Wednesday, January 22, 2014

      'गायतोंडेमध्ये काय नाही'

  
परवा लिहायचं होतं ते गायतोंडे यांच्यावर
पण गाडी कुठेतरी भरकटत गेली खरी 
' गायतोंडे'चा विषय नुसता निघाला तरी
काय बोलू आणि किती सांगू असं होतं खरं ,
आता उदाहरणार्थ हेच पहाना ,
टाईम्स मधून ' गायतोंडे ' स्टोरी साठी मिथिला फडकेचा फोन आला 
तेव्हा मी शेगडीवरून  चहा उतरवला होता आणि दूध तापत ठेवलं होतं ,
पाउण एक तास मी तिच्याशी बोलत होतो ,
दुसऱ्या मजल्यावरून माझी असिस्टंट कसला जळका वास येतो ते पाहायला 
खाली आली तेव्हा कुठे मला कळलं कि दूध जळलं .
पण ते एक असो .

संपादनाच्या कामा निमित्तानं 'गायतोंडे ' या पुस्तकाचं किती वेळा
वाचन केलं त्याची गणतीच नाही ,
पण प्रत्येक वेळी त्या पुस्तकातून काही ना काही नवे मिळाले नाही
असे कधी झालेच नाही,
मला वाटतं म्हणूनच बहुदा 'चिन्ह' चे  ते तिन्ही अंक प्रचंड वाचले
गेले असावेत . गाजलेही गेले असावेत.
या साऱ्याचं श्रेय ' चिन्ह ' ला दिलं जातं ,पण ते काही खरे नव्हे .
ते सारं श्रेय 'गायतोंडे '  यांनाच आहे.
ते  अफाट आयुष्य जगले , अफाट काम करून गेले ,
म्हणूनच तर' चिन्ह ' ला ते मांडता आले,
' चिन्ह' चं यातलं जर काही श्रेय असलंच तर ते इतकंच आणि एव्हडंच .
आता याला जर कुणी आमचा  विनय बिनय वगॆरे म्हणणार असेल
तर त्याने ते म्हणावे बापडे,
पण आमची म्हणाल तर अशी धारणा आहे की  तीन अंकांच्या रूपाने
आम्हाला ते सारे मांडावयाची संधी मिळाली हेच
 मुळी आम्ही आमचं भाग्य समजतो . 



तर सांगत काय होतो ?
हं, संपादन करताना जेव्हा जेव्हा हे संकलन वाचत गेलो
तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळा त्यातून नवे नवे काहीतरी मिळत हे जातेच
आता उदाहरणार्थ परवाचेच पहाना.
एकोणीसाव्या किवा विसाव्या वेळी "गायतोंडे ' वाचताना असं लक्षात आलं की
अरे , यात आयुष्याचे सारेच्या सारे रंग यात मिसळले आहेत की ,
म्हणजे यात  पिता पुत्र संघर्ष आहे , आईचं प्रेम आहे ,बहिणीची माया आहे .
इथं प्रेमभंगचं दु :ख आहे , साऱ्या पाशांचा त्याग आहे , गुरूचा शोध आहे ,
गुरुवरची निष्टा आहे ,नाविन्याचा शोध आहे ,आधुनिक विचार आहेत ,
वाचन ,मनन ,चिंतन,  एकाग्रता , निष्टा , ध्यास  आणि त्यातून तयार झालेली
ठाम मते हे सारे काही  पानोपानी  वाचकाला चकरावून टाकत जाते , लिलावात त्याचं एक चित्र
आज २३ करोड आणि ७० लाखाला  विकलं गेलं आहे हे कळल्यावर तर गायतोंडे
यांच्या कडे पाहावयाचा दृष्टीकोनच बदलला जातो .
' सेक्स ' हा विषय सोडला तर ( त्याचेही खूप सुंदर सूचन त्यात आहेच .)
आयुष्याशी संबंधित सारे  सारे काही या पुस्तकात ठासून भरले आहे ,
जे फक्त चित्रकारालाच नाही तर कुठल्याही क्षेत्रातल्या कुणालाही आयुष्यात उपयोगी पडू शकते ,
इतकेच नाही तर आयुष्याला एक वेगळी दिशा देवू शकते .
 थोरा मोठ्यांची चरित्रे आपल्याला खूप काही सांगून जातात , शिकवून जातात ,
आयुष्याला अनेकदा एक छानशी दिशा देवून जातात .
"गायतोंडे ' यांच्यावरचे हे चरित्र नव्हे पण पण चरित्राची सर्वच्या सर्व साधनं असलेलं
हे अनोखं पुस्तक  या सर्वात वरचं स्थान पटकावणार आहे या विषयी आमच्या मनात
तरी अजिबात शंका नाहीय . 
कारण त्याचं २३  शे किंवा २३ हजाराला विकलं गेलेलं त्याचं एक चित्र आता
ख्रिस्तीजच्या आंतरराष्ट्रीय लिलावात २३करोड आणि ७० लाखाला विकलं गेलंय .

इतकं सारं वाचून तुम्हाला हे पुस्तक आपल्या संग्रहात हवेच असे जर तुम्हाला वाटत असेल  तर
 
'NKG' हा लघुसंदेश 'चिन्ह'च्या ९००४० ३४९०३ या नंबरावर नाव, पत्ता आणि मेलसह पाठवावा , किवा मेल करावा

सतीश नाईक 
संपादक 'चिन्ह '

Thursday, January 16, 2014

पत्रावळी आणि ' पत्र्या 'वळी ….



" गायतोंडे " हा ग्रंथ काही रुढार्थाने गायतोंडे यांचे चरित्र म्हणता येणार नाही .
पण गायतोंडे यांच्या चरित्राची सारीच्या सारी साधने मात्र या ग्रंथात एकवटली आहेत
असे मात्र निश्चितपणे म्हणता येईल .
गायतोंडे यांनी कधीच कुणाला आपल्या जवळ फिरकू दिले नाही .
लेखक , पत्रकार ,संपादकांशी तर ते फटकून वागत . साहजिकच हुसेन , सूझा , रझा , आरा यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी
गायतोंडे यांना कधीच मिळाली नाही .

आणि गायतोंडे यांनीही त्याची कधी फिकीर केली नाही .
' चिन्ह 'ने म्हणूनच गायतोंडे यांच्या वर काम करताना
त्यांच्या सहवासात आलेल्या जास्तीतजास्त लोकांशीच संवाद साधण्यावर भर दिला , त्यातून साकार झाले ते अतिशय गाजलेले ते तीन अंक.
२००१, २००६ आणि २००७ साली ते प्रसिद्ध झाले .
आज कार्यालयीन प्रती खेरीज त्यांची एकही प्रत आमच्याकडे उरलेली नाही
यावरून ते सारेच अंक किती गाजले याची सहज कल्पना येवू शकेल .
दर चार दोन दिवसाआड ' त्या अंकाची एक तरी प्रत आहे का ' अशी
विचारणा होतेच होते .
गंमत म्हणजे यातले बहुसंख्य लोक हे सदर अंक प्रसिद्ध होण्याआधी
अंकाची मागणी नोंदवावी म्हणून आम्ही मेल किवा एसेमेस द्वारे ज्यांच्या हात
धुवून मागे लागलेले असतो तेच असतात .
पण हेच सारे नंतर 'एक तरी प्रत द्या ना , फाटकी तुटकी सुद्धा चालेल म्हणून
आमच्या मागे लागतात .







आधी प्रकाशन पूर्व सवलतीत अंक घ्यायला काचकूच करणारे हेच सारे
नंतर मात्र या अंकांसाठी दाम दुपटीने पैसे मोजायला तयार असतात .
१०० -१०० रुपयांच्या अंकांसाठी अनेक महाभाग तर केवळ झेरॉक्स साठी
२००- ३०० रुपये मोजताना पहावयास मिळाले आहेत .
" चिन्ह 'चे अंक रंगीत निघू लागल्या पासून तर त्याच्या रंगीत झेरोक्स साठी
२०००-३००० रुपये मोजणारे हि काही कमी नाहीयेत .
७५० रुपयांचे अंक आम्ही ३०० ते ५०० रु इतक्या सवलतीत दिले , ते सुद्धा टपाल खर्चासह , एक किलो वजनाचा अंक कोरोगेटेड बॉक्स सह
पोस्टाने पाठवावयास प्रचंड खर्च येतो , तो आम्ही सोसतो .
पण तरी सुद्धा संबंधित मंडळी हे अंक सवलतीत का घेत नाहीत याची
कारण मीमांसा काही आम्हाला अद्यापि करता आलेली नाही .
' चिन्ह 'च्या सवलत योजनेत भाग घ्यायचा नाही आणि नंतर
झेरॉक्सवाल्याला मात्र अवाच्या सव्वा दाम मोजायचे
या मागचे रहस्य जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल .


मध्यंतरी एका कला महाविद्यालयाच्या ग्रंथपालांचा फोन आला होता ,
म्हणाले 'लई भारी अंक काढता राव , पण त्येव्हडं बाईन्डीग सुद्धा चांगलं करा की ,
पत्रावळ्या होतात बगा लागलीच ,
मी त्यांना विचारलं , सर . महाविद्यालयात शिक्षक किती ?
तर म्हणाले , असतील की ५०-६०
त्यातले " चिन्ह " वाचतात किती ? तर म्हणाले ,असतील की पाच सहा .
म्हटलं , बाकीच्यांचं काय ? त्ये नुसतं इथल्या इथं बगत्यात . म्हटलं वाचणाऱ्या शिक्षकांचं काय लायब्रीत वाचतात की घरी नेतात ?
तर म्हणले घरी नेतात …
किती दिवसांनी परत देतात ? १०- १५ दिवसांनी , अंक मागून घ्यावा लागतो .
म्हटलं मुलांचं काय ? किती मुलं आहेत महाविद्यालयात ? तर म्हणाले ५०० .
त्यातली किती वाचतात ? तर म्हणाले , जास्तीत जास्त शंभर, उरलेल्या मुलांचे काय ? तर म्हणले , उरलेली तीनशे चारशे मुलं अंक नुसता बघत्यात .
कुठे बघतात ? हिथच लायब्रीतच बघतात , वाचणारी मुलं कुठं वाचतात , इथं की घरी ? असं कुठं होतं का ?त्यानला अंक घरी न्यायाची परमिशन नाही .
मग ती मुलं काय करतात ? काही नाही , त्यानला आम्ही झेरॉक्स मारून घ्यायची परमिशन मात्र दिली आहे .
मग म्हटलं आता मला सांगा आर्ट पेपरवर छापलेला , परफेक्ट बाईडिग केलेला अंक
जर वारंवार झेरोक्स मशीन मध्ये जात राहिला तर तो एखाद्या पत्र्यावर जरी
छापला गेला असता तरी त्याच्या पत्रावळ्याच झाल्या असत्या असं तुम्हाला नाही का वाटत ?फार फार तर त्याला "पत्र्या "वळ्या म्हणता आले असते .
ह्ये आमच्या लक्षातच आले नाही , स्वारी …असं म्हणून चटकन त्यांनी फोन ठेवला देखील ….


कुणाला दुखावण्याच्या हेतूने हे लिहिलेले नाहीय ,
या मजकुरामुळे कुणी जर नकळत दुखावले गेले असेल तर मी मुळीच त्यांची माफी बीफी मागणार नाही ,
कारण हि वस्तुस्थिती आहे , खरी गोष्ट याही पेक्षा भयंकर आहे , कारण गेल्या तीन अंकापासून "चिन्ह "च्या
प्रती आम्ही विक्रीसाठी कुणालाही देत नसल्याने आमच्या संगणकात नावनिशीवार सारी आकडेवारी आहे .
त्यातून प्रगट होणारे सत्य चित्रकला आणि चित्रकलेशी संबंधिताना नक्कीच आवडणारे नाही याची खात्री आहे . पण हेही कुणीतरी लिहायला हवेच , नाही का ?

सतीश नाईक
संपादक ' चिन्ह '




" चिन्ह " प्रकाशित करताना आलेले हे असे अनेक धमाल अनुभव
"निवडक चिन्ह "चे तिन्ही खंड प्रसिद्ध होई पर्यंत इथून पुढे
आठवड्यातून तीन वेळा तरी लिहावे असा विचार आहे , पाहूया जमते का ते …
सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '

Wednesday, January 1, 2014

दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक - ‘चिन्ह’

दरवर्षी नव्या ‘चिन्ह’ ची खूप उत्सुकता असतेच. या वर्षीचा नवा ‘चिन्ह’ आहे. उद्दाम, बेबंद, उसळत्या लाटांचा वसा घेऊन आलेला, समुद्राचे स्वैर उधाण क्षण पकडणारा,नि उत्साहाच्या उर्जेची असंख्य शिडे फडफडणारा - नाशिवंत ‘सामुद्री’ कलेचा - वाळू,शिंपले नि रेतीचा - भरती ओहोटीचा आयुष्याच्या - होड्या नि जहाजांच्या तरल प्रवासाचा - नि कशा कशाचा - मिरीचा नि ओंडक्याचा, पुरातत्वीय,राजकारणीय,भौगोलिक पर्यावरणीय,समाजकारणीय,कलेला परिमिती देणाऱ्या सौंदर्याचा - नव्या संशोधनात व कलाचिंतनात नि हृदगतात मग्न असलेल्या उत्साही उमद्या डॉक्टर कलावंत डॉ. सुबोध केरकारांचा - आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा नि कलेचा प्रदीर्घ आलेख - कलेचा ध्यास प्रगट करणारा. 

हा अंक आहे - चिंतनमग्न,विदेही अवस्थेत रसिकांना ‘अवस्था लावोनी’, जाणारा संयत,शांत,धीरोदात झेन मुद्रेचा - कलेच्या तंद्रीत बुडलेल्या प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडेंचा - आपल्या अथांग प्रतिभेची पुसटशीसुद्धा जगाला चाहूल न देणारा, आपल्या कलेशी तादात्म्य पावलेला,स्वतःच जणु एक साक्षात कला - तत्वच बनलेला - सहज निर्माण प्रक्रियेतून आणि गंभीर एकटेपणातून चित्रातून घेतलेल्या स्वतःच्याच एका शोधाचा आणि या कलावंतांच्या कुंडलीची झलक दाखवणारा(नि ‘गायतोंडेच्या शोधात’ या आगामी पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण करणारा )आणि त्यांच्या बद्दलच्या अमाप जिव्हाळ्याने भारावलेल्या चित्रकार प्रभाकर कोलत्यांचा.


गायतोंडेंच्या दिल्लीच्या घरातल्या सगळ्या वस्तुंवरील साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी (गायतोंडेवरची डॉक्युमेंटरी फिल्म शूट करण्यासाठी ) डस्टरने ती धूळ झाडायला गेलेल्या कोलते सरांना गायतोंडेनी सांगितलं होतं - “कोलते ते तसंच राहू द्या. पुसायचं नाही. मला तसचं आवडतं.” - असं म्हणणारे खरेखुरे गायतोंडे. ग़्रेटच. आणि ती ‘कॉमेंट’ प्रामाणिकपणे सादर करणारे कोलतेही ग्रेटच.


हा अंक आहे - गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या रेषा - बोलीचा - पुरुष व स्त्री यांच्या आदिम तत्वातल्या रती नि कामभावाचे पातळतळ धुंडणारा - बेलगाम,हिंस्त्र,काहीशा रांगड्या श्वापदी वृत्तीने चित्रावर अक्षरश: तुटून पडणारे,आक्रमक वृत्तीने जीवनाबरोबरच कलेचा उपभोग घेणारे,पण तरीही त्यात उद्ध्वस्ततेला थारा न देणारे भारतातले एक प्रमाथी कलावंत - फ्रान्सिस न्यूटन सूझा - त्यांचा साक्षेपी अभ्यास करून त्यांच्या चित्रांतल्या पाश्चात्य व पौंर्वात्य काम - प्रेरणांचा वेध घेणारा नितीन दादरावाला यांचा समर्पक अभ्यासलेख.


नवा ‘चिन्ह’ म्हणजे सुनीता लक्ष्मण श्रेष्ठ यांचा चित्रकार पती-पत्नीच्या आयुष्यभरातल्या सहवासाच्या काही स्मृती (त्यात पुन्हा गायातोंडेंचे शिष्य लक्ष्मण श्रेष्ठ यांचे रेखाटलेले दुर्मिळ व्यक्तिचित्र )


सव्वीस कलाविषयक संशोधनावर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण दाभाडे या दुर्लक्षित कलाप्रेमीचा परिचय - नेपथ्यकार श्याम भुतकरांचा एके काळचा ‘झपाटलेल्या’ आयुष्याचा गूढ थरारक अनुभव.


फाळके पुरस्कारविजेत्या नि कलावंत गुरुदत्त यांच्या आयुष्याशी धागे जुळलेल्या सिनेमाऑटोग्राफर व्ही. के . मूर्तीच्या छायाचित्रणातले मोहक सौंदर्य टिपणारा अशोक राणेंचा लेख. 



यशवंत देशमुखांच्या निखळ अमूर्त कलेचं रहस्य - शुभा गोखलेंचं ‘न्यूडस’ बद्दलचं आणि अनामिकेचं स्वतःच्या ‘न्यूड’ फोटोग्राफीचे ‘धीट’ अनुभव - त्याबरोबरच विक्रम बाबांच्या अपारंपारिक छाया - चित्रणातला व ‘नग्न निषेध’ या लेखातला - या दोघांनी धसास लावलेला कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नि त्यातला परखडपणा.


चित्रकार संजय निकम यांची २६ जुलैच्या काळरात्री जीवघेण्या प्रलयातून दोनशे बुडणाऱ्या माणसांना अक्षरश: पाण्यातून खेचून त्यांना ‘जीवनदान’ देणाऱ्या - कलावंताच्या जिद्दीची,अंगावर काटा आणणारी कहाणी-आणि अर्थातच प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्व्याचं ‘अधुरं स्वप्न’.


‘चिन्ह’ च्या यां अंकालाच व्यापून राहिलेली अथांग दर्याची नि सुशेगाद गोव्याची पार्श्वभूमी त्यात गोव्याचे दोन पिढ्यांचे तीन महत्वाचे कलावंत - गायतोंडे, सूझा नि केरकर. कला,जीवन आणि निसर्गाचं एकजीव आत्मतत्वच या अंकात जणू प्रगटलंय. जीवनातल्या सौंदर्याचा नि संघर्षाचा यात मिलाफ झालाय.


मात्र या सगळ्या यत्न-प्रयत्नांमागची अविश्रांत मेहनत आहे सतीश नाईकची - एका अगम्य उत्साहाने त्याला कलेविषयी जे जे नि जेवढं जेवढं करावसं वाटतं,ते ते आणि तेवढं तेवढं अत्यंत निष्ठापूर्वक करीत राहतोय. मग काहीही होवो. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ वरचा अंक सर्वांचा विरोध पत्करून तळमळीने काढणार म्हणजे काढणारच. भास्कर कुळकर्णीवरचा असो वा गायतोंडेवरचा असो. विशेषांक हवा म्हणजेच हवाच. तसचं सारा विरोध डावलून ‘नग्नता विशेषांक’ प्रसिद्ध केला म्हणजे केलाच - तिथे तडजोड नाही.त्या अंकाला उत्तम प्रतिसाद मिळालाच. ‘चिन्ह'ला पर्याय नाही हेच खरं. एक प्रभाकर बरव्यांवरचा विशेषांक त्याला अजूनपर्यंत काढता आलेला नाहीय,पण मला खात्री आहे आज न उद्या तो हा अंक निश्चितपणे काढणारचं. कारण यामागे आहे त्याची कलेवरची आस्था,कामाची प्रचंड जिद्द नि ठाम आत्मविश्वास. या त्याच्या निरंतर ध्यासाला व धडपडीला सलाम!


कलातत्वाची पारख करणारा - ‘चिन्ह’ !


कलावंताच्या पाठीशी उभा राहणारा - ‘चिन्ह’ !


नि कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सतत झगडणाराही - ‘चिन्ह’ च !


अथक अविरत प्रयत्न,संकटांवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या बळावर सतीशला यश मिळाले नाही; तरच नवल. यशाचे नवनवे मानदंड उभे करणाऱ्या ‘चिन्ह’ ला रौप्यमहोत्सवानिमित्त मनापासून शुभेच्छा !



प्रदीप संतोष नेरुरकर, डोंबिवली