‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’
एक प्रांजळ अभिप्राय!
‘चिन्ह’च्या जाहिरात प्रायोजकत्व योजनेत सहभागी झालेल्या चित्रकार घनःश्याम घाटे (वय वर्षे ८०) यांनी ‘चिन्ह’चा अंक अत्यंत काळजीपूर्वक वाचून पत्रानं एक प्रदीर्घ अभिप्राय पाठवला. त्यांच्या अभिप्रायामागची त्यांची मनःपूर्वकता अतिशय आवडली म्हणून त्यांचा अभिप्राय जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.
मित्रवर्य श्री. सतीश नाईक,
स. न. वि. वि.
‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ ह्या आपण पाठविलेल्या या विशेषांकाचे दोनांक मिळाले. दोन प्रतींच्या मेव्याचं प्रयोजन समजलं नाही. असो, दुहेरी आभार. टेलिफोन संपर्काचं वैफल्य आणि वेळीच लेखी पोच देण्याच्या विरक्तीबद्दल क्षमस्व.
खरं म्हणजे अंक म्हणण्याऐवजी ग्रंथ म्हणणंच उचित असं पहिल्या नजरेतच वाटलं आणि शेवटपर्यंत टिकलं. इतकं भारदस्त आणि विलोभनीय स्वरुप पाहून किंचितसा आवाक्पण झालो. मराठी मायबोलीला आणि मराठमोळ्या चित्रकलेला ललामभूत वाटावं असं सर्वांगसुंदर. सुडौल सादरीकरण, चातुर्यपूर्ण संकलन, अर्थपूर्ण साहित्य इत्यादी आवश्यक गुणास न्याय देणारी आकर्षक रंगीत छपाई. सारंच संतुलित. संपादकीयमध्ये उद्धृत केलेल्या कष्टांचं चीज करणारा ठरावा असा ह ग्रंथ म्हणा वा विशेषांक.
एकदम आपले १९९० च्या दरम्यानचे उमेदवारीचे दिवस आठवले आणि आपण कुठल्याकुठे पोहोचल्याचं पाहून धन्यता वाटली. हार्दिक अभिनंदन.
मराठी दिवाळी अंकाच्या शंभरएक वर्षांच्या प्रवासातील, सरासरी दहा वर्षांच्या अंतरात दहा कर्तबगार संपादकांच्या यादीनंतर, सतीश नाईक हे अकरावं नाव गोवण्याचा श्री. सुनील कर्णिक ह्यांच्या निर्णयाबद्दल, हा विशेषांक पाहिल्यावर, दुमत होण्याचं कारणच उरत नाही.
“मुद्रा भद्राय राजते’’च्या तोडीचा ‘चिन्ह’ हा ठसा आणि सतीश नाईक ह्या नावाची सही, दोन्ही बांधेसूद, कलात्मक आणि चित्तवेधक, सत्व दर्शवणारी-राखणारी.
परिसंवादातील लेखकांच्या छायाचित्राप्रमाणं इतर काही लेखांच्या खाली असलेल्या दत्ता पाडेकर, शर्मिला फडके आदि नावांच्या खाली वा शेजारी त्यांची छायाचित्रं दिसली तर प्रत्यक्ष भेटीच्या खालोखाल आनंद होईल. ‘माणिक’मोती आहे, सजातीय हिरेमाणकं पण असावीत.
वळणदार, लयबद्ध वेलांट्यातून चितारलेलं विविध शीर्षकांचं अक्षरांकन मोहांत पाडणारं. ‘चित्रसूत्र’च्या मुखपृष्ठावरील गोंडस आकारांची आणि वेधक रंगांची किमया औरच. सूज्ञ आणि चपखल गुंफण-प्रक्रिया, त्यातील ‘अक्षर’ खुलवणारी आणि विशेष म्हणजे, अवती-भोवती जाणीवपूर्वक खुली सोडलेली जागा, शीर्षकांच्या आशयाकडे सहजरीत्या पोचवणारी.
मुखपृष्ठावरील चित्राच्या निवडीचा निर्णय यथायोग्य आणि समर्पक. त्यातील नग्न मॉडेलचा कमरेच्या खालचा भाग थोडासा अधिक उंच असता तर चित्र अधिक प्रमाणबद्ध आणि सुडौल भासलं असतं. देवदत्त पाडेकरची सर्वच न्यूडस् कौतुकास्पद आहेत. विद्यार्थी दशेतल्या त्याला दत्ता पाडेकरसोबत जे.जे.मध्ये डिप्लोमाच्या वर्गात अभ्यास करताना पाहिलं होतं. त्यामुळं त्याच्या प्रगतीचा पल्ला-घौडदौड पाहून अचंबित होणं साहजिक आहे. दत्ता आणि देवदत्ता. बाप तसा बेटा.
बहुरंगी-बहुढंगी दत्ता पाडेकरांच्या व्यापकतेचा आवाक्याचा कौतुकास्पद आदर करावासा वाटतो. त्यांना मिळणार्या आणि सत्तरी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करणार्या बक्षिसांच्या मागावर, गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी कित्येक दिवस मी मागावर होतो.
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शंभर वर्षांच्या इतिहासातील १८८७ पासून दिल्या गेलेल्या सुवर्ण-पदक विजेत्या चित्रांचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथाच्या पाठीमागील पानावर त्रिंदादनी चितारलेले ‘हिंदू-गर्ल’ हे रमणीय व्यक्तीचित्र आहे. त्याचप्रमाणे, मोनाली मेहेर ह्या विशेषांकाच्या कोर्या ठेवले गेलेल्या मागील पानावर सामावल्या गेल्या असत्या तर व्यक्ती महात्म्यांत वा त्याच्या सादरीकरणात फारसा फरक पडू शकला नसता असे वाटते. घडीचं सव्यापसव्यही टळलं असतं. खडतर तपश्चर्येतून इहलोकातला मोक्ष, अंतिम ध्येय साध्य करणारा, अशक्य, अगम्य, अतर्कशा कोटीतला तिचा जीवनपट अमर झालाय ’चिन्ह’च्या साक्षीनं. अलौकिक धडाडी, ध्येयासक्ती, विजिगिषु वृत्ती इथे सोदाहरण ‘चिन्हांकित’ झाली आहे असंही म्हणता येईल. आणखी बरंचसं काही. आणि हे सारं शर्मिला फडके यांच्या लाघवी कथा-कथनातून. मराठी मायबोलीतून.
सारख्या (सम) जाडीच्या अक्षरांच्या (टाइप-सेटिंगच्या) निवडीसह, प्रत्येक पानावरील दोन कॉलम्समध्ये मजकूर काठोकाठ गच्च न भरता, प्रत्येक ओळीत, शब्द पूर्ण झाल्यावर उजवीकडे मोकळ्या सोडलेल्या जागेमुळे, कुणीतरी काहीतरी लिखाणात सांगत असल्याचा जिवंतपणा, वाचताना जाणवत राहतो, हे एक नकळत स्पर्शून जाणारं सत्य. दाद देण्यासारखं.
चित्रांच्या शेजारी वा शेजारच्या पानावर दिलेली माहिती व पृष्ठ क्रमांक, दुर्बिण न घेता, वयस्कर व्यक्तीला वाचता येण्याइतपत ठळक आणि ठसठशीत राखणं शक्य आहे का?
सुहास बहुळकर ही व्यक्ती आणि त्यांचे ‘न्यूडल्स’ दोन्ही एकदम भारदस्त. पाच-पन्नास अभ्यासू, हरहुन्नरी पानं. पन्नासएक वर्षापूर्वीच्या जेजेत मला नकळत घेऊन गेलेली. जुन्या झोपी गेलेल्या सुखद चित्तवृत्ती उल्हासित करणारी. रात-वैभवाच्या मंद-मधुर स्मृतींना जागवणारी उजाळा देणारी, अंती गंभीर विषयाचं तोल संभाळून विवेचन करणारी.
शोध नग्नतेचा, सु-दर्शन, ओलेती ते सरस्वती, असे शब्दप्रयोग आणि चित्रांभोवतीची प्रसिद्ध विद्वानांच्या मार्मिक बोधवाक्यांची पखरण, संपादकाच्या व्यापकतेचा आणि व्यासंगाचा दाखला देते.
‘ओलेती ते सरस्वती’, ‘त्यानं किंमत मोजावी’, ‘कलाकारानं विरोधाचं भानही ठेवायला हवं’, ‘समाजविरोधाची तयारी हवीच’, ‘त्यानं फुलझाड लावू नये’, ‘कलाकृती वैश्विक सौंदर्याच्या जवळ जाते’, ‘कलावंतानी जागरुक रहावं’, ‘त्याचे परिणाम कलावंतांना भोगावेच लागणार’ अशी परिसंवादातील शीर्षकंच बरंचसं काही सांगून जाताहेत.
गेली पंधरावीस वर्ष विविध माध्यमातून गर्जत राहणारं, एम. एफ. हुसेन हे काय गौडबंगाल आहे, ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर श्री. प्रभाकर कोलते यांनी सतरा-अठरा पानांत, नेमक्या आणि मोजक्या शब्दांत दिलं आहे. उलट-सुलट मतांचा-मतांतरांचा धांडोळा सहज सुलभरीत्या मांडला गेला आहे. हुसेन ह्या व्यक्तीमत्वाविषयीच्या इतर प्रशस्त आणि प्रचंड लिखाणातून ह्या व्यतिरिक्त अधिक काही मिळू शकेलसं वाटत नाही, असं म्हणणं उचित ठरावं. अधिक सांगणे न लगे.
सर्वसाधारणपणे मुक्त पण मधुर, उजळ पण स्वत्व राखून मिसळलेल्या अशा आकर्षक रंगछटा हे चित्र वा चित्रकलेचं एक प्रमुख वैशिष्ट्य. आणि ते छपाईच्या माध्यमातून दाखवायचं कसब हा पण सदर अंकाच्या प्रस्तुतीचा ठेवा. अभिनंदन.
प्रत्येक पान आणि पानावरील प्रत्येक चित्र अशा रंगीन कौतुकाला पात्र आहे. कदाचित फक्त माझं चित्र सोडून. रंगाचा गुणधर्म माहिती नसलेल्या व्यक्तीनं रेखाटल्यासारखं. जरुरीपेक्षा अधिकच गडद. काळपटपणाकडे झुकणारं. त्या चित्रातील रंग-महर्षी बेन्द्रे आणि अमृता-शेर-गिलच्या सखीच्या साडीचा रंग, हा शुद्ध व्हर्मिलियन रेड राखला गेला असता तर एकूण रंगसंगतीला न्याय मिळाला असतासं वाटतं. (समाधानकारकरीत्या परिपूर्ण नसली तरी मूळ चित्रात्र्या जवळपास असणार्या प्रकाशचित्राची प्रत, पडताळणीदाखल सोबत जोडली आहे.)
त्यामुळं दिग्गज अशा चित्रकारांच्या चित्राचं विडंबन (वा विद्रुपीकरण) केल्याच्या आरोपाची भिती, हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याचं उदाहरण, आणि अंकाच्या एकूण सुबकतेला गालबोट (वा तीट) , असा काहीसा प्रकार झालाय. असो. हेही एक औदासिन्याचं कारण असू शकेल, म्हणून कटू सत्यं नच ब्रूयात ह्या वचनाची आठवण असूनही सांगितलं इतकंच. राग मानू नये. तसं म्हटलं तर चित्रकला विश्वाच्या अशा बहारदार अंकातून छापिल-रंगीत स्वरुपांत अजरामर होणं, हीच खरी समाधानाची बाब.
अंकातील अशा पद्धतीच्या मांडणीची कल्पना असती तर आणखी एखादं, उभ्या घाटाचं चित्रं उजवीकडं सामावू शकलं असतं. सुधारणास वाव व मान्यता असल्यास, आणखी एका चित्राच्या फोटोची प्रत, सोबत जोडली आहे.
चित्राचा फोटो, त्याची सी. डी., फोटोग्राफर, कुरियरवाल्यांची टंगळ-मंगळ आणि नकारघंटा, पत्रव्यवहार गहाळ होणं, इत्यादीमुळं, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ अशी उक्ती मी श्री. प्रसाद चिटणीसजवळ व्यक्त केली होती. त्यामुळं शेवटच्या क्षणी स्वत:चा रंगीत फोटो पाठविण्याचं अवधानही राखता आलं नाही. ते आता पूर्ण करीत आहे, सोबत रंगीत छायाचित्र जोडून. असो. पण शेवटी गंगेत घोडं न्हालं खरं. तसं म्हटलं तर, काळ्या-पांढर्यातील दोघे-तिघे, सोबतीस आहेतच की. (सोबतच्या फोटोंच्या प्रती मोजक्याच असल्यानं, शक्य असल्यास परत मिळाव्यात अशी विनंती.)
जाहिरातीच्या अर्ध्या पानातील जागेच्या टंचाईला अनुलक्षून “किशोरावस्थेतील माध्यमिक शालेय रजांच्या काळांत वेदपठण, चित्रकला, राजकीय नेत्यांची तैलचित्रं, साइन-बोर्ड पेंटिंग इत्यादी छंद आणि व्यवसाय, तसंच हुतुतू आणि खो-खो ह्या खेळांत श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं, आठ-दहा वर्ष, मिरज-सांगली-सातारा-कराड-इचलकरंजी येथे भरलेल्या सामन्यातून कुशल खेळाडू वा सामनावीर म्हणून नैपुण्य पदकं’’ इत्यादींचा उल्लेख टाळला होता. पण १९५५ ते ६० दरम्यान जेजेमधील उल्लेखनीय अभ्यासक्रमांतर्गत, शिष्यवृत्त्या, पारितोषिके आणि आंतरमहाविद्यालयीन आणि वार्षिकोत्सवात मराठी नाटके, खेळ-क्रीडा स्पर्धेत नैपुण्यपदकं, तसेच बक्षिसपात्र चित्रांचा जेजे वार्षिक ‘रुप-भेद’ मासिकात व ‘धर्मयुग’ नियतकालिकात अंतर्भाव, इत्यादी सांगण्यासारखी माहिती दिली होती. तद्नंतरची दोन-एक वर्ष ‘म्युरल-पेंटर’च्या भूमिकेतील नोकरीचा काळ सोडून, १९६२ ते ९० अशा अठ्ठाविस वर्षांत, भारत सरकारच्या, नव्याने स्थापन होऊ घातलेल्या मरीन सर्व्हे विभागात, सर्वस्वी निराळ्या आणि अनभिज्ञ ड्रॉइंगच्या कार्यक्षेत्रांत हेड ड्राफ्टसमनच्या पदावरून इमानेइतबारे पण प्रशंसात्मक नोकरी केली. ह्या एकूण काळात “भाऊबंदकीत अनपेक्षितरीत्या राहत्या घराचा ताबा सोडावा लागणं, स्थलांतराची शिक्षा, लग्न व नव-परिणीत संसार-स्थापना, जोगेश्वरीतील गुफांच्या भोवतीच्या झोपडपट्टीतील चाळ ते बॅलार्ड-पियर येथील ऑफिस, हा रोजी उलट सुलट चार एक तासांचा प्रवास, आर्थिक चणचण, जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड प्रकल्पानिमित्त पाडू घातलेल्या चाळीतील चाळीस-पन्नास भाडेकरू रहिवासी शेजार्यांच्या वतीनं चार-पाच वर्ष कोर्ट-कचेर्या, हायड्रोसीलच्या शस्त्रक्रियेंतर्गत दिल्या गेलेल्या पेनिसिलीन इंजेक्शनच्या प्राणघाती री-अॅक्शनमधून वाचल्यानंतरही दोन अडीच वर्ष भोगाव्या लागलेल्या यातना, राजकीय आणीबाणी, पहिल्या-वहिल्या नवजात अपत्यासह तीन-चार जवळच्या नातलगांचा स्वर्गवास, अशा अंगभूत कलाकाराला दूर ठेवायला भाग पाडणार्या, हातात हात घालून आलेल्या सांसारिक आपत्ती आणि हालअपेष्टांच्या रडकथा सांगण्यासारख्या नसल्यानं त्या टाळल्या होत्या. विशेषत: जिद्द आणि तळमळ असेल तर अडीअडचणीतूनही आपलं इप्सित साध्य करता येणं शक्य असतं. हे सुचवण्याच्या उद्देशांत ‘अज्ञातवास’ अशा शब्दप्रयोगावर भागवलं होतं. पण टीचभर टाचणांत, अनाहुतपणं वा अनवधानानं नेमकं त्या मायनस-पाईंटवर बोट ठेवलं गेलंय. असो. झालं गेलं गंगेला मिळालं.
आता मात्र माझी म्हणून दाखवता येण्याजोगी शंभर सव्वाशे, लहानमोठ्या आकारातील आणि मूर्त-अमूर्त स्वरुपातल्या चित्रांची चळत, एकल प्रदर्शनाच्या तयारीत आहे. मदतगार अशा स्पॉन्सरशिपच्या टेकूची साथ मिळण्यावर अवलंबून आहे. गुणवत्तेखातर यश मिळण्याची खात्री आहे. नोव्हेंबर २००७ दरम्यान “चित्रं आणि चित्रकथन’’ ह्या नावाचा, माझ्या चित्रांचा, तेरा-चौदा पानी पुस्तकवजा कॅटलॉग मी आपणाकडे पाठवला होता, त्याचे स्मरण असेलच. (सीडीत असल्याने जरुर पडल्यास ई-मेल करेन.)
१९९१ मधील सरकारी सेवा निवृत्तीनंतरच्या गेल्या वीसएक वर्षात, चित्र-निर्मितीसह, बॉम्बे आर्ट सोसायटी ह्या संस्थेच्या विविध कार्यक्रमांतर्गत, वार्षिक प्रदर्शनं आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगीचे सूत्रसंचालन असे यशस्वी प्रयोग. ह्याच काळात स्वत:च्या शंभर सव्वाशे हस्तलिखित पुस्तकवजा कवितांचा संग्रह गठित. त्यातल्या काहींचं ४०/४५ मिनिटांचं स्वस्वरात ध्वनीमुद्रण, ’अक्षर-धन’च्या संमेलनातून काव्य गायन, पिताश्री गणेश रामचंद्र घाटे (प्रसिद्ध हस्तसामुद्रिक) आगळंवेगळं, बाळबोध पण अलौकिक व्यक्तीमत्व असलेल्या मातोश्रींचं “प्रसाद’’ नियतकालिकातून प्रसिद्ध झालेलं चरित्रलेखन, भावनोत्कट तालबद्ध मांडणीतून चितारलेलं योगीराज वडील बंधूंचं आणि बहिणीचं चरित्रलेखन, आणि ह्या सर्वांचं पुस्तकवजा संकलन आणि अलग अलग ध्वनीमुद्रण, घाटे घराण्याच्या मागील पंधराएक पिढ्यांचं (अडीच फूट लांबीचं) वंशावळ आराखडा संकलन व पन्नासएक पानी अभ्यासू कुल-वृत्तांत संकलन, असेही वेगवेगळे, कंबर कसून करावे लागणारे विविधांगी उद्योग समाविष्ट. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ ह्या उक्तीला काहीसा छेद देणारे. असो.
वय वर्ष ऐंशी पण डिप्रेशन-ऍसिडीटी अशा किरकोळ व्याधी सोडल्यास, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कार्यरत. घर ते कार्यशाळा असा रोजी २०/२५ किलोमीटरचा मोटार-सायकलवरून जॉय-रायडिंगचा सराव, रविवार धरून रोजी ४/५ तास रंगांत बुडून जाणारी अशी एकूण दिनचर्या.
मला वर्तमानपत्रातील चित्रकलासंदर्भाची कात्रणं जमवण्याचा नाद आहे. एम. एफ. हुसेन साहेबांविषयीची १५/१६ वर्षापासूनची ५०/६० कात्रणं जमली आहेत. त्यात सरस्वतीच्या ४/५ इंची रेखाचित्रांचा समावेश आहे. बॉम्बे टाइम्स (अनिल धारकर) ११.१०.१९९६, सण्डे-रिव्ह्यू (रणजित होसकोटे), २०.१०.१९९६; महाराष्ट्र टाइम्स (प्रकाश बुरटे), २७.१०.१९९६; आणि सरस्वती व दुर्गा-इंडिया-टुडे ३१.१०.१९९६ पण तुम्हाला ते मिळू शकलं नाही, हे एका अर्थी अंकाच्या दृष्टीनं बरंच झालं. जहांगीर आर्ट गॅलरीतील संजीव खांडेकर आणि बडोदा विद्यापीठातील चित्रकला विद्यार्थी ह्यांची उदाहरणं नजरेसमोर येतात. ‘शब्द’ २००७च्या दिवाळी अंकाकरता निवडलेले जोगेन्दांचे चित्र अंकाच्या दृष्टीने मुखपृष्ठावर न छापण्याचा संपादकांचा निर्णय हाही एक दाखला. (खरं तर, त्या चित्रातील नग्नतेपेक्षा विद्रुपशा चेहर्यावरील भेसूर भावच अधिक भयानक वा भितीदायक असल्यासारखे वाटतात, अशी मतं ऐकण्यात येतात. तसं म्हटलं तर, एक्झॉरशनिस्ट सारखे भयानक चित्रपट पाहताना झालेल्या अपघातांची तमा न बाळगता, अशा विषयानांही लोकप्रियता मिळते ही वस्तूस्थिती नजरेआड करता येत नाही. काणा-डोळा होऊ शकत नाही.) एके काळी झाकण्यासारखे असलेले वर्तुळाकार अवयव आता लो-वेस्ट तंग पँटस् व स्लीव्हलेस बनियनद्वारा दाखविण्याची प्रथा रुढ होत असली तरी, वा घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, लिव्ह-इन-रिलेशनशिप, समलिंगी विवाह, बिकिनी पोषाख, इत्यादींचं वारं नुकतं वाहू लागलं असलं तरी, गणेशोत्सव, पंढरी वा शिर्डीच्या नियमित यात्रा, कुंभमेळे, यज्ञ-हवनं, सणवार, उपास-तापास, व्रतं-वैकल्यं असे धार्मिक उत्सव अद्यापही हिरिरीनं साजरे करणार्या समाजाच्या गळी पडण्यासाठी, विशेषत: देव-देवतांच्या ऐच्छीक सादरीकरणाचं स्वातंत्र्य देण्याकरता बहुजन समाजाच्या मनाची बैठक बदलण्यास, कित्येक दशकांचा अवधी जाऊ द्यावा लागणार आहे. किमान भविष्यांत तसे घडण्याची आशा बाळगण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनही-
म्हणूनही, सदर अंक कुणाच्या, कुणा-कुणाच्या हाती न पडण्याची दक्षता घेण्याच्या शेवटच्या पानावरील सूचनेचं, सूचनेतील दूरदर्शीपणाचं आणि सावधानतेच्या मांडणीचं कौतुक करावंसं वाटतं. किमान वयपरत्वे मिळालेल कौतुक वा उपदेश करण्याचा अधिकार गाजवण्याचा मोह अटळ असतो असं म्हणतात. आणि त्यात वावगंही काही नसावं. असो.
श्लील आणि अश्लिल इत्यादींच्या वादांत पडण्याची माझी कुवत नसली तरी काही मूलभूत, तात्विक, परिणामस्वरुप विचार मनात डोकावतात. तसं म्हटलं तर, व्यक्ती-स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य अशा शब्द प्रयोगातील स्वातंत्र्य हा शब्दच स्वतंत्र नसतो. तो जसा व्यक्ती, अभिव्यक्ती किंवा मत ह्या शब्दांशी जोडलेला असतो, तद्वत ’’मर्यादा’’ ह्या शब्दाशी पण आपसुकरित्या बांधलेला असतो. जणू जोडगोळी. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून कुणीही, कुठेही, काहीही करायला मोकळा नसतो. कवींचे काव्यसंग्रह, लेखकांच्या कथा-कादंबर्या-नाट्यप्रयोग-चित्रकारांची चित्रनिर्मिती वा प्रदर्शनं ही फक्त स्वत:ची अभिव्यक्ती जोपासण्यापुरत्या नसून, समाजातील सर्वांनी त्याची अनुभूती घेण्याकरता, हे उघड आहे. म्हणून साहजिकच काही नैतिक-समाजशास्त्रीय मर्यादा अविभाज्य. समोर दुसरा असल्याशिवाय माझ्यातल्या मी-पणाला अर्थच उरत नाही, हे एक शाश्वत सत्य. लोकाभिमुखता, सौजन्य, संयम, सहिष्णुता, सामंजस्य, शालीनता, सु-संस्कृतता, शिष्टाचार, लोकादर वा लोकापवाद, असे मायबोलीतील शब्दप्रयोग केवळ भाषासौष्ठवापुरतेच मर्यादित असतात का?
तसंच तन आणि मन. जणू काही जुळी भावंडं. एकमेकास पूरक. एकमेकावर अवलंबून असणारी. शरिराचे विकार मनावर आणि मनातले विचार शरिरावर परिणाम करतात. त्यातून बरे-वाईट प्रसंग उद्भवतात. त्यामुळं काही प्रस्थापित नियमानुसार ह्या दोन्हीवर मर्यादा पडतात. शिवाय भौगोलिक वा नैसर्गिक वातावरणसुद्धा त्याचा एक भाग होऊ शकतो. शीत कटिबंधातील स्वातंत्र्य व त्याच्या मर्यादा ह्या उष्ण कटिबंधातल्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक शिथिल असू शकतात. कारण वातावरणांचे शरीरावर व मनावर होणारे परिणाम व त्यातून निर्माण होणारे प्रसंग हे तुलनात्मकरीत्या भिन्न असतात. नियम आणि अपवाद हे सुद्धा सांगोपांग ह्या शब्दानं जोडले जातात. म्हणून तर, ’अंग आणि उपांग’ ह्या जुळ्यांच्या बेमालुम मिश्रणांचं वा परस्परावलंबित्वाचं अस्तित्व आबाधित मानावं लागेल, हे एक चिरंतन सत्य. असो.
किती लिहावं तितकं थोडंच. कुठं थांबावं हे ज्याला समजतं तो कलाकार यशस्वी असं म्हणतात. अतएव आवरतं घेतो. त्यामुळं अशीही एक यशाची संधी, समाधान मानून घेण्याकरता अनायासे जाता-जाता उपलब्ध झालेली. असो.
अधिक उण्याबद्दल क्षमस्व. आपल्या हातून उत्तरोत्तर असेच चमकदार साक्षात्कार घडोत, ही प्रार्थना.
कळावे, लो. अ. ही. विनंती. पोच मिळावी.
आपला कृपाभिलाषी
घन:श्याम घाटे
ता.क. माझे बंधू डॉ. शरद घाटे ह्यांनी लिहिलेली, “सुंदरा मनामध्ये भरली’’ हे लावणी वाड्मयातील शृंगांर व ’’शृंगार-रस-आनंद-यात्रा’’ हे संस्कृत वाङ्मयातील शृंगार, अशी सदर विशेषांकामधील लिखाणाशी काहीशी निगडित, बहुचर्चित दोन पुस्तकं आपल्या वाचनांत आली असतीलच.