आर के लक्ष्मण आणि जे जे स्कूल ऑफ
आर्टचा संबंध काय ?
श्री विनोद तावडे
शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांस
सप्रेम नमस्कार
शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांस
सप्रेम नमस्कार
कालच्या 'सकाळ' मध्ये जेजेसंबंधीचे वृत्त वाचले . काही प्रश्न पडले,म्हणून मग ठरवले की आपली भेट दुरापास्त असल्याने आपणास थेट अनावृत्त पत्र लिहावे .
काय संबंध आर के लक्ष्मण आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचा ?
जेजेने त्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला नव्हता म्हणून का तुम्ही त्याचं तिथं स्मारक करू पाहताय ? ( चित्रकार हुसेन यांना देखील जेजेने प्रवेश दिला नव्हता , म्हणून काय त्यांचं पण तुम्ही जेजेत स्मारक करणार काय ?चालेल तुमच्या लोकांना ? )
का टाईम्स मध्ये असताना जेजेत ते रोज फेरफटका मारायला येत म्हणून तुम्ही त्याचं स्मारक करू पाहताय ? का त्यांची मुलगी तुम्हाला येवून भेटली आणि तिनं प्रस्ताव ठेवला म्हणून तुम्ही तयार झालात ?
उद्या गायतोंडे , बरवे , सातवळेकर , धोंड , भास्कर कुलकर्णी , हेब्बर , मोहन सामंत , अंबादास , सूझा , पळशीकर , धुरंधर, तय्यब मेहेता , करमरकर , रावबहादूर म्हात्रे यांचे वंशज जर तुम्हाला भेटायला आले तर त्यांचीही दालनं तुम्ही त्या तुमच्या तथाकथित संग्रहालयात करणार आहात काय ?( वि सू : हे सारे भारतातील सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून गणले जातात . कला संचालक पदावर बसलेल्या आचरटाना तुम्ही नक्कीच विचाराल तर त्यांना चार नावं देखील सांगता येणार नाही म्हणून हा खुलासा केला .) जेजे स्कूल ऑफ आर्ट हे अभिजात कलेच्या शिक्षणासाठी आहे , तेथे जे जे म्हणून घडावयास हवे ते अभिजात कलेच्या संदर्भातच असावयास हवे .
व्यंगचित्र हा विषय तिथल्या अभ्यासक्रमात नाही त्या मुळे तुम्ही जे करू पाहता आहात ते सर्वस्वी चुकीचेच आहे , तिथं शिकलेल्या आमच्यासारख्यावर अन्याय करणारे आहे . अभिजात कलेचे क्षेत्र आता विस्तारले आहे . भारतीय कलावंतदेखील आता जागतिक कलाक्षेत्रावर धडकू लागले आहेत . याच जेजेत शिकलेल्या चित्रकार गायतोंडे यांचे फक्त एक चित्र २३कोटी ७०लाखाला गेले तेही जागतिक लिलावात हे तुम्ही नक्कीच वाचले असेल , याच गायतोंडे यांचं एक चित्र एका मूर्ख कलासंचालकाच्या - ते चित्र त्या चित्रापेक्षा छोट्या आकाराच्या फ्रेममध्ये बसवण्याच्या अट्टाहासापायी मधोमध दुभंगलं . पण तरीही तो मूर्ख माणूस थांबला नाही , त्यानं ते . चित्र चारही बाजूनं सुमारे एकेक फूट कापून काढलंच . 'चिन्ह' ने ते मूळ चित्र आणि कापलेलं चित्र दोन्ही छापली तर कारवाई काय झाली ? काहीच नाही .जेजेची अक्षरशः ज्यानं कबर खोदली तो माणूस आता सुखाने निवृत्तीनंतरचं आयुष्य जगतोय. ज्यांनी ज्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टची वाताहत करण्याची कामगिरी बजावली ते सारेच आता सुखात आहे . धाय मोकलून रडताहेत ते तिथले विद्यार्थी . त्याचं आक्रंदन तुम्हाला एकू येत नाहीये का ?
जेजे मधून मी थेट पत्रकारितेत गेलो . त्या दिवसांपासून जेजेच्या बातम्या मी देतोय . पहिली बातमी शिक्षक , प्राध्यापक कमी झाल्याची होती . आज या क्षेत्रातून निवृत्त होण्याची वेळ आली तरी मी आपल्या बातम्या देतोच आहे. गेल्या ३५ वर्षात कमी होणाऱ्या शिक्षकांची संख्या आणखी आणखी वाढत वाढत गेली आणि आता तर एका हाताच्याच बोटावर मोजता येतील इतके नावालाच कायम स्वरूपी शिक्षक उरलेत . बाकी सारे कंत्राटी कामगार करून टाकलेत . वर्षभरात आता आहेत तेही सेवा निवृत्त होतील . मग बहुदा कला संचालक - नेमला गेला तर,नाहीतर कुणीतरी सरकारी रेम्याडोक्या त्या जागी येईल आणि जेजेच्या दारावर उभा राहून रोजंदारीवर शिक्षकांची रोज भरती करील आणि हे करताना तो त्याचं कमिशन काढून घेईलच , असं जर घडलं तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही .
हे सारं सुधारायचं सोडून जेजेचं पर्यटन केंद्र करून तुम्ही काय मिळवणार आहात ? आर के लक्ष्मण यांचं स्मारकच जर तुम्हाला उभारायचं असेल तर ज्या इमारतीमधून त्यांनी तो अजरामर कॉमन मेन साकारला त्या टाइम्सच्या इमारतीत करा . तो टाइम्सचा मालक असल्या प्रस्तावाला हिंग लावूनदेखील विचारणार नाहीये , तो कशाला विचारील ? तो तर धंदा करायला बसलाय . तर त्यावरही उपाय आहे . टाइम्सच्या फुटपाथवर भरपूर जागा आहे की , मागे पुढे , आजूबाजूला गल्ल्यात देखील पुरेशी जागा आहे की . तिथे करा त्यांचं स्मारक . कोण अडवणार आहे तुम्हाला तिथे ? उलट ते अधिक अर्थपूर्ण होईल . कॉमन मेनचं स्मारक टाइम्सच्या आजूबाजूच्या फुटपाथवर ! कल्पना करून पहा ! सारं जग लोटेल ते पाहायला .
कला अकादमीतून अभिजात कलेला हद्दपार केलं आम्ही काही बोललो नाही .चित्र नगरीतील ललित कलेच्या रिजनल सेंटरसाठी आम्हाला मिळालेली सात एकर जागा एका माजी मुख्यमंत्र्यानं चित्रपट शिक्षण संस्थेच्या मढ्यावर घातली. आम्ही गप्प बसलो. आता तुम्ही तर आम्हाला जेजेतून बाहेर घालवायला निघाला आहात का ? त्याचे पर्यटन स्थळ करून तुम्ही नेमकं काय साधणार आहात ? मग चित्रकारांनी शिकायचं तरी कसं आणि कुठं ? आशियातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वोत्कृष्ठ परिसराचे आता आणखी धिंडवडे काढू नका हो . राष्ट्रवादी सांडानी काढले आहेत ते पुरे झाले , त्यात तुम्ही आणखी भर घालू नका !
आणखी एक प्रश्न जाहीरपणे विचारतो,असे विचारू नये पण विचारतो ? (जेजेसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो.) समजा उद्या तुमच्या कन्येनं चित्रकलेमधेच करीयर करायचं ठरवलं (देव करो आणि तिला ती दुर्बुद्धी न सुचो आणि तुमच्यावरही त्या भयंकर प्रसंगाला तोंड देण्याची वेळ न येवो.) तर तुम्ही तिला महाराष्ट्रातल्या कुठल्या आर्टस्कूलमध्ये घालाल ? आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी ? देऊ शकतील तुमच्या तंत्र शिक्षण खात्यातील अधिकारी या प्रश्नाचं उत्तर ? अहो अक्षरशः सत्यानाश केलाय या क्षेत्राचा मागच्या सरकारमधल्या लोकांनी.काही म्हणून शिल्लक ठेवलं नाहीये . 'चिन्ह' च्या कालाबाजार अंकात सारं काही नावानिशी लिहिलं आहे .http://www.chinha.co.in/marathi/archive2008.html शक्य असेल तर जरूर वाचा.आपल्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीत अंकाची प्रतसुद्धा भेट दिली होती तुम्हाला,आठवतं का ?
वर्ष झालं तुमच्या सरकारला . तुमचा निरोप आधीच मिळाला होता , ' जेजेचे प्रश्न मला ठाऊक आहेत , काळजी करू नका , मी पाहतो सारे ' म्हणून गप्प राहिलो होतो . आता मात्र डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे . आता गप्प राहणे अवघड आहे , आता असेच भेटू वरचेवर याच कालाबाजारच्या पानावर .
लोभ आहेच तो वाढावा …
तुमचा
सतीश नाईक
संपादक चिन्ह
लोभ आहेच तो वाढावा …
तुमचा
सतीश नाईक
संपादक चिन्ह