चित्रकार-शिक्षक ‘चिन्ह’वाचतात?
चित्रकारांनी विशेषत: चित्रकार शिक्षकांनी ‘चिन्ह’वाचावा यासाठी ‘चिन्ह’नं सुरूवातीपासूनच खूप प्रयत्न केले. ‘आम्हाला यातून काय मिळणार?’ या आणि अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची पाळीही आम्ही ओढवून घेतली. कला-साहित्य उद्योजकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याची सवय असलेल्या काही शिक्षकांनी तर ‘आम्हाला अंकाची एक कॉपी भेट द्या म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना ते घ्यायला लावतो’ अशा ऑफर्सही ‘चिन्ह’ला दिल्या. ज्या ‘चिन्ह’नं साफ धुडकावून लावल्या. अर्थात यालाही अपवाद होतेच.कदाचित अशा अपवादांमुळेच ‘चिन्ह’ला आजची मजल मारता आली असावी.
चिपळूण, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर या सारख्या ठिकाणी तर अनेक कलाशिक्षक स्वत:च अंक मागवत आणि शेजार-पाजारच्या गावातल्या शिक्षकांना ते घ्यायला लावत किंवा विद्यार्थ्यांना वाचायला लावत. आज तिथल्या ‘चित्रसाक्षर’विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. मुंबैतल्या नामवंत कलामहाविद्यालयात वरच्या वर्गावर शिकणारे विद्यार्थी जेव्हा ‘चिन्ह’हे काय आहे असं जेव्हा विचारतात तेव्हा खरंच गलितगात्र झाल्यासारखं वाटतं. पण अशाच वेळी जेव्हा महाराष्ट्राच्या खेडेगावातून एखादा विद्यार्थी फोनवरून ‘चिन्ह’संबंधी चर्चा करतो तेव्हा आजवर केलेल्या कष्टाचं चीज केल्यासारखं वाटतं!
पण आजही परिस्थिती बदलते आहे. मोठ्या संख्येने चित्रकला शिक्षक वाचू लागलेत, चर्चा करू लागलेत, विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करू लागलेत. त्याचे परिणाम आज ‘चिन्ह’चं काम करताना जाणवू लागलेत. पण अधेमधे उदासवाणे अनुभव येतात आणि असे अनुभव शेअर केल्याशिवाय रहावतही नाही. ‘चिन्ह’च्या अंक 14 चा प्रचार-प्रसार आणि बुकींग आम्ही सुरू केलंय. अशाच एका कलाशिक्षकाला ‘चिन्ह’नं फोन केला. ‘यंदाचा ‘चिन्ह’चा अंक बुक करायचाय का?’ तर ते शिक्षक म्हणाले नाही, पहातो, कळवतो.’ ‘अहो गेल्या वर्षी अंक घेतला होता ना म्हणून यंदा फोन केलाय. आताच नाव नोंदवल्यास सवलतीत मिळेल’ इती ‘चिन्ह’. तर ते शिक्षक म्हणाले नाही! त्याचं काय आहे गेल्या वर्षी वडिलांनी आणायला सांगितला होता म्हणून घेतला होता, यंदा नकोय!’ आणि वर ‘कुणाला हवा असेल तर कळवतो’ असंही सांगायला ते शिक्षक विसरले नाही. अक्षरश: थिजवून टाकणारा हा अनुभव. महाराष्ट्राच्या कलाशिक्षणची काय वाताहत झाली आहे हे या किश्शावरून स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही.
चित्रकार आणि चित्रकलाशिक्षकांचं ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण आता आता वाढतंय असं जरी असलं तरी चित्रकलाक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रात ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण सुरूवातीपासूनच खूप होतं आणि गेल्यावेळच्या ‘नग्नता’अंकानंतर तर ते खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नाटक,चित्रपट,संगीत,साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील नामवंतांचा तसेच उदयोन्मुखांचाही ‘चिन्ह’ला फार मोठा पाठींबा आहे. फेसबुकवरून किंवा ब्लॉगवरून ते ‘चिन्ह’चा ट्रॅक ठेवून असतात. ‘चिन्ह’च्या अंकाची घोषणा होताच ते त्यांच्या प्रती तात्काळ बुक करतात. या सार्यांशीच वेळप्रसंगी गप्पा मारणं, चर्चा करणं हा सुखद अनुभव आसतो.
एकदा आठवतेय जब्बार पटेल जवळ जवळ अर्धा-पाऊण तास ‘चिन्ह’आणि चित्रकलेसंदर्भात बोलत होते. तो फोन टेप करायला हवा होता असं नंतर राहून राहून वाटत होतं. अंक वाचल्याबरोबर नेमाने येणारा माधव गडकरींचा फोन एक वेगळंच बळ देत असे किंवा चित्रकार माधव सातवळेकरांचा फोन सार्या कष्टाचं परिमार्जन करायला लावणारा असायचा. डॉ.अनिल अवचट, विश्वास पाटील, वसंत सरवटे, मधू गडकरी, अजय देशपांडे(युगवाणी), अनिल सोनार, अशोक राणे, अतुल देऊळगांवकर, डीसीपी चंद्रशेखर कानडे, डॉ.माधवी मेहेंदळे, कविता महाजन, डॉ.रविंद्र बापट, श्रीकांत लागू, अशोक जैन, दत्ता मोने, प्रवीण बर्दापूरकर, राजा ढाले, रजनी दांडेकर, श्रीराम जोग, श्रीराम रानडे, विश्वास कणेकर, वसुंधरा पेंडसे नाईक, संजीवनी खेर, अनंत सामंत, अनिल किणीकर, अपर्णा वेलणकर, अशोक कोठावळे, भारत सासणे, कमलाकर नाडकर्णी, कुमार केतकर, डॉ.प्रकाश कोठारी, अनंत भावे, राजन खान, राजू परूळेकर अशी नावे तरी किती सांगावी?
एक वेगळा अनुभव मात्र सांगावासा वाटतो. लेखक पत्रकार संपादक वसंत सोपारकर यांचा असाच एके दिवशी फोन आला. काय ओळखलं का? आता फोनवर आवाजावरून कसं ओळखायचं? तर म्हणाले एक क्ल्यु देतो. तुम्ही लोकप्रभात असताना आपण बाहेर बसून समस्त संपादक वर्गाची टिंगल टवाळी करीत असू...तर मी म्ह्टलं सोपारकर बोलतायत का? तर म्हणाले दे टाळी. खूप सुंदर अंक काढलाय. कुठे मिळेल. म्हटलं पाठवतो, पत्ता द्या. तर म्हणाले पाठवू नको मी तुझ्या घरीच येतो न्यायला आणि अर्थातच जेवायलाही. पण पंधरा-वीस दिवस ते काही आलेच नाही. मग आम्ही त्यांना फोन केला तर म्हणाले नाही, नाही मी येतोच, त्याच रस्त्यावरून मी पूर्वी माझ्या गावाला वाड्याला जात असे. मी येतोच अंक पाठवू नकोस! पण नंतरही ते काही आले नाहीत मग आम्हीच त्यांना फोन केला आणि पत्ता घेऊन अंक कुरियर केला. तेव्हा म्हणाले अंक जरा तब्येतीचं उचकलं म्हणून आलो नाही पण लवकरच येतो, अंक नको पाठवू पण आम्ही अंक पाठवलाच आणि नंतर काही दिवसात आली ती त्यांच्या अकस्मात निधनाची बातमीच.