Monday, December 8, 2014

'चिन्ह' : प्रकाशनाला वेळ का लागतो ?



दोन-तीन वर्षापूर्वी दुसऱ्या पर्वातल्या ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडांची घोषणा जेव्हा केली तेव्हा असं वाटलं होतं की, ‘सर्वच मजकूर तयार आहे फक्त फोटो तर गोळा करायचे आहेत. हे काय होईल पटकन. एका वर्षातच तिन्ही खंड आपण प्रसिद्ध करू.’ पण ते वाटतं तेवढं सोप नाही हे काम सुरु केल्यावरचं मला उमगलं. सर्व मजकूर पटापट निवडला. प्लानिंगही मोठं सुरेख झालं. गायतोंडे यांच्याविषयी प्रसिद्ध झालेला सर्वच मजकूर ‘गायतोंडे’ ग्रंथात घ्यायचा. जे जे स्कूल ऑफ आर्टविषयीचे नकारात्मक लेख वगळता सारेच लेख ‘जे जे जगी जगले’च्या दुसऱ्या खंडात घ्यायचे. तर ‘चिन्ह’मधून गाजलेली चित्रकारांची सारी शब्दचित्रे ‘व्यक्तिचित्र, पण शब्दातली !’ या तिसऱ्या खंडात घ्यायची. चौथा खंड ‘चिन्ह’मधून गाजलेल्या आत्मकथनांचा, तर पाचवा आणि शेवटचा भास्कर कुलकर्णी यांच्यावर असणार अशी ‘चिन्ह’मधले महत्वाचे सर्वच लेख ग्रंथबद्ध करण्याची सर्वसाधारण रूपरेषा मी आखली होती. यातले पहिले तीन खंड पहिल्या वर्षात तर नंतरचे दोन खंड दुसऱ्या वर्षात प्रसिध्द करायचे असं मी ठरवलं होतं. पण वाटलं होतं त्याच्यापेक्षाही हे काम अवघड निघालं.

याचं कारण माझ्या काम करण्याच्या पद्धतीत झालेला महत्वाचा बदल हे असावं असं वाटतं. २००७ सालचा अंक मेपलिथो कागदावर प्रसिध्द केला होता. ‘चिन्ह’चा रंगावतार त्याच अंकापासून सुरु झाला. इथून ‘चिन्ह’चं संपादन करण्याच्या माझ्या दृष्टीकोनात मोठा बदल होत गेला. आता इथून पुढे आपल्यावरची जबाबदारी अधिकच वाढली याचे भान मला आले. आणि त्यातून प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करण्याकडे माझा कल झुकू लागला. त्यानंतरचा ‘कालाबाजार’चा अंक तर वृत्तपत्रीय भाषेत ज्याला हार्ड स्टोरीज म्हणतात तसा होता. त्याचं संपादन करतांना माझ्याकडून जरा जरी चूक झाली असती तर माझ्यावर गडांतर येऊ शकले असते याचं भान मला होतं. साहजिकच तो अंक काढतांना प्रचंड काळजी आणि वेळ खर्ची घालावा लागला. तो अंक लिहून संपादित करतांना नावानिशीवर टीका करून, अत्यंत प्रक्षोभक विधानं आणि जहाल भाषा वापरून देखील माझ्या विरोधात संबंधितांपैकी कोणीही ब्र देखील काढू शकले नाही. इथं मला माझ्या पत्रकारितेतल्या अनुभवांचा खूपच फायदा झाला. पण अत्यंत काळजी घेऊन आणि अतिशय सावधानतेने ते सारे काम केल्यामुळे ‘चिन्ह’चं काम करण्याच्या माझ्या एकूणच दृष्टीकोनात खूप मोठा बदल झाला. (इथूनच आणि ‘चिन्ह’च्या प्रकाशनाचे सारेच गणित उलटे पालटे होऊ लागले.)

आणि या साऱ्या घडामोडींमुळेच तर ‘चिन्ह’चं रुपांतर पूर्णपणे एका परिपूर्ण ‘आर्ट मेगझीन’मध्ये करण्याची संकल्पना माझ्या मनात खोलवर रुजली. हे सारे सोप्पे नव्हते. ‘चिन्ह’चे सारेच आर्थिक गणित उलटे पालटे करून टाकणारे होते. पण माझ्या डोळ्यासमोर असलेलं ‘चिन्ह’चं स्वरूप इतकं भव्य दिव्य होतं की, मी त्या साऱ्याची पर्वा न करताच काम करण्याचा निर्णय घेतला. परिणामी दरवर्षी नेमाने प्रसिद्ध होणारा अंक दर दोन वर्षानं प्रसिद्ध होऊ लागला. नव्या स्वरूपातला चिन्ह सदर करतांना प्रचंड कष्ट उपसावे लागत होते. भयंकर काळजी घ्यावी लागत होती. आधी मजकुरावर प्रचंड काम करावे लागत होते पण इथे मात्र मजकुराबरोबर त्याच्या दृश्य अंगाचाही प्रचंड विचार करावा लागत होता. छपाईच्या दृष्टीने हे सारे कसे दिसेल हे ही पाहावे लागत होते. आणि मुख्य म्हणजे हे सारे एका विशिष्ट आर्थिक मर्यादेत करावे लागत होते. त्यामुळे अंक उशिरा प्रसिद्ध होऊ लागला. या साऱ्यामध्ये ‘चिन्ह’च्या कट्टर वाचकांची प्रचंड साथ लाभली, केवळ म्हणूनच मी हे ‘निवडक चिन्ह’चे धाडस करू शकलो हे आवर्जून सांगायला हवे. केवळ अंक उशिरा प्रसिद्ध होण्यामुळे काही वाचक कायमचे दुरावले पण गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीच तडजोड न केल्यामुळे नवे वाचक ‘चिन्ह’ने खूप मोठ्या प्रमाणावर जोडले. या नव्या वाचकांच्या प्रचंड मोठ्या पाठबळामुळेच ‘निवडक चिन्ह’ प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.

सतीश नाईक
संपादक, 'चिन्ह'