महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत साहित्य, संगीत, नाट्य या कलांची सादरी करणं, संमेलनं, चर्चासत्र, कार्यशाळा वरचेवर होतच असतात. यांच्या तुलनेत दृश्य कलेचे (चित्रकला, शिल्पकला) दृश्य अधिक विस्तारले जावे ही आकांक्षा पुण्यातील चित्रकारांच्या मनात अनेक वर्षांपासून होती. दृश्य कलेच्या प्रचार व प्रसारासाठी ही अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात साकारली गेली ती पुण्यातील कै. ज. द. गोंधळेकर प्रतिष्ठानच्या सक्रिय पुढाकारानं!
प्रसिद्ध चित्रकार गोंधळेकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेली २७ वर्षे सातत्यानं ज्येष्ठ चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरविणार्या या प्रतिष्ठाननं मात्र या वर्षी पुणे व पुणे परिसरातील चित्रकारांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार श्री.व्ही. एस. कुलकर्णी यांचे दीर्घकालीन प्रयत्न त्या मागे आहेत. सर्व चित्रकारांना एकत्र आणून सगळ्यांचं एक नेटवर्क तयार करावं, एकमेकांत स्नेहभाव वाढून कलाविषयक विचारांचं आदान प्रदान होणं, हा या मागचा उद्देश असल्याचं ते म्हणाले.
‘कलाछाया’ संस्थेच्या ‘दर्पण’ कलादालनाच्या परिसरात दि. २७ फेब्रुवारीला हा मेळावा भरला. दोन सत्रांत विभागल्या गेलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज. द. गोंधळेकरांच्या कलाप्रवासाचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर पं. भीमसेन जोशी व चित्रकार मुकुंद केळकर यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्री.नवनीत देशपांडे यांच्या हस्ते गोंधळेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. श्री.कुलकर्णी यांनी प्रतिष्ठाननं आजवर आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. इतक्या मोठ्या संख्येनं चित्रकार प्रथमच एकत्र येत असल्यानं काहीतरी ‘नवनीत’ हाती लागेल. मात्र तरुण चित्रकारांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांचं सांकेतिक मनोगत लक्षात घेत आपल्या भाषणात श्री.नवनीत देशपांडे यांनी उपस्थितांना ‘सकाळ’ तर्फे आश्वस्त केलं. ‘‘नानासाहेब परुळेकरांनी सुरू केलेल्या परंपरेची जाण ठेवत ‘सकाळ’ अशा विधायक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देईल’’ असं ते म्हणाले. ‘‘चित्रकला हा व्हिज्युअल मिडीया आहे; पण त्याकडे फार दुर्लक्ष होतं. रसिक व चित्रकार यांच्यात संवादाचा पूल बांधायला हवा. अशा उपक्रमांसाठी सामूहिक मानसिकता महत्त्वाची भूमिका बजावत असते. दृश्य कलेच्या प्रचार व प्रसाराकरिता आपल्या काही योजना असल्यास त्या जरूर कळवा, त्यांना दै.सकाळ मध्ये जागा देऊ’’ असं आश्वासन त्यांनी दिलं. दृश्यकला क्षेत्रातील विविध उपक्रमांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळणार ही या क्षेत्रातील एक नवी ‘सकाळ’ ठरेल, अशी आशा आहे.
पहिल्या सत्रात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री.शि.द. फडणीस यांची खुमासदार मुलाखत श्री.सदानंद चांदेकर यांनी घेतली. व्यंगचित्रांचं विश्व व त्याच्याशी संबंधित प्रश्नांना श्री.फडणिसांनी दिलेल्या उत्तरांनी त्यांच्या कलाप्रवासाचा पट उलगडला गेला. मुलाखतीत प्रत्येक कलावंताला विचारण्यात येणारा, ‘एखादी कल्पना कशी सुचते?’ या सनातन प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले, ‘‘...शोध घेण्याची प्रक्रिया असते ती... इथं रेडिमेड कल्पना नसतात! ...फॅन्टसीच्या अंगानं जाणार्या त्या कल्पना असतात!’’ चित्राच्या दर्जाइतकीच रसिकाची वैचारिक प्रगल्भता, कलाभिरुची श्रेष्ठ ठरते, याचा वेळोवेळी प्रत्यय आल्याचं ते म्हणाले. मुलाखतीदरम्यान अशी काही सुभाषितवजा वाक्यंही ऐकायला मिळालीत. ही मुलाखत म्हणजे एका ‘हसर्या गॅलरी’ची ‘हसरी उठाठेव’ ठरली. तिचं स्वरूप अनौपचारिक असल्यानं सदानंदी ठरली!
दुसर्या सत्रात प्रसिद्ध शिल्पकार श्री.शरद कापुसकर यांचा परिचय ज्येष्ठ चित्रकार. श्री.जयप्रकाश जगताप यांनी करून दिला. प्रतिकूल परिस्थितीत कलाशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी दशेपासून ते प्रथितयश शिल्पकार म्हणून नावलौकिक प्राप्त होईपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचं मार्मिक विवेचन त्यांनी केलं. त्यानंतर कापुसकरांनी व्यक्तिशिल्पाचं प्रात्यक्षिक दिलं. ज्येष्ठ शिल्पकार श्री.दिनकर थोपटे यांचं शिल्प घडविल्यानंतर त्यांनी रसिकांशी साधलेला संवाद एकूणच शिल्पकारिता क्षेत्राविषयी ‘त्रिमित दृष्टी देणारा ठरला शिल्पांकनाचे वेळी त्यांची माती लावण्यातील सहजता योग्य प्रमाणातील लयदार व सुडौल आकार, मातीच्या लवचीकपणाचं दर्शन, या सर्वांतून त्यांचा उत्स्फूर्त आविष्कार शब्दातीत ठरला! एक छान व्हिजुअल ट्रीट मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसला. ‘कलाछाया’च्या संस्थापिका ज्येष्ठ कथक नर्तिका श्रीमती. प्रभाताई मराठे व श्री.भरत जंगम या वेळी उपस्थित होते. श्री.थोपटे यांचा प्रभाताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्तरार्धात, दृश्यकलाक्षेत्राशी संबंधित विषयांवर आधारित खुल्या चर्चेचं सूत्रसंचालन ज्येष्ठ चित्रकार श्री.मुरली लाहोटी, श्री.जगताप व श्री.फडणीस यांनी केलं. मान्यवरांनी दिलेल्या सादाला, प्रतिसादही उत्तम मिळाला! उपस्थितांनी आपल्या भावना, प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विचार मांडले, काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. त्यात चित्रकारांच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. चित्रकार, शिल्पकारांची सूची तयार करावी, दृश्यकलाविषयक घडणार्या घडामोडींची उपक्रमांची माहिती देण्यासाठी बुलेटिन सुरू करावं, चित्रकारांच्या रजिस्ट्रेशनसाठी कमिटी तयार करावी. कला अकादमीच्या सरकारमान्यतेसाठी विविध पातळीवर विधायक प्रयत्न केले जावेत, असं सुचवलं गेले. या चर्चेनं महाराष्ट्रात स्वतंत्र कला अकादमी स्थापन व्हावी याबाबत उपस्थितांचं एकमत झालं. इतर राज्यांत कलावंतांना पुरविण्यात येणार्या सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, कला प्रदर्शनासाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणारी कलादालनं, कला शाखेतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च कलाशिक्षणासाठी मिळणार्या सुविधा इत्यादींचा तौलनिकदृष्ट्या विचार करता महाराष्ट्रात या सोयी नसल्यानं स्थानिक कलावंताची पीछेहाट होत असल्याचा सूरही आळवला गेला.
स्वतंत्र कला अकादमी व्हावी ही मागणी काल-परवाची नसून ती होण्यासाठी संबंधितांनी गेली अनेक वर्षे खर्ची घातली आहेत; पण त्यातून फलनिष्पत्ती झाली नसल्यानं आत्ता ध्येयपूर्तीसाठी आपणा सर्वांची सकारात्मक संघभावना फार आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचं ‘लक्ष’ वेधण्यासाठी आपलं ‘लक्ष्य’ एक असावे ही सूचना केली. त्यासाठी भविष्यकाळात सर्वार्थानं प्रयत्न करण्याची जाणीव या मेळाव्यानं प्रत्येक चित्रकाराच्या मनात निर्माण केली. इतर कलाक्षेत्रात संमेलनं चर्चासत्रं वारंवार होतात म्हणून आम्हीही असा ‘घाट’ घालावा, असा आमचा अट्टाहास नसून या क्षेत्राच्या स्वतंत्र गरजा आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी भरीव कार्य करणं ही आमची भूमिका असल्याचा पवित्रा या मेळाव्यानं घेतला.
जागतिकीकरणाच्या प्रचंड वावटळीत भारतीय चित्रकलेची ‘दशा’व ‘दिशा’ याबाबतही विचारमंथन झालं. खुली चर्चा असल्यानं अगदी ‘कलेच्या व्याख्येपासून’ ते ‘इन्स्टॉलेशन’पर्यंत असा विविध अंगांचा धांडोळा घेण्यात आला. कलाप्रदर्शनं, प्रात्यक्षिकं कलासमिक्षणं, ‘हौशी’ ते ‘व्यावसायिक’ चित्रकार, शालेय तसंच उच्च कलाशिक्षणात सैद्धान्तिक विषयांचं ‘महत्त्व व माहात्म्य’, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व त्याची मर्यादा. असे अनेक विषयही चर्चेत हाताळण्यात आले. श्री नंदकिशोर घाडणेकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. थोडक्यात मेळाव्यास उपस्थित विचारप्रसारक व विचारप्रसारणार्थी यांच्यामध्ये एक दुवा प्रस्थापित झाला व चर्चेच्या उत्तरार्धात तो बंध बळकट. होऊन एकात्मतेची भावना निर्माण झाली. हे या उपयोजनांचं फलित म्हणावं लागेल. अर्थात चित्रकारांचा हा स्नेहमेळावा नजीकच्या काळात होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय चित्रकार संमेलनाची नांदी ठरावा.
प्रा. पंकज. वि.भांबुरकर
पुणे
Email : bhamburkar.pankaj@gmail.com.