गेल्या वर्षी, दिनांक चार एप्रिल रोजी चित्रकार मुकुंद केळकर यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांची विद्यार्थिनी, शोभा पत्की यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली
"सर'
एक गुरुतुल्य चित्रकार मुकुंद केळकर गतवर्षी 4 एप्रिलला हे जग सोडून निघून गेले.
ते SNDT महिला विद्यापीठाचे निवृत्त डीन होते. अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं होतं. विद्यार्थिदशेपासून एक प्रयोगशील आणि चळवळी करणारा चित्रकार म्हणून ते ओळखले जात. ते सर्वांचेच मित्र होते. सहकारी, सहचित्रकार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, लहान, थोर आणि परिचित यांना ते मित्र, सल्लागार आणि धीर देणारे, मार्ग दाखविणारे गुरू वाटायचे. माझी त्यांची भेट 80साली, मी पुण्याच्या SNDT' मध्ये चित्रकलेच्या एम.ए. विभागात प्रवेश घेतला, तेव्हा झाली.
ते अचानक गेले, पण त्यांच्या काही आठवणी विसरता येत नाहीत. त्यांची हसतखेळत शिकवण्याची पद्धत, प्रौढ वयातही शिक्षण घेताना गोडी निर्माण व्हावी अशी होती. SNDT मध्ये त्या वेळी कोणत्याही पदवीधर स्त्रीला कोणत्याही वयात चित्रकलेचं पदव्युत्तर शिक्षण घेता येत होतं. याचा फायदा पुष्कळ जणींनी घेतला. त्यांची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती. ते अनेक प्रकारांनी काम करून दाखवत आणि त्यातून विद्यार्थिनींनी पाहिजे ते आत्मसात करायचं, हे त्यांना अभिप्रेत होतं. रोज 5 स्केचेस केल्याशिवाय जेवायचं नाही, हा मंत्र कायम लक्षात ठेवण्याविषयी त्यांचा आग्रह असायचा.
ते आम्हांला बाहेर स्केचिंगला घेऊन जात, तेव्हा त्यांचं जादूसारखं वाटणारं अप्रतिम जलरंग-चित्र साकारताना पाहायला मिळायचं. पण आम्हा बायकांना नेहमीच बाहेर जाऊन स्केचिंगला बसता यायचं नाही. लोक जमायचे, प्रॅक्टिस राहून जायची; म्हणून "राजा केळकर' संग्रहालयामध्ये स्केचिंग करण्याची परवानगी सरांनी घेतली होती आणि तिथूनच मला गती मिळाली. तिथल्या वस्तूंची स्केचेस करून, त्यांतील दिवे, अडकित्ते, वाद्ये आणि चित्रकथांतील फाटक्या पानांवरची चित्रे यांचा प्रतीकात्मक वापर करून मी चित्रं काढायला शिकले. माध्यमही वेगळंच वापरलं. रेझीन, प्लास्टर यांचा प्लायवूडवर वापर करून काचेसारखी दिसणारी चित्रं केली. MA च्या परीक्षेत मला प्रथम क्रमांक मिळाला होता आणि मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी प्रवेश मिळाला होता. ह्या नवीन माध्यमाचा केळकर सरांनी कल्पकतेनं उपयोग करून दाखविला होता. कधी पातळ असताना तारा टाकून, तर कधी जाड असताना थापून व कोरून तर कधी शिल्पाप्रमाणे आकार मोल्ड करून चित्रं बनवली. त्यावरून हिपॉक्सीची झळाळी दिली की चित्रं काचेसारखी दिसत, म्हणून त्याला आम्ही नाव दिलं "कोल्ड सिरॅमिक'. ही गोष्ट 1981 सालाची आहे.
माझं हे पहिलं चित्रप्रदर्शन मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत होतं. रात्रीरात्री जागून आणि मान मोडून काम केलं होतं. माध्यम अवघड होतं. पण सरांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन होतं म्हणून आत्मविश्र्वास होता. जे सांगतील, शिकवतील ते आत्मसात करत गेले. शेवटच्या दिवशी रात्री चित्रांना हिपॉक्सी लावले आणि मध्यरात्रीनंतर सगळ्या चित्रांवर धूसर थर आला. मी रडकुंडीला आले. रात्री 2 वाजता ह्यांना म्हणाले ""सरांना घेऊन यायचं का? नाहीतर उद्याच्या प्रदर्शनात काय?'' ह्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले, ""आत्तापर्यंत त्या माध्यमाविषयी सगळं शिकलीस. आता शांतपणे विचार करून काय ते कर.'' मग मी हातात ग्लोव्हज घातले आणि N.C. थिनरचा बोळा चित्रांवरून अलगद फिरवला आणि सगळी चित्रं आणखीन झळाळी घेऊन खुलून दिसायला लागली. फक्त गणपती काही धुक्यातून बाहेर येईना. तो लाल गणपती पांढऱ्या धुक्यातून डोकावत राहिला. दुसऱ्या दिवशी जहांगीरमध्ये श्री. बाबूराव साडवेलकरांनी त्यालाच हार घालून प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. प्रदर्शन अतिशय यशस्वी झालं. "वकिल्स'सारख्या दोन कंपन्यांनी कार्ड छापली. एअर इंडियानं चित्रं खरेदी केली. पुढे त्यांनी एक चित्र 2009च्या कॅलेंडरमध्येही प्रसिद्ध केलं. तो गणपतीही त्यात निवडला होता. पण प्रदर्शन संपल्यावर चित्रं उतरवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी भाऊबिजेची सुट्टी होती म्हणून एअर इंडियामध्ये जायचं ठरविलं. पण त्या दिवशी तो गणपती गॅलरीतून गायब झाला होता! पहिलाच गणपती! विकत गेलेला! आणि गायब! मी खूप चिडले. ही घटना प्रसिद्ध करणार म्हणाले. पण सरांनी समजावलं, ""असं होतंच असतं ... पुढं जायचं!''
दिल्लीत प्रदर्शनाची तारीख मिळाली! सरांचं प्रोत्साहन असायचंच. ""यश मिळालं म्हणून तेचतेच करत बसायचं नाही. सतत नावीन्याचा ध्यास असायला पाहिजे.'' मग ठरवलं ह्या चित्रकारालाही बरोबर घ्यायचं. यश त्यांच्या संशोधनाचं आणि मार्गदर्शनाचं आहे. काय हरकत आहे दोघांनी मिळून प्रदर्शनं केली तर! 1982मध्ये इप्टा संस्थेतर्फे पु.शं.पतके यांनी कॅनडामध्ये चित्रप्रदर्शन करण्याचं आमंत्रण दिलं आणि आम्ही अशी प्लायवूडवरचीच चित्रं घेऊन गेलो. प्रदर्शनाला जरा हटकेच नाव दिलं होतं, "Yesterday & Tomorrow Today' "काल आणि उद्याचे आजच' नव्या जुन्याचा संगम. भारतीय चित्रकलेचा नावीन्यपूर्ण आविष्कार! "आर्ट स्पेस' नावाच्या गॅलरीत प्रदर्शन मांडलं होतं. "हिट' झालं! म्हणून आत्ताच्या गॅलरीला आणि स्टुडिओला "आर्ट स्पेस' हे नाव दिलं आम्ही.
1984साली दिल्लीत "इन्साइट 84' नावानं ह्याच माध्यमातील चित्रप्रदर्शन केलं. त्या वेळी एक चित्रफलकावर तिरप्या अर्ध्या-अर्ध्या भागात दोघांनी चित्रं केली. हे चित्र केवळ मा.इंदिरा गांधींसाठी केलं होतं. त्यांच्या कारकिर्दीतील अणुयुगाचा प्रगतिशील वेग (अश्र्ववेगाच्या स्वरूपात) आणि ग्रामीण विकासाच्या योजनांचा प्रतीकात्मक अविष्कार पारंपरिक चित्रशैलीतून आम्ही मांडला होता. बॅ.विठ्ठलराव गाडगिळांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि पंतप्रधानांच्या ऑफिसमधून आम्हांला बोलावल्याचा फोन आला!
मा.इंदिरा गांधींना चित्र खूप आवडलं. त्यांनी प्रदर्शनास भेट द्यायला सोनिया गांधींना पाठविलं आणि दहाच दिवसात इंदिराजींवर मृत्यूनं झडप घातली!
त्या प्रदर्शनानंतर मात्र ह्या माध्यमाच आम्हा दोघांच्या चित्रावर वेगवेगळे ठसे उमटले.
अत्यंत जोशपूर्ण आविष्काराचा तो काळ होता. रेझीन, फायबर ग्लास, धातू ह्या अवजड वस्तूंचा वापर करून त्यांनी चित्रं आणि म्यूरल्स बनवली.
आता त्यांचं लक्ष कॅनव्हासवर केंद्रित झालं होतं. त्यांना सतत नवीन विषयाचा विचार करायचा असायचा.
नंतर कॅनव्हासच्या ह्या खेळातून सरांनी पावसाची चित्रं रंगवली. माध्यमांच्या बरोबर उमटणारे ते रंगांचे परिणाम पावसाच्या सरी घेऊन आले. त्यात चिंब झालेला निसर्गही सर्जनात्मक आविष्कारात उमटला. मुंबईत जहांगीरमध्ये त्यांचे "मान्सून'' हे चित्रप्रदर्शन अत्यंत उत्तम सर्जन चित्राविष्कार घेऊन आलं. समीक्षक ज्ञानेश्र्वर नाडकर्णी यांनी वर्तमानपत्रातून स्तुती केली होती. पण प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकही चित्र विकलं गेलं नव्हतं. मी खूप नव्हर्स झाले होते. खूप आश्र्चर्य वाटत होतं आणि निराश वाटत होतं. पण सर म्हणाले, ""हा प्रदर्शनाचा खेळ असाच असतो. त्यावर विश्र्वास ठेवायचा नाही. आपण आपल्या आविष्काराशी प्रामाणिक राहायचं.'' ज्ञानेश्र्वर नाडकर्णीनांही वाईट वाटत होतं. ते सरांना म्हणाले, ""चला आज मी तुम्हांला चहा पाजतो. नेहमी तुम्ही पाजता!'' स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून, हसत-हसत ते जीवनाला सामोरं जायचे.
बक्षिसाची अपेक्षा नाही की स्तुतीची ओढ नाही. पुढं ती सगळी चित्रं विकली गेली, हे सांगायलाच नको. त्यातलं एक तरी ठेवलं असतं, तरी बरं झालं असतं असं आता वाटतंय.
एका प्रदर्शनात त्यांनी श्रेष्ठ चित्रकार हुसेन यांच्या "श्र्वेतांबरा' प्रदर्शनावर आधारित चार चित्रं काढली होती. त्यावर सबीर जलालाबादी नावाच्या कवीनं दोन-दोन काव्यपंक्ती लिहिल्या होत्या. प्रेक्षकांमध्ये अतिशय चर्चेचा विषय झाला होता. एका चित्रात हुसेन ह्यांचा चेहेरे, एक तळहात वरच्या दिशेला, एक खालच्या दिशेला. त्यावरून आलेले रंगांचे ओघोळ चर्च, मंदिर, मशीद ह्यांच्या रेखाटनांवरून ओघळलेले आहेत. मध्ये श्र्वेतांबरात लावलेल्या पांढरा कापडाचा झोळ. असं कंपोझ केलेलं हे चित्र तरल तैलरंगात कॅनव्हासवर आणि एकाच रंगसंगतीत केलेलं, त्यावर जलालाबदींनी लिहिलं-
""उसने, उसने कफन उडाकर एहसास ये दिलाया।
कुछभी नही जहॉंमे, बाकी है नाम तेरा।''
त्यांच्या संवेदनशील मनावर आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांचा परिणाम व्हायचा. त्यांच्या स्केचबुकमध्ये भूकंप झालेल्या घटनेवर किंवा रामजन्मभूमीच्या संघर्षाच्या वेळी अस्वस्थ अवस्थेत केलेली स्केचेस सापडतात.
निसर्गातून संवेदना घेऊन केलेली अनेक चित्रं त्यांनी कॅनव्हासवर, कागदावर, स्केचबुकमध्ये काढली. ""नेचर दि इंटरनल फाउंटन हेड'' ह्या शीर्षकाची अनेक चित्रं सतत अवतरली.
कधीतरी त्यात एखादी गझल असावी तशी स्त्रीची आकृती यायची. कधी तरी बंधमुक्त अश्र्वाला लगाम घालणारी किंवा त्यावर आरूढ झालेली किंवा ओलेती किंवा विरहिणी! मनाच्या हळुवार छटा त्यात उमटायच्या ह्या कॅनव्हासवरच्या चित्रांमध्ये. पण काही चित्रं पळवून नेली गेली. चित्रं झाल्यावर कुणी नेलं, कसं नेलं, ह्याकडे त्यांचं लक्षच नसायचं. मग मीच लक्ष घातलं आणि आमच्या स्टुडिओला "आर्टस्पेस' गॅलरी असं नाव जाहीर केलं. तिथं लोकांना चित्रं पाहायला आणि विकत घ्यायला येता येऊ लागलं.
हल्लीहल्ली ते फक्त देवळांची चित्रं तैलरंगात मोठ्या आकारात करीत होते. देवळात गर्दी करून जाणाऱ्या भाविकांची त्यांची चित्रणं फार भावतात. त्यात जवळून पाहिलं तर स्ट्रोक्स कळतंच नाहीत पण जरा लांबून पाहिलं की माणसांचे अनेक नमुने दिसतात. काही चित्रांमध्ये नॉस्टॅलजीया आहे. एखादं जुन्या पुण्याचं चित्र असावं असं वाटतं.
शेवटच्या चित्रांमध्ये नाशिकचा घाट, देवळांची जोडी, पाण्याचं कुंड, मागची झाडं, त्यावरचा आणि कळसांवरचा प्रकाश, भाविकांची लगबग हे सर्व मन भारावून टाकतं. तर जेजुरीच्या देवळात हळदीचा उडालेला भंडारा, देवळाचं अप्रतिम रूप, दीपमाळ आणि माणसांची गर्दी दाखवताना रंगांच्या नुसत्या शिंपण्यातून केलेली निर्मिती चक्रावून टाकते.
जवळच्या दत्तमंदिराचं शिखर दिसतं आहे. उंच आणि खाली मंडईची गडबड, अनेक दुकानं, माणसं. लाल छत्रीखाली भाजी मांडून बसणारे, सगळं काही! चित्राचा रंग मात्र प्रमुख्यानं गुलाबी आणि आकाशही गुलाबी!
ह्या सगळ्या चित्रांत त्यांनी ब्लेड आणि नाइफ ह्यांच्या साहाय्यानं रंगलेपन करून प्रत्येकाला वेगवेगळ्या तऱ्हेनं अप्रतिम साकारलं आहे. त्यांचं शेवटचं वाईच्या घाटाचं चित्र अपुरंच राहिलं.
मी त्यांना चिडवायची- ""काय सारखे देवळात आणि घाटावर जाताय? चित्रातून सध्या.'' तर म्हणायचे ""आता मी चाललो, येणार नाहीये.''
आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की, ""उद्यापासून येणार नाहीये.'' मी रागावून म्हणाले, ""असं काहीतरी बडबडायचं नाही.'' आणि खरोखरीच परत नाही आले! छोट्याशा आजाराने हॉस्पिटलमध्ये गेले आणि परतलेच नाहीत.
त्यांची चित्रं इथं "आर्टस्पेस'मध्ये एक-एक नमुना म्हणून आहेत. 6फूटांपासून 6इंचांपर्यंत. ते म्हणायचे माझं म्युझिअम करा. त्याप्रमाणे त्यांच्या आविष्काराचा एक-एक नमुना म्हणून त्यांची चित्रं इथं आहेत. 28वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं पद्मश्री दिनकर केळकर व त्यांच्या पत्नीचं पोटेर्रट, एक उत्तम कलाकृती आहे. त्यातील तलम साडीचा पोत, कोटाचा जाडा भरडा पोत, शर्ट, स्वेटर यांचे वेगवेगळे पोत, डोळ्यांतील भाव, चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या आणि केसांचं बारीक चित्रण हे सारं अभिजात कलेचा नमुनाच आहे. तर रंग ओतून केलेल्या चित्रांमधून उमटलेलं निसर्गचित्रण आहे.
जलरंगातील चित्रं तर त्यांचं माध्यमावरचं प्रभुत्व दाखवते आणि दृश्यातील सखोल भाव पाहणाऱ्याला त्या ठिकाणी ओढून नेतो. ओल्या रंगावर ओल्या रंगांचे केलेले काम सहज मुलायम वाटतं. थोड्याशा ब्रशस्ट्रोकने संपूर्ण वातावरण निर्मिती झालेली असते. जाणकार आणि पाहणारे हरखून जातात.
मी आता त्यांची चित्रं कोणालाही देत नाही. ती सर्वांना पाहण्यासाठी संग्रहालयात जावीत की खूप किमतीला विकावीत !!!
म्हणायचे, ""मी गेल्यावर जगाला कळेल.'' तसं झालं पाहिजे!
सौ. शोभा पत्की
sapatki@gmail.com