फक्त १०० दिवसांत
नाबाद २,००,००० (हिट्स)!
२४ वर्षांपूर्वी ‘चिन्ह’ सुरू करताना ते एक उत्कृष्ट दर्जाचं ‘आर्ट मॅगझिन’ म्हणून प्रसिद्धीला यावं हेच प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं. त्यावेळी संगणक आपल्याकडे नुकताच येऊन स्थिरावला होता. इंटरनेट, संकेतस्थळ, ब्लॉग, फेसबुक वगैरेंचा शोध लागायचा होता. त्यामुळे उद्दिष्ट खूपच मर्यादित होतं. पण तरीसुद्धा ते गाठता गाठता रौप्यमहोत्सवी वर्षं कधी जवळ येऊन ठेपलं काही कळलंच नाही. आता मात्र ‘चिन्ह’चं एक परिपूर्ण “आर्ट मॅगझिन” प्रसिद्ध करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात यायला फक्त थोड्याच दिवसांचा अवधी उरला आहे.
दरम्यानच्या काळामध्ये जागतिकीकरण झालं आणि संगणक क्रांती अवतरली. पाठोपाठ आलेल्या, संपर्क आणि दळणवळणाच्या तसंच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीनं तर मुद्रित माध्यमांचं स्वरूपच पालटून टाकलं. ‘चिन्ह’चं या उलाढालींकडे बारकाईनं लक्ष होतं. (२४ वर्षांपूर्वी पहिला अंक प्रसिद्ध करताना ‘चिन्ह’नं चक्क मराठी टाईपरायटरचा वापर केला होता.) म्हणूनच ‘चिन्ह’नं माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात अवतरलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं.
www.chinha.in या संकेतस्थळाची निर्मिती हे पहिलं पाऊल होतं. संकेतस्थळ म्हणजे काय? ते कशाशी खातात? याचं जुजबी ज्ञान नसतानाही संकेतस्थळाच्या कामाला सुरूवात झाली. सहा – सात महिने त्यातच गेले. पण त्याची कारणं वेगळी होती. (त्याविषयी कधीतरी सविस्तर लिहायचं आहेच.) १५ नोव्हेंबर २०१० रोजी ‘चिन्ह’चं संकेतस्थळ रीतसर सुरू झालं. ते काम पूर्ण झाल्यावर नवीन अंकाच्या कामास सुरूवात करायची असं आधी ठरलं होतं. त्याप्रमाणे संकेतस्थळाचं काम पूर्ण होताच संबंधित सर्वांनीच सहा – सात महिन्यानंतर पहिल्यांदाच दोन तीन दिवसांची छान रजा घेतली आणि ‘चिन्ह’च्या आगामी अंकाच्या कामाला हात घातला. पण इथं तर काही भलतंच घडून गेलं होतं.
कुठलीही जाहिरात नाही, कुठल्याही वृत्तपत्रात बातमी नाही, कुठलीही संपर्क मोहिम नाही अशी सगळी परिस्थिती असताना पहिल्याच दिवशी ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला एक नाही, दोन नाही तब्बल ५००० हिट्स मिळाल्या होत्या; त्याही फक्त मुंबई अथवा महाराष्ट्रातून किंवा फक्त भारतातून नाही तर संपूर्ण जगभरातून आल्या होत्या. विश्वास बसू नये अशी सारी परिस्थिती होती.
आपल्याला यातलं तांत्रिक ज्ञान नसल्यानं आपला काही गैरसमज झालाय की काय असंही वाटू लागलं होतं. संकेतस्थळाशी संबंधित सारेच अक्षरश: चकरावून गेले होते. म्हणून मग संकेतस्थळ तज्ज्ञांशी फोनाफोनी सुरू झाली, विचारणा सुरू झाल्या. ‘हिट्स’ म्हणजे काय?, व्हिझिट्स म्हणजे काय? वगैरे माहिती घेणं सुरू झालं, एका तज्ज्ञाच्या मतावर विश्वास बसेना म्हणून दुसर्याला विचारणं सुरू झालं. त्या दिवशी ज्या ज्या तज्ज्ञांना आम्ही गाठलं त्या त्या तज्ज्ञांचं एकच उत्तर होतं “तुम्हाला पहिल्या दिवशीच ५००० हिट्स मिळाल्या आहेत.” त्यांच्या प्रत्येक उत्तरागणिक आम्हाला नवनवीन ज्ञानही मिळत होतं आणि आश्चर्याचे प्रचंड धक्केही बसत होते. कधीच विसरता येणार नाही असा तो अनुभव होता.
दुसर्या दिवशी पुन्हा तेच घडलं. तिसर्या दिवशीही तेच झालं. चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशीही तेच घडलं. फरक इतकाच होता चौथ्या दिवशी ती संख्या ५००० वरून थेट ९००० पर्यंत पोहोचली. इतकंच नाही तर चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संकेतस्थळ चक्क बंद पडलं. सारे अक्षरश: हवालदिल. चौकशी केल्यावर असं कळलं ‘चिन्ह’चं संकेतस्थळ पाहण्यासाठी आंतरजालावर असंख्य सर्व्हरसवरून जगभरातल्या असंख्य लोकांनी अक्षरश: एकाच वेळी, एकाच क्षणी लॉग इन केल्यामुळे संकेतस्थळ, संगणकाच्या भाषेत “हँग” झालं! त्यामुळे इंटरनेटवर संकेतस्थळासाठी जी बॅंडविड्थ आरक्षित करण्यात आली होती ती वाढवावी लागली. पाचव्या, सहाव्या, सातव्या दिवशी सकाळी उठल्यावर हाच उपद्व्याप संकेतस्थळाशी संबंधितांना करावा लागला. हे प्रकरण जेव्हा फारच हाताभार जाऊ लागलं तेव्हा ज्या एजन्सीकडून बॅंडविड्थची सुविधा घेतली होती तिच्याकडून (संपूर्ण वर्षाचं शुल्क भरलेलं असतानासुद्धा) नाईलाजास्तव ते काम काढून घेऊन दुसर्या एजन्सीला द्यावं लागलं. त्यामुळं थोडासा आर्थिक तोटा सोसावा लागला पण संकेतस्थळ बंद पडण्याची घटना नंतर आजतागायत कधीच घडली नाही.
१५ नोव्हेंबरपासूनच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ५०,००० हिट्स नोंदवल्या गेल्या होत्या. हे सारं अवाक् करणारं होतं. ज्या अंकांचे २४ वर्षांत अवघे तेराच अंक निघाले, ज्यांची प्रिंट ऑर्डर प्रत्येकी २००० असावी म्हणजेच १३ गुणिले २००० = २६,००० प्रती इतकीच असताना त्याच अंकाच्या संकेतस्थळानं सुरू होतानाच्या पहिल्या आठवड्यातल्या फक्त सहा – सात दिवसांतच तब्बल ५०,००० हिट्स (तेही तीन ते चार वेळा तास, दोन – दोन तासांसाठी वर्दळीमुळे बंद पडले असताना) मिळवाव्यात हे सारं संकेतस्थळाशी संबंधित सार्यांचीच मती कुंठित करून टाकणारंच होतं. तो सिलसिला त्यानंतर अगदी आजतागायत तसाच चालू राहिलेला आहे. आज दि. २८ फेब्रुवारी २०११ पर्यंत म्हणजेच गेल्या १०० दिवसांत या संकेतस्थळाला जगभरातल्या जवळजवळ सर्वच देशांतून दोन लक्ष हिट्स मिळाल्या आहेत. ही अतिशयोक्ती नव्हे किंवा जाहिरातबाजीही नव्हे ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाची जेथे नोंदणी करण्यात आली आहे त्या एजन्सीची ही आकडेवारी आहे. ती तपासून घेण्यासाठी ‘गुगल अॅनॅलिटिकल’ची मदतही घेण्यात आली. या दोघांच्या आकडेवार्या तपासूनच ही संख्या ‘चिन्ह’ जाहीर करत आहे.
‘चिन्ह’च्या प्रत्येक अंकाची निर्मिती ही निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येकालाच प्रचंड ऊर्जा देणारी घटना असायची पण नंतरचा साराच खटाटोप हा प्रचंड मनस्ताप देणारा ठरायचा याला काहीसा अपवाद फक्त गेला अंक ठरला. या पार्श्वभूमीवर ‘चिन्ह’चं संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर घडलेल्या, घडत आलेल्या सर्वच घटना या केवळ आश्चर्यकारकच नव्हेत तर उत्साह आणि उमेद वाढविणार्या ठरल्या आहेत, यात शंकाच नाही. ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला दोन लक्ष हिट्स देणार्या सर्वांचेच जाहीर आभार!
(उद्याच्या उत्तरार्धात वाचा : ‘चिन्ह’ लवकरच दररोज प्रसिद्ध होणार!)