द ‘चिन्ह’च्याच संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. पहिला टप्पा अर्थातच महाराष्ट्राचा असणार आहे तर नंतरच्या टप्प्यात दिल्ली, बंगाल, कर्नाटक इत्यादी भारतातील सर्वच राज्यांच्या चित्रकारांची तसंच कलाविषयक अन्य माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘चिन्ह’चं हे संकेतस्थळ संपूर्ण भारतातल्या चित्रकलेचं पोर्टलच व्हावं हे ‘चिन्ह’चं स्वप्न आहे आणि १५ नोव्हेंबर २०१० रोजी ‘चिन्ह’चं संकेतस्थळ सुरू झाल्यापासून भारतासह अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, इटली, हॉलंड इत्यादी देशांमधूनही ज्या लक्षावधी हिट्स मिळाल्या आहेत (या हिट्स फक्त मराठी माणसाच्या निश्चितपणे नसणार) त्या पाहता हे स्वप्न खूपच लवकर प्रत्यक्षात येईल, याची ‘चिन्ह’ला खात्री आहे.   

महाराष्ट्रातील चित्रकार, शिल्पकार, तसंच चित्रकलेशी संबंधित सर्वांनाच ‘चिन्ह’च्या या महत्वाकांक्षी उपक्रमात (अगदी नि:शुल्क) सहभागी होण्यासाठी हेच जाहीर आवाहन!

Tuesday, February 1, 2011

“इंडिया आर्ट समिट २०११”



 यशस्वी समिट





   
यंदाचं  इंडिया आर्ट समिट नुकतंच दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडलं.तरूण चित्रकार संतोष मोरे हेही त्यापैकी एक.  त्यांनीच घेतलेला हा तिसर्‍या पर्वाचा आढावा.        
                        
 
“इंडिया आर्ट समिट २०११” चं तिसरं पर्व नुकतचं दिल्लीत पार पडलं. अत्यंत कमी कालावधीत जगभराल्या कोणत्याही आर्ट फेअरनं एवढी लोकप्रियता क्वचितच मिळवली असेल, असं यावर्षीच्या भव्यतेवरून तरी वाटतंय. ‘आर्ट समिट’ म्हटलं की तो ‘निव्वळ बाजार’ असं समजणार्‍या लोकांनी एकदा तरी आर्ट समिटला नक्की भेट द्यावी आणि जर तो खरंच ‘बाजार’ असेल तर काही ‘गुरूतुल्य’ चित्रकारांचीसुद्धा ‘दुकानं’ तिथं का? असो. ते वेगळं सांगावयास नको.
  
आर्ट समिट हा केवळ ‘कलामेळा’ नव्हे ती एक कलापरिषद म्हणावी लागेल, ज्यामध्ये व्यावसायिक कलादालनांच्या विभागांव्यतिरिक्तही त्यात काहीतरी आहे. महत्त्वाचे कार्यक्रम, चर्चासत्र, प्रकल्प, कलासफरी यांची तिथं रेलचेल असते. उदा. संपूर्ण तीन दिवस नावाजलेल्या गॅलर्‍यांचे चालक, कलाविचार नियोजक (क्युरेटर्स), कलासमीक्षक कलाकार व कलाअभ्यासक यांची चर्चासत्रं, परिषदाही इथं असतात. ज्यात प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तराचाही समावेश असतो. दीड तासासाठी ५०० रूपये भरून लोकं तिथं जातात. त्यासाठी आगाऊ आरक्षण करावं लागतं. ज्यांना ते मिळत नाही त्यांच्यासाठी बाहेर पडद्यावर आतलं संभाषण ऐकण्याची सोय केली जाते. यंदा पहिल्या सत्रात ‘शहरी दृश्य – पॉप संस्कृती व भारतीय आधुनिक आणि वर्तमानकालीन (कन्टेपररी) कलानिर्मिती’ या विषयावर चर्चासत्र झालं. त्यात रणजित होस्कोटे, अतुल डोडिया, अन्नपूर्णा गरिमेला व ज्योतिंद्र जैन यांचा सहभाग होता. संपूर्ण तीन दिवसांच्या चर्चासत्रांमध्ये होमी भाभा, गीता कपूर, शरयू दोशी, गायत्री सिन्हा, रणजित होस्कोटे, नॅन्सी अडजानीया, गिरीश शहाणे, अभय सरदेसाई यांचा समावेश होता. तसंच अनिश कपूर, सुबोध गुप्ता, वीर मुन्शी, रणबीर कालेका, अतुल डोडिया, जितीश कलट इत्यादी कलाकारांचा सहभाग होता. व्यावसायिक कलादालनांनीही आपापल्या भूमिका मांडल्या. त्यात अगदी, ‘आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय कला’, ‘भारत : एक जागतिक कलाकेंद्र व त्यासाठी लागणारी पोषक वातवरणनिर्मिती व धोरण’, ‘वर्तमानकालीन विचार नियोजन व विचार नियोजकांच्या बदलत्या भूमिका’, ‘कलाखरेदीची कला’, ‘भारतीय कलाबाजार २००६ – २०११ : वाढ, दिशा आणि आव्हानं’, कलेतील प्रसारमाध्यमं लिखाण आणि कलासमीक्षकांच्या भूमिका’ इत्यादी विषय हाताळले गेले. एवढे सर्व विषय, त्यात सहभागी होणारे तज्ज्ञ एरव्ही आपणास कुठं ऐकावयास मिळणार? नाही का?

यंदापासून आर्ट समिटनं चित्रकारांची एकल प्रदर्शनं(सोलो प्रोजेक्ट्स) परंतु व्यावसायिक गॅलर्‍यांनी प्रायोजित केलेल्या विभागांचा समावेश केला होता. तसंच विचार नियोजित कलासफरी (क्युरेटेड वर्क)  काही खास हेतूनं आयोजित केल्या होत्या. सर्वसामान्यांना कलाकृतीमधील ‘मिनिंग’पेक्षा त्याचं आकलन कसं करावं ते ‘पॉप आर्ट’ व त्याची व्याप्ती या सर्वाची माहिती ‘आर्ट वॉक’ मधून घेता आली. अर्थातच हे सर्व वॉक विनामूल्य होते.‘व्हिडिओ आर्ट’ माध्यमात काम करणार्‍या तिसेक तरूण व्हिडिओ आर्टिस्टचे व्हिडिओ त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे तयार केलेल्या ‘व्हिडिओ लॉंज’मध्ये दाखविण्यात आले, ते आर्ट समिटच्या प्रांगणातच. ‘Sculpture Park’मध्ये जीजी स्कारिया, मन्सुरअली, सुदर्शन शेट्टी, सुहासिनी केजरीवाल, नेहा चोक्सी, प्राजक्ता पोतनीस यांची शिल्पं- मांडणीशिल्पं प्रदर्शित झाली.


















पुस्तक प्रकाशनं आणि त्यानिमित्तानं होणार्‍या चर्चासत्रांचीही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेनं जास्त होती. यंदा पाकिस्तानचा राशीद राणा, सोमनाथ बॅनर्जी, शुभप्रसन्ना, दयानिता सिंग, सुदर्शन शेट्टी यांची पुस्तकं प्रकाशित झाली. एकंदर कलाजगतातल्या जागतिक मंदीमुळे आलेली मरगळ यावेळीही जाणवली. तरूण कलावंत नवीन कलादालनांच्या शोधात व कलादालनं खरेदीदार शोधण्यात व्यस्त असणार हे अपेक्षितच होतं तरीही बहुतेक कलादालनांनी नाविन्याचं वारं अंगात घुमवल्याचं स्पष्ट जाणवत होतं. विनाईलसारख्या ‘तकलादू’ समजल्या जाणार्‍या माध्यमात केलेली, LED लाईट्सचा वापर केलेली, किंवा टिकाऊपणाच्या कक्षेत न येणार्‍या माध्यमात केलेली कामं दाखविण्याची हिम्मत अनेक कलादालनांनी केली. ठुकराल आणि टाग्रा यांच्या ‘Put it on’ या एड्स जनजागृती प्रकल्पासाठी तयार केलेल्या ‘मर्यादित आवृती’ असलेल्या चपलाही येथे विक्रीसाठी होत्या, तर त्या आधी केलेले मोठे शिल्प-स्लिपर्सची सहा फुटी प्रतिकृतीही प्रदर्शनात होती.


















अर्थात हे सर्व नाविन्याबद्दल जागरूकता – आत्मीयता की परदेशी कलादालनांचा वाढता सहभाग व त्यामुळे तयार झालेली स्पर्धा हे कळत नाही. या नाविन्याच्या वातावरणात देखील धुमीमल, दिल्ली आर्ट गॅलरी, आर्ट मोटिफसारख्या कलादालनांनी मात्र प्रतिथयश मास्टर्सचीच कामं दाखविण्याची आपली ओळख कायम ठेवली. लंडनच्या लिझॉन गॅलरीनं यंदादेखील अनिश कपूर व टोनी क्रेग यांची कामं आणली होती. दिल्लीच्या आर्ट मोटिफ गॅलरीनं प्रभाकर कोलतेंची चित्रं प्रदर्शित केली होती, कोलते यांनी केलेलं एक मोठं मिश्र माध्यमातलं काम लक्षवेधी होतं.

  













पाकिस्त्तानी कलाकारांमध्ये बानी आबीदी, मेहरीन मुर्तझा यांची कामं दखल घेण्यासारखी होती. व्हेनिस बिएनाले, आर्ट बासेल, हॉंगकॉंग आर्ट फेअर प्रमाणे येत्या काही वर्षांतच इंडिया आर्ट समिटसुद्धा त्याच ताकदीनं सादर होईल अशी आशा करू. येणार्‍या वर्षांत आर्ट समिटकडे ‘बाजार’ म्हणून न पाहता तो जागतिक कलेचा आरसा होतोय का किंवा त्यानिमित्तानं दिल्लीत होणार्‍या इतर कला घटनांचा आस्वाद तर आपण नक्कीच घेवू शकतो नाही का?
                                                                   -संतोष मोरे

Sunday, January 23, 2011

खिडक्या- चित्रातल्या आणि सिनेमातल्या..

सुधीर पटवर्धनांचं फॅमिली फिक्शन हे चित्रप्रदर्शन आणि किरण रावचा धोबी घाट एकाच दिवशी पाहिलं.दोन्हीमधे शहर आहेत,शहरी अवकाशाला कधी आतून,कधी बाहेरुन न्याहाळणार्‍या खिडक्यांमधली माणसं आहेत.
ती माणसं एकेकटी आहेत आणि त्यांना घरांच्या खिडक्यांमधून दिसणार्‍या शहरी अवकाशाचा संदर्भ चिकटून आहे.या दोन्हीमधल्या खिडक्यांमधून आत डोकावताना किंवा बाहेर पहाताना प्रत्येक वेळी दिसतं ते फक्त शहरच.आणि ते शहर आपल्या ओळखीचं.



सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या प्रातिनिधीक चित्रात घरातलं बंदिस्त कौटुंबिक अवकाश खिडकीद्वारे मुक्त झालेलं आहे.बाहेरचं शहर,त्या शहरातलं पल्प फिक्शन शहरी कुटुंबामधे आता एका अपरिहार्य बेमालूमपणे मिसळून गेलं आहे. चित्रकला,सिनेमाच्या भिन्न जगांमधल्या अनेक प्रतिमा घरांच्या खिडक्यांमधून आत शिरलेल्या आहेत.काळाची चौकट गळून पडलेली आहे.
चित्रामधली ती मंद,निर्बुद्ध वाटू शकणारा रिकामपणा चेहर्‍यावर वागवत खुर्चीत बसलेली गृहिणी आणि काहीसा त्रासिक कंटाळा चेहर्‍यावर वागवत सोफ्यावर बसलेला मुलगा,दोघांच्या रिकाम्या नजरेला कदाचित टीव्हीवरच्या खिडकीतून दिसणार्‍या रुटीन प्रतिमांचा बुद्धीवरुन ओघळून जाणार्‍या प्रतिमांचा संदर्भ आहे.घरातल्या चिंतित,काय नक्की करायचं न सुचून उभ्या असलेल्या आधीच्या पिढीतल्या आजोबांचं शोकेसच्या काचेत पडलेलं प्रतिबिंब आणि शोकेसमधून दिसणारा बुद्धच कदाचित या सगळ्यात वेगळा.
शहराला सरावलेल्या नजरांची ती सारी कुटुंब, त्यांच्या एकत्रित रहाण्याला छेद देणारं एकेकटेपण.  शहरं पटवर्धनांच्या चित्रकुटुंबातील व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग बनलेली..


सुधीर पटवर्धनांच्या या चित्रमालिकेत अशा अनेक खिडक्या आहेत.एक गॅलरीही आहे ज्यात आपल्या नजरेसमोर बदलत गेलेल्या बाहेरच्या शहराला अणि खिडकीच्या आतल्या बदलत गेलेल्या आपल्या कुटुंबाला,त्यातल्या नातेसंबंधांना काहीशा भावविभोर,हुरहुरत्या नजरेने न्याहाळणार्‍या दोन वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच्या स्त्रिया आहेत.त्यांचा तो कदाचित नॉस्टेल्जिया आपल्या खूप जवळून ओळखीचा.

'व्हिजिटेशन'मधल्या खिडकीत धक्कादायक अनुभवांच्या कोड्यात टाकणार्‍या स्मृती आणि खिडकीतून दिसणार्‍या विशिष्ट देखाव्याच्या आकर्षणातून निर्माण झालेलं स्वप्न आहे.



'विंडो'मधे तर एका अवकाशातून दुसर्‍या अवकाशात पहाणार्‍या असंख्य लहान मोठ्या खिडक्या आहेत.अवकाश पाहणारी नजर त्यात दृश्य नाही तरी काही फरक पडत नाही.दृष्टी आपलीच आहे. आकलनाच्या जाणीवाही आपल्याच आहेत.
खिडकीच्या संदर्भचौकटींमधून शहराचा दिसणारा तुकडा आपल्यालाही कधी आकर्षक वाटणारा.
तो मर्यादित अवकाशाचा तुकडा आहे तोवरच आणि म्हणूनच त्याचं आकर्षण टिकून रहाणार आहे याचं भान असलेली आपली नजर त्या खिडक्यांच्या चौकटींवर खिळून रहाते.
बाहेरचं शहरी अवकाश सुरक्षित नव्हतच कधी पण आता घरातलंही अवकाश सुरक्षित नाहीये ही चित्रातलं सूचन अस्वस्थ करुन सोडतं.

धोबी घाटमधेही एक चित्रकार आहे,त्याचं शहर आहे आणि त्या शहरातल्या खिडक्या आहेत.मुंबईतल्या गजबजलेल्या विभागातल्या जुनाट,उंच इमारतींच्या घरांच्या खिडकीत उभं राहून आतलं आणि बाहेरचं अवकाश त्रयस्थपणे न्याहाळताना नकळत त्यात गुंतून जाणारी यातली चित्रकाराची नजर.
आपल्याला अगदी अनोळखी असं समांतर आयुष्य नजरेसमोर अनुभवत,अस्वस्थ होत ते जगणं कॅनव्हासवर रंगवणारा तो पेंटर.तटस्थ तरीही संवेदनशील.त्याच्या समोरच्या खिडकीत त्याला न्याहाळणारी एक आसक्त नजरही आहे ज्यापासून तो अनभिज्ञ अहे.


धोबी घाटमधे अजूनही एक खिडकी आहे.खिडकीतल्या तिच्या हातात हॅन्डीकॅम आहे.त्या खिडकीतून बाहेरचं शहर बघणारी तिची नजर या शहराला सरावलेली नाही.नवखी आहे.लहान गावामधून या शहरात आलेल्या एका रसरसत्या उत्साहाच्या,नव्या जाणीवांना आपलंस करु पाहणार्‍या तरुणीची ती नजर आहे.खिडकीतून तिला समोरच्या शहरांना सरावलेल्या घरांच्या खिडक्या दिसतात,त्यात झटपट स्वयंपाक आटपून पोळीभाजीचे डबे भरुन घराबाहेर पडणार्‍या गृहिणी,घरकाम काही सेकंदात आटपून घरातून निघून जाणार्‍या 'बाई आणि त्यांची वनिता',संध्याकाळच्या दिव्यांनी लखलखून गेलेला धावता रस्ता,शहरावर कोसळून पडणारा पाऊस असं सगळं आहे आणि या सर्वातून तिला गिळून टाकणारा,संपवून टाकणारा अपरिहार्य एकटेपणाही आहे.

सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या त्या शहरी कुटुंबांतलं रिकामपण,विसंवाद अधोरेखित करणार्‍या खिडक्या आणि धोबी घाटमधल्या एकेकट्या माणसांचं खिडक्यांच्या माध्यमातून बाहेरच्या शहराशी अणि एकमेकांशी जुळत गेलेल्या नात्यांमधला रिकामा अवकाश अधोरेखित करणार्‍या खिडक्या..
शेवटी काय तर सुधीर पटवर्धन म्हणतात तसंच.अंतर्गत आणि बाह्य अवकाशांमधला खिडकी हा एक दुवा.दोन्हींमधील अंतर कायम राखणारा. 


शर्मिला फडके

Wednesday, January 12, 2011

अरूपाचा स्थापत्यकार: अनिश कपूर

अनिश कपूर हे भारतीय वंशाचे ब्रिटिश शिल्पकार. त्यांच्या भव्य आणि नेत्रदीपक शिल्पांचं प्रदर्शन मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमधे गेले महिनाभर सुरु आहे. अनेकांनी ते पाहिलंही असेल. ज्यांनी नसेल पाहिलं त्यांना येत्या १८ तारखेपर्यंतच फक्त ते पाहण्याची संधी घेता येईल. अनिश कपूर यांचं प्रदर्शन प्रत्यक्षात पाहणं हा एक अत्यंत भारावून टाकणारा अनुभव असतो. मांडलेल्या शिल्पकृती, इन्स्टॉलेशन्सचा नक्की अर्थ काय आहे, ती अशा तर्‍हेने मांडण्यामागची शिल्पकाराची भूमिका काय असू शकते यावर एक अत्यंत सुंदर लेख चित्रकार संतोष मोरे यांनी खास 'चिन्ह' करता लिहून पाठवला आहे. हा लेख वाचून ज्यांनी अद्याप हे प्रदर्शन पाहिलेले नाही ते नक्कीच मेहबूब स्टुडिओमधे धाव घेतीलही. त्यांनी ती घ्यावी हे मात्र नक्की.



अरूपाचा स्थापत्यकार
भारतीय वंशाचा ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर यांचं काम पहिल्यांदाच भारतात आलं आहे. मुंबईत आणि दिल्लीत त्यांच्या भव्य आणि नेत्रदीपक शिल्पांचं प्रदर्शन नुकतंच भरलं आहे. १९५४ साली मुंबईत जन्मलेला अनिश १९७३ साली लंडनला उच्च कलाशिक्षणासाठी गेला आणि १९७९ साली कलाशिक्षण पूर्ण करून तिथंच स्थायिक झाला. १९७९ सालीच तीन आठवड्यांच्या भारत दौर्‍यानंतर त्यानं लंडनला जाऊन जी चित्रं काढली त्याच्याच पुढचा भाग म्हणजे त्याची समूहशिल्पं. या समूहशिल्पांमुळेच त्याला जागतिक ओळख मिळाली. हीच समूहशिल्प दिल्लीच्या प्रदर्शनात आहेत तर मुंबईतली त्याची शिल्पं ही त्याच्या गेल्या दहा वर्षातल्या कामाचा आढावा घेणारी आहेत. या दोन प्रदर्शनांच्या निमित्तानं मला उमगलेला अनिश कपूर.....
अनिशच्या कामाची खरी सुरूवात १९७९च्या त्याच्या भारत भेटीनंतर झाली. त्या आधी महाविद्यालयात असताना तो चित्रं, रेखाटनं, परफॉर्मन्स इत्यादी मध्ये प्रयोग करीत होता, तसेच सुलेख, उत्थित शिल्पं, टॅपेस्ट्री यामध्ये त्याला विशेष रस होता. त्याच्या भारतभेटीनंतर त्यानं जी कामाची शृंखला केली; त्यात प्रामुख्यानं कागदावर भडक लाल रंगाचे आकार असत. ही चित्रंच त्याच्या पुढच्या शिल्पशृंखलेची नांदी ठरली. ही शृंखला म्हणजेच – ‘१००० नेम्स’. लहान लहान शिल्पांचा समूह असे. ही शिल्पं शुद्ध रंगद्रव्य वापरून केलेली आहेत. ज्याप्रमाणे आपण भारतात रंगपंचमीचे रंग, रांगोळी अथवा देवळांबाहेर असलेले अबीर, बुक्का, कुंकू,हळद यांचे ‘ढिगारे’ पाहतो, त्या ढिगार्‍यांची आठवण ही शिल्पं पाहताना होतो. या शिल्पकृतींचे केवळ आकार पाहिले तर ते बीज, घुमट, उरोज व पायर्‍यांप्रमाणे भासणारे भौमितीक आकार दिसतात, परंतु त्या शिल्पांची शीर्षकं पाहिली तर त्या साधेपणामागील गर्भितार्थ आपल्या लक्षात येईल. उदा: ‘To Reflect an intimate Part of the Red’ या शिल्पात तो लाल रंगाच्या लालसरपणाबद्दल, त्याच्या भडकपणाबद्दल; त्याच्या मनात खोलवर दडलेल्या भावविश्वाचं प्रतिबिंब बघतो.या शृंखलेतली त्याची शिल्पं आकाराबद्दल असलेली ढोबळ ओळख व त्यातली अमूर्तता. यांमधील सीमारेषा आहे. आकार आहेतच परंतु तो बोलतो त्या आकारावर पांघरलेल्या रंगाच्या भावाबद्दल. आकार आहेत घुमट, बीज, पायर्‍यांसारखे दिसणारे व भौमितिक आकार इत्यादी परंतु त्यांवर शुद्ध रंगद्रव्यामुळे(Pigment) झालेला परिणाम. त्या मूळ आकारापासून खूप खोलवर घेवून जातो. या कामांमध्ये आकारांचा वापर करून तो कथन (Narration) करतो, प्ण अमूर्ताचं. लाल रंगाचा ‘भडकपणा’, पिवळ्या रंगाची पिवळी ‘धम्मकता’, निळ्या रंगाची ‘नितळता’, काळ्याची ‘गहनता’, आकारांशी संवाद संवाद साधतेच. परंतु त्या आकारांत अडकून न राहता खूप खोलवर जाते. आकार आहेत परंतु त्यांची मूळ ओळख बाहेर सोडून. कारण अनिश आकारांचा केवळ आधार घेवून ‘मोठ्या’ संकल्पनेकडे निर्देश करतो. जसा पर्शियन गालीचा हा जमिनीवरील दगडी वेलबुट्टीवरून प्रेरित झाला आहे. गालीचा हा सुद्धा जमिनीवरच बसण्याचं साधन आहे, परंतु जमिनीच्य अप्रतिकृतीपासून अगदी भिन्न. जणो काही हातात मावणारी, गुंडाळता येणारी, कुठेही ने आण करता येणारी प्रतिजमिनच; अगदी अलिबाबाच्या गालिच्यासारखी. असाच काही दृष्टीकोन अनिशनं जोपासलाय. प्रेरणा जिथनं मिळते तो मूळ स्त्रोत आणि अभिव्यक्त होणारी भावना या दोन्ही एकमेकांशी संवाद साधतील परंतु त्यांच्यातलं नातं मात्र वेगळं असेल. म्हणजे शिल्पांच आकार आधी घुमट उरोजांसारखा वाटेल परंतु त्याचा परिणाम मात्र आकारांच्या पलिकडचा असेल, मूळ आकाराची ओळख हरवून. या शृंखलेचं ‘1000 Names’ हे शीर्षकसुद्धा विष्णूच्या सहस्रनामावरून प्रेरित झालंय. आता विष्णूची सहस्रनामं व अनिशचे शिल्पसमूह यांचा संबंध काय हा मुद्दा गौण ठरतो. याच शृंखलेला त्याला लंडनमधलं मानाचं समजलं जाणारं ‘टर्नर’ पारितोषिक मिळालं, तसंच १९९१ मध्ये त्यानं व्हेनिस बिएनालमधे ब्रिटनचं प्रतिनिधीत्त्व केलं.








या शृंखलेनंतर अनिशनं आपलं लक्ष समूह शिल्पांवरून मोठ्या आकाराच्या एकल शिल्पांकडे केंद्रित केलं. वालुकाश्मात तयार केलेल्या आयताकृती उभट शिल्पात त्यानं दरवाजा व उंबरठ्याप्रमाणे भासणारे करकरीत आकार खोदले. त्या आयताकृती आकारात पुन्हा एक लहान आकार थोड्या खोलवर खोदून त्यात गडद निळा रंग (Pigment) लावला.आता हे शिल्प ओबडधोबद परंतु आयताकृती उभ्या दगडात केलेलं, त्यात करकरीत भौमितिक आकार व त्यात पुन्हा रंग. या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हा वालुकाश्म साधारणत: इजिप्तमधला आहे, जो इजिप्तमधल्या लोकांच्या धारणेची आठवण करून देतो. मृत्युनंतर त्यांचा राजा ‘फॅरो’ त्याच्या थडग्यात त्या आभासी दरवाज्यात जिवंत राहील ही धारणा. या निळ्या गदड दरवाजासदृश्य आकारामुळे या धारणेस आधार मिळतो. शिल्पांच्या उभट आकारामुळे कधी तो प्राचीन कीर्तिस्तंभ, तर कधी इजिप्शियन थडग्याची आठवण करून देतो. इथेही गूढ, मायावी- आभासी भाव प्रकर्षानं जाणवतो. आणखी एक गोष्ट इथं लक्षात येते ती ही की शिल्पकार जर का त्रिमित आकृतीबंध घडवतो व चित्रकार द्विमितीतून आभास निर्माण करतो तर अनिश या दोन्ही शक्यतांमध्ये हुकुमत गाजवतो. ‘आभास – माया’ हा अनिशच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्याची अति चकचकीत पोलादासारखी शिल्पं त्याच्या आरशाप्रमाणे गुळगुळीत पृष्ठभागामुळे आजूबाजूचे वातावरण कवेत घेते. शिल्पांच्या भौमितिक आकारामुळे व त्यांच्या गणितीय रचनेमुळे आजूबाजूच्या वातावरणातील रचना, व्यक्ती, त्याच्या हालचाली, वस्तू इत्यादी क्षणोक्षणी विरूपित होत जातात. त्याचं आयरिस (डोळ्यांचं बुबूळ) हे शिल्प पहा.

या शिल्पाला केवळ ‘अंतर्वक्र आरसा’ न म्हणता ‘आयरिस' हे शीर्षक देताना अनिशनं काय विचार केला असेल हे समजतं. डोळ्याच्या बुबूळाचा बहिर्वक्रपणा व पाणीदारपणा या दोन्ही गोष्टींना आरंभबिंदू मानून अनिश अवकाशाला आव्हान देतो. तीच त्याची खासीयत आहे, आणि म्हणूनच ते शिल्प ‘अंतर्वक्र आरसा’ इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. एका मोठ्ठ्या भिंतीच्या पृष्ठभागावर ते कधी आत बुडाल्यासारखं वाटतं तर कधी आजूबाजूच्या वातवरणाला पाण्यातील भोवर्‍या प्रमाणे आंत आंत घेवून जातं. हा परिणाम अतिशय चमत्कारिक, संभ्रमित करणारा व आपणास अवकाशात ढकलणारा असतो. म्हणूनच अनिशची शिल्पं फोटोत किंवा इंटरनेटवर पाहण्यासारखी नाहीत तर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखी आहेत.
आयरिस प्रमाणेच त्याची ‘सी- कर्व्ह’, ‘एस – कर्व्ह’ ही शिल्प देखील अवर्णनीय आहेत.

सूर्यप्रकाश शिल्पाच्या पृष्ठभागावर सरळ रेषेत पडतो परंतु त्यावर पडणारी प्रतिबिंबं क्षणोक्षणी विरूपित होत जातात. तसंच ते शिल्प व आपण यांच्यामधलं प्रत्यक्ष अंतर देखील कमी जास्त झाल्यासारखं भासतं. स्टिलसारखा कणखर धातू देखील त्यावर पडणार्‍या, हलणार्‍या प्रतिबिंबांमुळे पाण्यासारखा प्रवाही, मृदु, नितळ होवून जातो. पाण्यावर पडणारे प्रतिबिंब ज्याप्रमाणे त्यावर खडा मारल्यानंतर विरूपित होतं तोच अनुभव इथंही येतो. हा अनुभव मात्र फोटोमध्ये येणं शक्य नाही.
अनिश त्याच्या पोलादी शिल्पांमध्ये आपण बाहेरील वातावरणास कसा प्रतिसाद देतो हे पाहतो तर त्याची मेण, रेझीन, रंग, पेट्रोलियम जेली व थिनर या माध्यमांमध्ये केलेल्या शिल्पांमध्ये अंतर्गत अवकाशाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहतो. पोलादी शिल्पांमध्ये कणखर धातू पाण्यासारखा प्रवाही होतो, तर या मेणामधील शिल्पांमध्ये, नव्हे मांडणीशिल्पांमध्ये आपल्या डोळ्यांच्या प्रतिसादाआधीच ते शिल्प आकार घेत जातं. अतिशय तंत्रशुद्ध यंत्रणेचा वापर करून केलेली ही कामं पूर्ण झाल्यानंतर नव्हे तर ‘होताना’ आपण पाहतो. शिल्प स्वत:च्याच हालचालीतून आकाराला येतं. १८० अंश कोनात फिरणार्‍या अर्धवर्तुळाकार आकारातून अर्धगोल तयार होतो. अर्थातच ही प्रक्रिया संथ गतीची असल्यानं या कृतीत भूत, वर्तमान, भविष्य हे तीनही काळ अंतर्भूत आहेत, तर ‘भासमानता-माया’ हा अनिशचा हुकमी एक्का इथंही काम करतोच. पहा.
‘Shooting into corner’ या त्याच्या कामात – मांडणीशिल्पात चक्क तोफ समोरच्या दोन भिंतींच्या कोनड्यात मेणाचा गोळा डागते.

या शिल्पात अनिशनं सर्वसाधारणपणे गॅलरीची शांत असणारी जागा मोठा आवाज, नाट्य व घटाना यांनी भरून टाकली आहे. दर २० मिनिटांनी तोफ चालविणारा त्या तोफेत लाल भडक मेणाचा गोळा भरतो आणि तो गोळा समोरच्या कोनाड्यावर डागला जातो. ही क्रिया या शिल्पापुरती मर्यादित न राहता तोफ, रक्तलाल गोळा व त्यामुळे समोरच्या कोपर्‍यावर होणारा छिन्नविछिन्न ढीग बाह्यजगातल्या युद्ध, हिंसा यांकडे नकळत घेवून जाते. एक कलाकृती म्हणून ही क्रिया एक चित्र, शिल्प, परफॉरर्मन्स, घटना नाट्य या सर्वांच्या मर्यादेपलिकडे घेवून जाते.अनिश कपूरच्या कामातली एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. वरकरणी त्याची कामं ‘रूपवादी’ वाटत असली, तरी तो स्वत: मात्र रूपवाद अगदी ठामपणे नाकारतो. ‘रूपवाद’ हा कला इतिहासातला अगदी महत्त्वाचा तरीही नंतरच्या पिढीनं झिडकारलेला कलाप्रवाह आहे. रूपवादाच्या काही मर्यादा होत्या. जसा रूपवाद हा एकांगी – एकतर्फी होता, कलाकाराच्या व्यक्तिगत अनुभूतींशी – भावविश्वाशी निगडीत होता. त्याचा बाह्यजगाशी काहीही संबंध नव्हता. नेमका हाच आत्मकेंद्रित मुद्दा नंतरच्या पिढीतल्या कलाकारांना मान्य नव्हता. उदाहरण द्यायचं झाल्यास आपणा रिचर्ड सेराचंच घेवू. रिचर्ड अनिशपेक्षा फक्त नऊ वर्षानं मोठा, म्हणजे अगदी त्याच्या बरोबरीचा. परंतु त्याच्या कामात बाह्यजग अथवा स्वत:च्या अभिव्यक्ती व्यतिरिक्त गोष्टींना महत्त्व नव्हतं. या दोघांच्याही शिल्पांमधले आकार पाहिले तर त्यांत खूप साम्य दिसतं. तरीही सेरा मात्र ‘आधुनिक कला’ प्रवाहाची भाषा बोलतो तर अनिश आत्ताची. सेराची कामं पाहताना आपण केवळ सेराचीच कामं पाहत असतो तर अनिशची कामं पाहताना अनिश तिथं नसतोच. तो आपण व त्याची कामं यांना एकत्र आणतो आणि स्वत: मात्र अलिप्त राहतो. अनिशची अलिप्तता आणि सेराची त्याच्या कामाबद्दलची आसक्तीच या दोघांना वेगवेगळ्या कालखंडात वर्गीकृत करते. एक सेरा ‘केवळ आकारांचा खेळ’ करतो तर अनिश आकारांना आरंभबिंदू मानून अवकाशाशी संवाद साधतो, कधी आपल्या जगात घुसून आपल्या संवेदना व इंद्रियांना आव्हान देतो.
 
आजही अनेक चित्रकार – शिल्पकार रूपवादाचं हे मोठ्ठं जाळं तोडू शकले नाहीत. आजही अनेकजण १९५० -६० च्या दशकातील ‘मॉडर्नीस्ट’ चळवळ जी त्यांनी विचारपूर्वक अव्हेरली तीच आजही अंधपणे जोपासताना दिसतात. अशा कलाकारांसाठी अनिश कपूर आदर्श ठरावा.

संतोष मोरे