Friday, November 10, 2017

' गायतोंडे ' ग्रंथ : उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाग २

निम्याहून अधिक प्रतींचं वितरण आता पार पडलंय. ग्रंथ असलेल्या कोरोगेटेड बॉक्सचं वजन जवळ जवळ दीड किलो असल्याने कुरियरनं प्रती पाठवण्यावर मर्यादा येतायत. ज्यांना हे काम दिलंय त्या कुरियर कंपनीनं देखील एकूण प्रेझेंटेशन पाहून रोज ५० पेक्षा अधिक प्रती स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच पाठवलेला ग्रंथ खराब अवस्थेत पोहोचले वगैरे इत्यादीच्या तक्रारी अद्याप आलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे अद्याप ग्रंथ पोहोचले नाही त्यांना ते जास्तीत जास्त लवकर पाठवण्याच्याच प्रयत्नात आम्ही आहोत याची कृपया नोंद घ्यावी. ज्यांच्याकडे प्रती पोहोचल्या आहेत त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद येतो आहे. त्याचे काही नमुने आपण गेल्या पोस्टमध्ये वाचले होते. आता हा दुसरा भाग जरूर वाचा.

प्रिय सतीश
गायतोंडे सुखरूप पोहचले. गेल्या काही दिवसातला एडिटिंगचा थकवा पार घालवला. खूप बरं वाटलं ग्रंथ चाळताना. अधलंमधलं वाचताना. तू आणि तुझ्या टीमने काय प्रकारचे कष्ट घेतले त्याची कल्पना आली. पण खूप मोठं काम केलंस. अभिनंदन आणि आभार ! वाचून होताच सविस्तर लिहिन.
अशोक राणे, मुंबई

अभिनंदन ! ग्रंथ सर्वांगसुंदर झाला आहे. गायतोंडेत कंटेंट व फाॅर्मचा उत्कृष्ट मिलाफ झालेला दिसतो आहे. कुणा दिग्दर्शकाला वा निर्मात्याला ह्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर फिल्म बनवण्याची स्फूर्ती मिळाली तर नवल वाटायला नको.
श्रीरंग रेगे, संचालक, एडीट सिलीका

Long awaiting Gaitonde book received 1 2 June read supplement I am overwhelmed to see pains& efforts you have taken to fulfill dream How you have love & regards to unknown U have taken tiredless efforts to bring him in limelight A foresight is needed to realize & appreciate Ones work without any benefits have same feeling about him hence I felt to have his book hence registered for same u may believe or not we had some relations with him in previous birth Gaitondebook is beyond admirable Hats off for ur tedious & painful work Best wishes for ur future task & I pray That almighty God offer u long & healthy life
प्रॉ. डॉ. वैजनाथ बाले, उस्मानाबाद

धन्यवाद ! गायतोंडे मिळले इतक्या दिवसांची वाट पहाणे सार्थकी लागले धन्यवाद अप्रतिम काम आणखी एखादा नवा प्रोजेक्ट हाती घेण्यासाठी शुभेच्छा
जयंत गुणे, मुंबई

नाईक साहेब, तुम्हाला सलाम ! अप्रतिम !!!
Ad. माधव जोशी, पुणे

भरपूर उशीर झाला, पण ' गायतोंडे ' ग्रंथ अप्रतिम. धन्यवाद !
श्रीराम जोग, इंदोर

उत्कृष्ट छपाई, उत्कृष्ट बाईंडिंग, उत्कृष्ट डिझाईनिंग, उत्कृष्ट पेपर क्वालिटी.
विजय कानडे, नाशिक

Super Book !
मुरलीधर सारडा, पुणे

ग्रंथ अविस्मरणीय असाच झालाय. खूपच सुंदर !
मोहन वेल्हाळ, पुणे

छपाई अतिशय सुबक !
निखिल पुरोहित, मुंबई

मी भारताबाहेर असल्यामुळे प्रतिसादाला विलंब होईल, पण ग्रंथ उत्तम असणार याची खात्री आहे.
उपेंद्र शेवगावकर, अमेरिका

ग्रंथ छान डिझाईन केला आहे.
विलास सोनावणे, मुंबई

ग्रंथाचं काम फारच सुंदर झालंय !
स्वाती कुंटे, पुणे

Nice type is used. Very well executed, Section wise.
जोई डिसूझा, वसई

अप्रतिम !!!
रविकिरण शिरवळकर, सिंधुदुर्ग

गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ मिळाला. खूप खूप धन्यवाद ! अतिशय सुंदर बांधणी आहे. आता पुढील प्रवास ग्रंथासोबत.
पराग सोनारघारे, बडोदा

सरजी, शब्दांच्या पलीकडे !
Mind blowing efforts !
अजय दळवी, कोल्हापूर

अखेर प्रतिक्षा संपली…!
धन्यवाद सर, ग्रंथ मिळाला,
आपण वर्णन केलाप्रमाणे
अतिशय देखणा ग्रंथ
आहे…
बस वाचायला सुरूवात करतो…
पॉल डिमेलो, वसई

ग्रंथ मिळाला, धन्यवाद !
तुम्ही घेतलेल्या कष्टाचं चीज झालंय.
किरण देशपांडे, जि.रायगड

अप्रतिम !!!
अनु विक्रम कुलकर्णी, पुणे
Laborius but enchanting work.
राम कोल्हटकर, पुणे

हो, ग्रंथ मिळाला. व इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेचे चीज झाल्यासारखे वाटले.
धन्यवाद व आभार !
ओम भागवत, औरंगाबाद

Hats to you, Satishji !
गेली दोन दिवस ' गायतोंडे ' आणि ' गायतोंडे '….मी १९८७ च्या आसपास त्यांना पंडोलमध्ये पाहिलं होतं. एक प्रिंट मी तेव्हा २० रुपयाला घेतला होता. अर्थात तेव्हा जास्त आकलन झालं नाही. आता ' चिन्ह 'मुळे…फिल्म पाहून…खूप वेगवेगळ्या पातळीवर विचार. You are great ! कारण एवढा ग्रेटनेस आमच्यापर्यंत पोहोचवत आहात.
मीनल सोहोनी, ठाणे

जाता जाता :
सर्वात धमाल आणि गंमतीचा भाग म्हणजे ग्रंथाच्या प्रकाशनाला झालेल्या ( अक्षम्य ?) उशीरामुळे जे सभासद अधिक अस्वस्थ झाले होते किंवा काहीसे चिडले होते. त्यांनीच या ग्रंथाचं अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. त्या साऱ्यांनाच सलाम !

भारावून टाकणारा भन्नाट प्रतिसाद …

' गायतोंडे ' ग्रंथाच्या प्रती जसजशा सभासदांपर्यंत पोहोचत आहेत तसतसा मिळणारा प्रतिसाद वाढतच चालला आहे . अर्थात हा प्रतिसाद ग्रंथाच्या प्रथम दर्शनाला आहे . वाचून झाला की त्याचे अभिप्रायदेखील येणारच आहे . आणि तेदेखील आम्ही इथं शेअर करणार आहोत , पण अगदी मोकळेपणानं सांगायचं तर आम्ही भारावून गेलो आहोत .

सतीशजी,
.. पं कुमारांना प्रत्यक्ष … सागरतीरी आठवणींनी … वाळूत मारल्या रेघा … गातानाचा …
प्रत्यक्ष फाळक्यांनी दृश्य रेकॉर्डींग केल्याचा आवाका आपण गाठलाय .
या ग्रंथानं हा आनंद देण्यास सुरूवात केलीय.
आता सागराची लाट ही रेघ मोडण्याचा प्रयत्न करेल
पण ग्रंथरूपानं अस्तित्व कायमच आहे …
" वाळूचे कण रगडून तेल काढलंय तुम्ही "
: सुनील निलंगेकर, लातूर

गायतोंडे मिळाले . रंग उमजलेल्या मनाचा महोत्सव कसा करावा याचा
हा उत्कृष्ट नमुना आहे .
: रमेश वेळूसकर, गोवा

आताच ग्रंथ मिळाला . मनापासून धन्यवाद !
संपूर्ण वाचून मग कळवेन . पुन: धन्यवाद !
हा ग्रंथ आहे आणि तो अमूल्यही आहे .
थोड्याच भाग्यवंताना मिळालाय . पुनश्च धन्यवाद !
: माधव शाळीग्राम, पुणे

Thanks for a beautiful piece .
Once we read it's each n every word,
I'll give u my feedback in details .
Great , Thanks !
: संध्या गोखले, पुणे

नुसत्या हॅप्पीने आनंद समजणार नाही !
वापरून गुळगुळीत झालेला शब्द आहे तो !
' गायतोंडे ' यांनाच हॅप्पी शब्द म्हणूया !!
: उदय ठाकूरदेसाई, मुंबई

आज ' गायतोंडे ' यांची प्रत मिळाली . अप्रतिम !
वाट पहाणे कारणी लागले . धन्यवाद !
: जयंत गुणे, मुंबई

चित्रकार गायतोंडे बृहद ग्रंथ आज - आता मिळाला .
लाख लाख धन्यवाद !
शुभ भव:
: डॉ.शशिकांत लोखंडे, मुंबई

सबर का फल मिठा होता है !
ऑल द बेस्ट !
: सुनील तांबे, मुंबई

Received & really loved
what you have created .
Thank you very much !
: मंदार वैद्य,ठाणे

Received the copy.
Can't tell you how happy i feel .
: जान्हवी मुळे, मुंबई

' गायतोंडे ' ग्रंथ मिळाला. धन्यवाद !
चाळला . अप्रतिम झाला आहे . दुरुस्त आये !
प्रती संपल्या तर नाहीत ना अशी कुठेतरी काळजी होती …
: मोहन म्हाडदळकर, मुंबई

ग्रंथ मिळाला . हातात घेताच घेतलेल्या मेहनतीची प्रचिती आली .
ग्रंथ जमून आलाय . वाचून झालं की बाकीचा अभिप्राय नक्की कळवेन .
सर ' गायतोंडे ' आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
: हर्षद घोलप, पुणे

Long waiting increase sweetness .
: सुभाष गोंधळे, वसई

अप्रतिम !
वरचेवर चाळून , नाही म्हणता म्हणता चार - पाच लेख झालेच वाचून .
गायतोंडे मुलाखत … माणूस अफलातून ,
आणि त्याच्या संकलनासाठीची धडपड अफलातून …
सो … पुस्तक देखील अफलातून !!!
: स्मृती शेटे, नवी मुंबई

Dear Mr. Satish Naik
Thanks a lot for d rare copy n d call. I m spell bound ! It is indeed a masterpiece ! Hard exclusive front cover, superb
quality pages n print , very good articles, your candid dedication to d place where 'Gaytonde' n you stayed, excellent
editorial n on top of it all colored n black n white fantastic photos have made this 'granth' perfect. Next many days,
it will be mesmerize reading for me, so more feed back in next mail.
I wish to congratulate , once more, to you n your team for all d efforts,hard work n patience, which has resulted in
such beau. creation. All d best for your future work
best regards
: सुजाता गुप्ते, ठाणे

' साम मराठी 'वर ' चिन्ह ' आणि ' गायतोंडे '…


शनिवारी रात्री ९.०० वाजता सलील साखळकरांचा बँगलोरहून फोन . 
नेहमीप्रमाणे भयंकर घाईतच ते बोलत होते . " अहो सतीश , असा काय तो कार्यक्रम ? तो नेमका कशावर होता ? आणि मग कोलते सर का नाही फारसं बोलले त्यात ? इत्यादी इत्यादी . मी क्षणभर गोंधळूनच गेलो , कारण ते काय बोलत होते त्याचा पुढचा मागचा संदर्भच मला कळत नव्हता . आणि त्यांचा आपला प्रश्नांचा मारा चालूच . अखेर मी त्यांना महतप्रयासाने थांबवलं . अहो , म्हटलं " तुम्ही आधी कशाबद्दल बोलताय ते मला नीट सांगा . कसला कार्यक्रम ? कुठे होता ? कुठल्या वाहिनीवर होता का ? " या प्रश्नानं तेच बिचारे गोंधळून गेले . " अहो , सतीश , तुम्हाला खरंच माहित नाही का ? ' चिन्ह 'चं एवढं नाव घेतलं . ' गायतोंडे ' ग्रंथाचा एवढा उल्लेख झाला . तुम्हाला ठाऊक नव्हतं ? कमलेश देवरुखकरांच्या हातात तर ' गायतोंडे ' ग्रंथ देखील दिसत होता , हे तुम्हाला ठाऊक नव्हतं ? " मी म्हटलं " नाही , कसं असणार . मी काही कुठं वाचलं नाही किंवा मला कुणी काही कळवलं नाही ."
ते ऐकून सलील आणखीनच थक्क झाले " म्हणजे ? तुम्हाला कुणाचा एसेमेस देखील आला नाही ? मला इथं बँगलोरमध्ये आला आणि तुम्हाला का नाही आला ? " म्हटलं " मला ठाऊक नाही का नाही आला ते . आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता देखील नाही . आता मला सांगा नक्की काय प्रकार झाला ? " तेव्हा ते सांगू लागले " ' साम मराठी ' वाहिनीवर चित्रकलेच्या संदर्भात नुकताच एक कार्यक्रम झाला . त्यात कुणी हिमांशू कदम , कमलेश देवरुखकर , शर्मिला फडके आणि कोलते सर सहभागी होते . त्यात ' चिन्ह 'च्या आजवरच्या कामाचा खूप चांगला उल्लेख झाला , पण ते सारं अर्धवट वाटलं . एडिटींग करताना काही गोंधळ झाला का ?" त्यावर मी त्यांना म्हटलं " याविषयी मला खरोखरच काही ठाऊक नव्हतं आणि नाही . विचारून हवं तर सांगतो ." नंतर नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा झाल्यावर आम्ही फोन ठेवला .
शनिवारी रात्री नऊनंतर कुणाला फोन करणं योग्य वाटलं नाही . आणि दुसऱ्या दिवशी तर रविवारच होता . साहजिकच तो विषय विसरून देखील गेलो . पण आज फेसबुक वर स्क्रोलींग करत असताना चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या संदर्भात पोस्ट पाहिली आणि मग सारा उलगडा झाला . ' आवाज महाराष्ट्राचा ' या ' साम मराठी 'वरच्या चर्चात्मक कार्यक्रमात सलील साखळकर म्हणत होते तो ' चिन्ह ' विषय चर्चीला गेला होता . माझा साहाय्यक नयन तरे यानं मग You Tube वरून तो सगळा कार्यक्रम मग शोधून काढला आणि तो आता इथं अपलोड केला आहे . ज्यांना तो संपूर्ण कार्यक्रम पाहायचाय त्यांनी पुढील लिंकवर क्लिक करून पाहावा .

 https://www.youtube.com/watch?v=Z8wO7GIhEyA

Monday, September 14, 2015


आर के लक्ष्मण आणि जे जे स्कूल ऑफ 

आर्टचा संबंध काय ?
श्री विनोद तावडे
शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांस
सप्रेम नमस्कार

कालच्या 'सकाळ' मध्ये जेजेसंबंधीचे वृत्त वाचले . काही प्रश्न पडले,म्हणून मग ठरवले की आपली भेट दुरापास्त असल्याने आपणास थेट अनावृत्त पत्र लिहावे .

काय संबंध आर के लक्ष्मण आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचा ? 

जेजेने त्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला नव्हता म्हणून का तुम्ही त्याचं तिथं स्मारक करू पाहताय ? ( चित्रकार हुसेन यांना देखील जेजेने प्रवेश दिला नव्हता , म्हणून काय त्यांचं पण तुम्ही जेजेत स्मारक करणार काय ?चालेल तुमच्या लोकांना ? )

का टाईम्स मध्ये असताना जेजेत ते रोज फेरफटका मारायला येत म्हणून तुम्ही त्याचं स्मारक करू पाहताय ? का त्यांची मुलगी तुम्हाला येवून भेटली आणि तिनं प्रस्ताव ठेवला म्हणून तुम्ही तयार झालात ?

उद्या गायतोंडे , बरवे , सातवळेकर , धोंड , भास्कर कुलकर्णी , हेब्बर , मोहन सामंत , अंबादास , सूझा , पळशीकर , धुरंधर, तय्यब मेहेता , करमरकर , रावबहादूर म्हात्रे यांचे वंशज जर तुम्हाला भेटायला आले तर त्यांचीही दालनं तुम्ही त्या तुमच्या तथाकथित संग्रहालयात करणार आहात काय ?( वि सू : हे सारे भारतातील सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून गणले जातात . कला संचालक पदावर बसलेल्या आचरटाना तुम्ही नक्कीच विचाराल तर त्यांना चार नावं देखील सांगता येणार नाही म्हणून हा खुलासा केला .) जेजे स्कूल ऑफ आर्ट हे अभिजात कलेच्या शिक्षणासाठी आहे , तेथे जे जे म्हणून घडावयास हवे ते अभिजात कलेच्या संदर्भातच असावयास हवे .

व्यंगचित्र हा विषय तिथल्या अभ्यासक्रमात नाही त्या मुळे तुम्ही जे करू पाहता आहात ते सर्वस्वी चुकीचेच आहे , तिथं शिकलेल्या आमच्यासारख्यावर अन्याय करणारे आहे . अभिजात कलेचे क्षेत्र आता विस्तारले आहे . भारतीय कलावंतदेखील आता जागतिक कलाक्षेत्रावर धडकू लागले आहेत . याच जेजेत शिकलेल्या चित्रकार गायतोंडे यांचे फक्त एक चित्र २३कोटी ७०लाखाला गेले तेही जागतिक लिलावात हे तुम्ही नक्कीच वाचले असेल , याच गायतोंडे यांचं एक चित्र एका मूर्ख कलासंचालकाच्या - ते चित्र त्या चित्रापेक्षा छोट्या आकाराच्या फ्रेममध्ये बसवण्याच्या अट्टाहासापायी मधोमध दुभंगलं . पण तरीही तो मूर्ख माणूस थांबला नाही , त्यानं ते . चित्र चारही बाजूनं सुमारे एकेक फूट कापून काढलंच . 'चिन्ह' ने ते मूळ चित्र आणि कापलेलं चित्र दोन्ही छापली तर कारवाई काय झाली ? काहीच नाही .जेजेची अक्षरशः ज्यानं कबर खोदली तो माणूस आता सुखाने निवृत्तीनंतरचं आयुष्य जगतोय. ज्यांनी ज्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टची वाताहत करण्याची कामगिरी बजावली ते सारेच आता सुखात आहे . धाय मोकलून रडताहेत ते तिथले विद्यार्थी . त्याचं आक्रंदन तुम्हाला एकू येत नाहीये का ?

जेजे मधून मी थेट पत्रकारितेत गेलो . त्या दिवसांपासून जेजेच्या बातम्या मी देतोय . पहिली बातमी शिक्षक , प्राध्यापक कमी झाल्याची होती . आज या क्षेत्रातून निवृत्त होण्याची वेळ आली तरी मी आपल्या बातम्या देतोच आहे. गेल्या ३५ वर्षात कमी होणाऱ्या शिक्षकांची संख्या आणखी आणखी वाढत वाढत गेली आणि आता तर एका हाताच्याच बोटावर मोजता येतील इतके नावालाच कायम स्वरूपी शिक्षक उरलेत . बाकी सारे कंत्राटी कामगार करून टाकलेत . वर्षभरात आता आहेत तेही सेवा निवृत्त होतील . मग बहुदा कला संचालक - नेमला गेला तर,नाहीतर कुणीतरी सरकारी रेम्याडोक्या त्या जागी येईल आणि जेजेच्या दारावर उभा राहून रोजंदारीवर शिक्षकांची रोज भरती करील आणि हे करताना तो त्याचं कमिशन काढून घेईलच , असं जर घडलं तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही .

हे सारं सुधारायचं सोडून जेजेचं पर्यटन केंद्र करून तुम्ही काय मिळवणार आहात ? आर के लक्ष्मण यांचं स्मारकच जर तुम्हाला उभारायचं असेल तर ज्या इमारतीमधून त्यांनी तो अजरामर कॉमन मेन साकारला त्या टाइम्सच्या इमारतीत करा . तो टाइम्सचा मालक असल्या प्रस्तावाला हिंग लावूनदेखील विचारणार नाहीये , तो कशाला विचारील ? तो तर धंदा करायला बसलाय . तर त्यावरही उपाय आहे . टाइम्सच्या फुटपाथवर भरपूर जागा आहे की , मागे पुढे , आजूबाजूला गल्ल्यात देखील पुरेशी जागा आहे की . तिथे करा त्यांचं स्मारक . कोण अडवणार आहे तुम्हाला तिथे ? उलट ते अधिक अर्थपूर्ण होईल . कॉमन मेनचं स्मारक टाइम्सच्या आजूबाजूच्या फुटपाथवर ! कल्पना करून पहा ! सारं जग लोटेल ते पाहायला .

कला अकादमीतून अभिजात कलेला हद्दपार केलं आम्ही काही बोललो नाही .चित्र नगरीतील ललित कलेच्या रिजनल सेंटरसाठी आम्हाला मिळालेली सात एकर जागा एका माजी मुख्यमंत्र्यानं चित्रपट शिक्षण संस्थेच्या मढ्यावर घातली. आम्ही गप्प बसलो. आता तुम्ही तर आम्हाला जेजेतून बाहेर घालवायला निघाला आहात का ? त्याचे पर्यटन स्थळ करून तुम्ही नेमकं काय साधणार आहात ? मग चित्रकारांनी शिकायचं तरी कसं आणि कुठं ? आशियातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वोत्कृष्ठ परिसराचे आता आणखी धिंडवडे काढू नका हो . राष्ट्रवादी सांडानी काढले आहेत ते पुरे झाले , त्यात तुम्ही आणखी भर घालू नका !

आणखी एक प्रश्न जाहीरपणे विचारतो,असे विचारू नये पण विचारतो ? (जेजेसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो.) समजा उद्या तुमच्या कन्येनं चित्रकलेमधेच करीयर करायचं ठरवलं (देव करो आणि तिला ती दुर्बुद्धी न सुचो आणि तुमच्यावरही त्या भयंकर प्रसंगाला तोंड देण्याची वेळ न येवो.) तर तुम्ही तिला महाराष्ट्रातल्या कुठल्या आर्टस्कूलमध्ये घालाल ? आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी ? देऊ शकतील तुमच्या तंत्र शिक्षण खात्यातील अधिकारी या प्रश्नाचं उत्तर ? अहो अक्षरशः सत्यानाश केलाय या क्षेत्राचा मागच्या सरकारमधल्या लोकांनी.काही म्हणून शिल्लक ठेवलं नाहीये . 'चिन्ह' च्या कालाबाजार अंकात सारं काही नावानिशी लिहिलं आहे .http://www.chinha.co.in/marathi/archive2008.html शक्य असेल तर जरूर वाचा.आपल्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीत अंकाची प्रतसुद्धा भेट दिली होती तुम्हाला,आठवतं का ?

वर्ष झालं तुमच्या सरकारला . तुमचा निरोप आधीच मिळाला होता , ' जेजेचे प्रश्न मला ठाऊक आहेत , काळजी करू नका , मी पाहतो सारे ' म्हणून गप्प राहिलो होतो . आता मात्र डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे . आता गप्प राहणे अवघड आहे , आता असेच भेटू वरचेवर याच कालाबाजारच्या पानावर .
लोभ आहेच तो वाढावा …
तुमचा
सतीश नाईक 
संपादक चिन्ह



Monday, May 4, 2015

'गायतोंडे' नामक अद्भूत विचार मांडणारा ग्रंथ
चित्रकार 'गायतोंडे' चित्रकार प्रभाकर कोलते यांचे आयडॉल. मुख्य म्हणजे गायतोंडे यांनादेखील कोलते सरांची पेंटिंग आवडत. एका मुलाखतीत त्यांनी तसे स्पष्ट म्हटले होते. कोलते सरही गायतोंडे यांची जमेल तशी भेट घेत असत. त्यांच्या खूप अशा भेटी झाल्या अशातला काही भाग नाही. पण ज्या काही मोजक्याच भेटी झाल्या त्या भारतीय चित्रकला क्षेत्राच्या दृष्टीने विलक्षण अर्थपूर्ण ठरल्या. अशाच एका भेटीत कोलते सरांनी गायतोंडे यांच्यावरच्या फिल्मची कल्पना मांडली. सुनील काळदातेसारखा दिग्दर्शकही सुचवला. आणि नंतर मग जे काही घडले तो सारा इतिहासच आहे. म्हणूनच गायतोंडे ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासाठी कोलते यांच्याखेरीज अन्य नाव सुचलेच नाही. त्यांनीही दोन तीन वर्ष घेतली खरी, त्यात एकदा लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना तर चक्क रद्द करायला लावली आणि पुन्हा नव्याने जी प्रस्तावना लिहिली तिचा समावेश या ग्रंथात झालाच आहे. नंतर तर मग ग्रंथ निर्मितीच्या प्रक्रीयेत ते कसे सहभागी झाले ते त्यांना किंवा मला कळलंदेखील नाही. या काळात प्रचंड चर्चा झाल्या. किंचित वादही झाले. पण मागल्या आठवडयात छपाईपूर्व ग्रंथाची डमी त्यांनी पाहिली आणि त्यांना ती हातून सोडवेचना. हीच संधी साधून त्यांना ग्रंथ निर्मितीच्या या साऱ्या अनुभवांविषयी लिहावयाची विनंती केली, तो हा लेख.
चित्रकार गायतोंडे, त्यांची काळजाला भिडणारी चित्रं, त्यांचं मनस्वी मौन, वाचन आणि संगीत-प्रेम, त्यांचं रमण महर्षींच्या अध्यात्मात स्वत:चं भान जागं ठेवण्याचं कसब आणि निसर्गदत्त महाराजांच्या अलौकिक तत्वज्ञानात गुंतत जीवनाच्या मोहातून मुक्त होत विश्राम पावण्यातलं बळ, सगळंच आकर्षून घेणारं आणि विचार करायला लावणारं. देहात सुरु होऊन त्यांना स्वत:च्याच अतर्क्य मर्मबंधात घेऊन जाणारी त्यांची सन्यस्त वृत्ती आणि इतर बऱ्याच अज्ञात गोष्टीसकट सर्व कांही समकालिनाना विस्मयजनक धक्का देणारंच. आणि त्या धक्क्याचं रिश्टर परिमाण वाढले ते त्यांच्या एका चित्राला लिलावात मिळालेल्या २३ कोटी ७० लाख या विक्रमी किंमतीमुळे आणि नंतर तर ग्युगेनहाईमनं जगातल्या चार महत्वाच्या शहरात त्यांच्या एकल प्रदर्शनाची घोषणा केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना उत्सव साजरा करण्याचं कारण मिळालं आणि सर्वसामान्यांचं लक्ष चित्रकलाक्षेत्राकडे वळलं. चित्र-मूल्य आणि चित्र-किंमत यांचं एकाचवेळी, अनुक्रमे अभिरुचीसंपन्न अभिजनांकडून व सर्वसामान्यांकडून, कौतुक होण्याचा चित्रकला विश्वातला हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.

अशा या महान चित्रकाराचा जगावेगळा दृश्य-प्रवास शब्द रुपात रुपांतरीत करण्याचं ठरवलं ‘चिन्ह’ कला वार्षिकाचे सर्वेसर्वा सतीश नाईक यांनी, आणि तो 'चिन्ह'च्या वाचकांच्या मनातलं ओळखण्याचा त्याचा मनकवडेपणा ठरला. गायतोंडे यांच्यावर, त्यांच्या असीमचित्र-तपश्चर्येवर, चित्र-रसिकाच्या सर्वस्वाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या चित्रावर आप्त-स्वकीयांपेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यापैकी एक म्हणजे सतीश नाईक. कांही वर्षापूर्वी गायतोंडे यांच्यावर विशेष अंक प्रकाशित केलेल्या दिवसापासून तर आणखीनच भारावून जाऊन सतीशनं त्यांच्या भूतकाळाचा अथपासून इतिपर्यंतचा तपशील गोळा करण्याचं काम सुरु केलं. ज्याच्यासाठी कष्ट उपसत होता त्यानंच ते यशाच्या किनाऱ्यावर नेण्याचं बळ त्याला दिलं असावं. तो झपाटल्यासारखा कामाला लागला आणि तिथंच पुस्तकाचा श्रीगणेशा सुरु झाला. आणि म्हणता म्हणता त्याच्या मनात रुंजी घालणारे अस्पष्ट अरूप आशयाच्या स्पष्टतेकडे झुकत रुपाला येऊ लागलं. गायतोंडे यांचे समकालीन, त्यांचे विद्यार्थी, मित्र, चाहते सर्वांनी आपआपले मदतीचे हात पुढं केले. आणि मग येऊ घातलेल्या ‘गायतोंडे’ या पुस्तकाचं घनगंभीर परंतु तरीही आल्हाददायक बीज-रूप तयार झालं. आणि त्या पाठोपाठ शुभकार्याला भरघोस साथ देणारे अगणित शुभेच्छक पुढं आले.

गायतोंडे यांच्यावरचा ग्रंथ कसा असावा, त्याचा आशय किती गंभीर असावा इथपासून तो रसिकांच्या हाती पडेल तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा कशी असावी इत्यादी भावी परिणामांची कल्पना करत अनेक चर्चा झडल्या. चित्रकार गायतोंडे यांचा वकुबच इतका दांडगा की त्याचा एक अदृश्य दबाव सतीशवर असणं साहजिक होतं, ते सावरत ग्रंथाच्या अंतिम टप्प्याकडे तो आला तेंव्हा त्याच्यातला संपादक आणि चित्रकार या दोघात, त्यानं पूर्वी कधीही अनुभवला नसेल असा तणाव निर्माण झाला. मला नेहमी वाटायचं त्याच्यातल्या चित्रकाराची सरशी व्हावी, आणि कर्म-धर्म-संयोगानं तेच झालं. त्याच्यातलाच नव्हे तर त्याला सहकार्य करणाऱ्या आम्हा सगळयाच्यातला चित्रकार यशस्वी झाला कारण तो जागा होता, आणि त्याला कारण होतं भारताचा सर्वश्रेष्ठ चित्रकार वासुदेव सन्तू गायतोंडे नावाचा ‘एक अदभूत विचार’ जो ‘चिन्ह’ला भारतीय जनतेपर्यंत न्यायचा होता.

सतीशनं मला पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि मी ती तत्काळ स्वीकारली. मग मी त्या जबाबदारीमुळे ग्रंथाच्या सजावटीबद्दलही माझे विचार मनमोकळेपणानं सतीशजवळ व्यक्त करू लागलो. तो ज्या ज्या वेळी ग्रंथाबद्दल माझ्याशी विचार-विनिमय करीत असे त्या त्या वेळी मी स्पष्टपणे माझे दृष्टीकोन, विचार आणि सूचना त्याच्यासमोर मांडत असे. त्यावर त्याची प्रतिकिया सावधपणाची असे. मग मला वाटत असे की मी त्याच्या कामात जरुरीपेक्षा अधिकच नाक खुपसतो आहे का ? तर नाही असं माझ्या आतून उत्तर येई, मग मी असं का वागतोय तर त्यावर माझं साधं आणि सोपं स्पष्टीकरण असे की ‘चिन्ह’चा हा प्रकल्प व्यावसायिक किंवा सतीशचा एकट्याचा राहिला नव्हता तर तो इतर अनेकांप्रमाणे माझाही झाला होता.

ग्रंथाच्या बाह्य तद्वत आंतर स्वरूपाबाबत आमच्यात अनेक चर्चा झाल्या. त्या कधी समाधान देणाऱ्या तर कधी असमाधानी करणाऱ्या होत्या. परंतु आशयाच्या सत्यतेबाबत तसेच सौंदर्याबाबत विचार करता, गायतोंडे यांच्या अभ्रष्ट व्यक्तिमत्वाला चुकूनही धक्का लावणाऱ्या ठरणार नाहीत याची काळजी घेणाऱ्या होत्या. सगळ्यात कळीचा मुद्दा होता तो मुखपृष्ठाचा. पण तोही खूपच सहजगत्या सुटला आणि मुखपृष्टासाठी एका ऑस्ट्रियन चित्रकाराकडून, गायतोंडे यांचं त्यांच्या पेंटिंगचीच पार्श्वभूमी लाभलेलं एक उबदार प्रकाशचित्र सतीशला मिळालं. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. थोड्या दिवसांनी सतीश ग्रंथाची नक्कल-प्रत मला दाखवायला आला. त्या प्रतीच्या आवरणावर शांत चित्त गायतोंडे होते, आपल्याच चित्राचा एक भाग होऊन बसलेले. त्यानंतर तो ग्रंथ मी माझ्या मांडीवर घेऊन बसलो, सतीश बैठक संपवून जाईपर्यंत.

हा ग्रंथ आवर्जून पाहावा, वाचावा आणि इतरांना सांगावा असाच आहे. विशेषत: विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, समीक्षकांनी आणि रसिकांनी संग्रही ठेवावा असा आहे. कारण गायतोंडे यांची अनेक चित्रं एकत्रित पाहता यावीत असा योग या ग्रंथानं आपणा सर्वाना आणून दिलाय. शिवाय गायतोंडे यांच्या विद्यार्थ्यांनी,मित्रांनी,समकालीनांनी, अनुयायानी गायतोंडे यांच्याविषयी या ग्रंथातून बरंच कांही आत्मियतेनं उलगडून दाखविलं आहे, ते वाचणं हाच एक आगळावेगळा अनुभव ठरेल असंच आहे. चित्रकलेसाठी आशादायक होत चाललेल्या भारतीय वातावरणात असं पुस्तक प्रकाशित करण्याचं मानस ‘चिन्ह’नं तडीस नेऊन दाखवण्याचं एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य केलं त्याबद्दल त्या संस्थेचं तसेच तिचे सर्वेसर्वा सतीश नाईक यांचं मन:पूर्वक अभिनंदन.

प्रभाकर कोलते
२ मे २०१५, मुंबई

प्रत्येक विचक्षण वाचकाच्या संग्रही असायला हवा असा हा ३००० रु. किंमतीचा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीत रु. २००० मध्ये घरपोच उपलब्ध करून दिला आहे. प्रकाशनाआधीच पहिली आवृत्ती संपूर्ण नोंदली गेल्याने आणि सतत विचारणा होत असल्याने प्रिंट ऑर्डरमध्ये वाढ करीत आहोत. वाढीव प्रिंट ऑर्डर नोंदवली जाताच ही योजना बंद करण्यात येईल. आपण अजूनही हा ग्रंथ नोंदवला नसल्यास आताच 90040 34903 या नंबरवर NKG एवढाच SMS पाठवावा. आणि घरपोच ग्रंथ मिळवा. What's App साठी आमचा नंबर आहे 98331 11518. या ग्रंथाच्या निर्मितीची भन्नाट कथा या पुस्तकाच्या आराखड्यात किंवा रचनेत बसेना म्हणून मग तिची वेगळी पुस्तिकाच प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला. ती २८ पानी पुस्तिका या ग्रंथासोबत दिली जाणार आहे. सदर पुस्तिका 'चिन्ह'च्या संकेतस्थळावरदेखील आम्ही प्रकाशित केली आहे. ती जरूर वाचा. तसेच या ग्रंथाच्या काही पानांचा प्रोमोदेखील आम्ही संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे तोही अवश्य पहा. तो पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी इथं क्लिक करा. http://www.chinha.co.in/marathi/index.html







Monday, February 9, 2015

गायतोंडे ग्रंथ : 
बदलेल्या मुखपृष्ठाची अर्धी गोष्ट


हे मुखपृष्ठ दोन तीन वर्षापूर्वी आम्ही 'गायतोंडे' ग्रंथासाठी तयार केलं होतं. पण दोन आठवड्यापूर्वी ग्रंथ छपाईला गेला आणि अचानक ते बदलण्याचा निर्णय आम्ही एका रात्रीत  घेतला. आता २१६ पानांच्या मूळ ग्रंथाला संपूर्णतः वेगळेच मुखपृष्ठ वापरले जाणार आहे, आणि जे मुखपृष्ठ गेली दोन तीन वर्ष तुम्ही पाहत होता ते मुखपृष्ठ मात्र 'गायतोंडे' ग्रंथाच्या संपूर्ण निर्मितीची कथा सांगणाऱ्या आणि 'गायतोंडे' ग्रंथासोबत भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या पुस्तिकेवर वापरले जाणार आहे. त्याचीच संपूर्ण कहाणी सांगणारा हा ब्लॉग.  

एखादा ग्रंथ प्रसिद्ध होण्यासाठी जवळ जवळ दोन - तीन वर्षं इतका मोठा कालावधी लागला असेल, त्या मधल्या काळात ग्रंथाचं मुखपृष्ठ फेसबुकवर पोस्टसोबत शेकडो वेळा वापरलं गेलं असेल, ब्लॉगवर अनेक वेळा वापरलं गेलं असेल, प्रचंड खपाच्या मराठी, इंग्रजी दैनिकात तसेच साप्ताहिक - मासिकातदेखील ते प्रसिद्ध झालं असेल, इतकंच नाहीतर ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी राबवलेल्या सर्वच प्रसार मोहिमांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं असेल, तर असं मुखपृष्ठ तो ग्रंथ छपाईसाठी गेला असताना शेवटच्या क्षणी कोणी बदलील का ? असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तरकाय आचरट प्रश्न विचारता रावम्हणून तुम्ही तो विचारणाऱ्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण खरं सांगू का ? हा असला वेडेपणा आम्ही केलाय. होय ! 'गायतोंडे' ग्रंथाचं मुखपृष्ठ आम्ही छपाईसाठी ग्रंथ प्रेसमध्ये गेला असतानाच शेवटच्या क्षणी चक्क बदललंय.

खरं सांगायचं तर आता जे नवं प्रकाशचित्र ग्रंथाच्या मुखपृष्ठावर घेतलं आहे त्याच्या शोधात मी गेल्या तीन वर्षापासून होतो. ज्यानं ते प्रकाशचित्र घेतलं आहे तो खरंतर एक परदेशी चित्रकार - प्रकाशचित्रकार आहे. १९९६-९७ साली तो माझ्या जहांगीर आर्ट गेलरीत झालेल्या प्रदर्शनाला आला होता. माझ्या चित्रांविषयी त्यानं त्यावेळी बरीच चर्चादेखील केली होती, पण म्हणून काही तो माझ्या लक्षात राहिला नसता. तो लक्षात राहिला तो त्याच्या व्हिजिटिंग कार्डमुळे. त्याचं व्हिजिटिंग कार्ड हे चक्क हिंदीमध्ये होतं, त्यावर ओम वगैरे रेखाटलेला, म्हणूनच तर तो लक्षात राहिला.

२००१ साली गायतोंडे गेल्यावर एका नियतकालिकात गायतोंडे यांचं एक अप्रतिम प्रकाशचित्र प्रसिद्ध झालं होतं. कोणी काढलंय ते म्हणून उत्सुकतेनं नाव पाहिलं तर ते नाव ओळखीचं वाटलं, आणि मग लक्षात आलं की अरे तो हाच असणार ! खूप शोधाशोध केली तेव्हा त्याचं ते कार्डदेखील मला सापडलं. तर तो तोच होता.

२००७ साली 'गायतोंडे' ग्रंथाची जुळवा जुळव सुरु झाली. मात्र त्याला खरा वेग आला तो २०१० नंतर, पण तो पर्यत मी मुंबईतलं घर सोडलं होतं. साहजिकच त्या गदारोळात ते कार्ड माझ्याकडून बहुदा हरवलं. ते हरवल्याचं माझ्या लक्षात आलं ते 'गायतोंडे' ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी गायतोंडे यांचं चांगलं प्रकाशचित्र शोधू लागलो तेव्हाच. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. खूप प्रयत्न केला पण ते कार्ड काही मिळालं नाहीच. शेवटी माझ्या संग्रहातलच सुनील काळदाते याचं प्रकाशचित्र मुखपृष्ठावर वापरायचं असा मी निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी मी अनेक शक्यता अजमावून पहिल्या होत्या, पण पदरी मोठी निराशा येण्यापलीकडे काही हाती लागले नाही. हे सारं सविस्तर लिहायचं म्हटल तर तर ते नक्कीच खूप मोठं होईल, म्हणून तूर्त तरी लिहिण्याचं टाळतो आहे. पण कधीतरी त्यावर सविस्तर लिहिणार नक्की आहे.

खरं तर या ग्रंथासोबत जी २८ पानांची पुस्तिका देत आहोत त्यात ते सारं लिहिणं योग्य ठरलं असतं, पण हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत तरी आणखी कोणतेही नवे वाद उदभवू द्यायचे नाही असं ठरवलं असल्यानं मला संयम पाळावा लागला आहे, पण त्यावर नक्की कधीतरी लिहेन, आणि ती संधी लवकरच ( या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने ) चालून येईल याची मला खात्री आहे.

सुनीलचं मी निवडलेले प्रकाशचित्र तांत्रिक दृष्ट्या अप्रतिमच होते. पण त्या प्रकाशचित्रातले गायतोंडे त्यांना झालेल्या अपघातानंतरचे गायतोंडे होते, सहाजिकच त्या भयंकर अपघाताचे त्यांच्या शरीरावर झालेले दुष्परिणाम त्यातून दिसतच होते. सहाजिकच ते प्रकाशचित्र गायतोंडे यांच्या कट्टर चाहत्यांना आवडलं नसतं. पण माझ्यासमोरदेखील दुसरा पर्याय नव्हताच. ज्यांच्याकडे गायतोंडे यांची चांगली प्रकाशचित्रं होती ती मंडळी ती द्यायला तयार नव्हती. त्यामुळेच नाईलाजास्तव ते प्रकाशचित्रं वापरण्याचा निर्णय मी घेतला होता.

ग्रंथ तयार झाला संपूर्ण डमीदेखील तयार झाली आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांनी मुखपृष्ठाविषयी पहिला आक्षेप नोंदवला. ते म्हणाले ग्रंथ अप्रतिम झाला आहे, पण मुखपृष्ठावर हे प्रकाशचित्र मात्र नको, त्यामुळे गायतोंडे यांच्याविषयी चुकीचं मत होण्याचा संभव आहे. उंची कमी होती तरी गायतोंडे देखणे होते, आणि खूप टापटीप रहात. स्वतःच्या पोशाखाविषयीदेखील ते अतिशय चोखंदळ होते. या प्रकाशचित्रानं वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हा ग्रंथ आहे अंक नव्हे. पुढल्या अनेक पिढ्या तो वाचला जाणार आहे. त्यामुळे हे मुखपृष्ठ तू वापरू नयेस, बदलावेस असे मला वाटते. त्यांचे चांगले प्रकाशचित्रं जर मिळत नसेल तर त्यांचे कुठलेही एक पेंटिंग वापर.त्यांची ही सूचना मात्र मला मान्य नव्हती कारण हा ग्रंथ चित्रकार 'गायतोंडे' या व्यक्तीवर होता - त्यांच्या चित्रांवर नाही. हा टिपिकल चित्रांचे ग्रंथ असतात तसा ग्रंथ नव्हता.

गायतोंडे यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण कशी झाली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत करीत त्यांचा चित्रकलेचा एकूण प्रवास कसा झाला याचं चित्रण करणारा ग्रंथ होता. म्हणून त्याच्या मुखपृष्ठावर पेंटिंग घ्यायला मी नाखूष होतो. मराठी वाचक ग्रंथावर पेंटिंग स्वीकारायला अजून पुरेसा तयार झालेला नाही हेही माझं मत होतं. साहजिकच इच्छा असूनदेखील मी काही करू शकत नव्हतो. कोलते सरांनी दोन-तीन वेळा तरी टोकलंच. मी प्रयत्न करीत होतो पण त्याला यश मात्र येत नव्हतं. ज्यांच्याकडे 'गायतोंडे' यांची दुर्मिळ प्रकाशचित्रं होती ते ती मला - कारणं काही असोत, पण देऊ इच्छित नव्हते. हरवली आहेत, कुठे ठेवली सापडत नाही आहेत, निगेटीव्ह मिळत नाहीत, आमचंच पुस्तक येतंयवगैरे अनेक कारणं सांगून देणं टाळत होती. शेवटी मी तो नाद सोडलाच. आणि पुन्हा पहिल्यापासून मी गायतोंडेंचा फोटो नव्यानं शोधायला सुरुवात केली.

या शोधामध्ये आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा हे मी मनाशी पक्क केलं. इंटरनेटवर शोध घेता घेता मी फेसबुकपर्यंत येऊन पोहोचलो आणि होय ! त्याचा शोध मला लागलाच. अगदी त्याच्या संपूर्ण परिचयासकट तो मला भेटला. तो केवळ प्रकाशचित्रकारच नव्हे तर चित्रकारदेखील होता. युरोपातल्या एका देशात त्याच वास्तव्य होतं खरं पण तिथे तो कमीच राहत असणार कारण त्याच्या वेगवेगळ्या पोस्टवरून तो जगभर फिरत असावा असं दिसत होतं. भारतात तर तो वरचेवर येतच असावा असं त्याच्या प्रोफाईलमध्ये पाहून वाटत होतं. आणि कव्हर फोटोमध्ये त्याला पाहून तर मी उडालोच, कारण त्या फोटोत तो आपल्याकडे कुंभमेळ्यात असतात तशा तमाम साधू मंडळींबरोबर बसलेला दिसत होता. अरे ! म्हटल हे भलतंच काहीतरी. पण लागलीच मी त्याला मेल पाठवली आणि पाठोपाठ फ्रेंड रिक्वेस्टही त्यानंही त्वरित उत्तर दिलं आणि प्रकाशचित्रांची निवड करण्यासाठी थंबनेल्स पाठवली. पण त्यानं प्रकाशचित्रांच्या रॉयल्टीची जी किंमत ती ऐकून मी गरगरून गेलो. ती देणं मला शक्यच नव्हतं. पण तरीही मी मेलवर त्याच्याशी संपर्क ठेऊन होतो. मी त्याला म्हटलं ही रॉयल्टी जर जास्त वाटते तर तो म्हणाला युरोपात सारे अशीच रॉयल्टी घेतात पण तू गायतोंडे यांचा चाहता दिसतोयस आणि एफ बी वर तू केलेलं सारंच काम दिसतंय, त्यामुळे मी कमीच रॉयल्टी लावतोय. पण त्यानं सांगितलेली रॉयल्टी देणंदेखील शक्यच नव्हतं, त्यामुळे पुन्हा मेलची देवाणघेवाण थंडावलीच.

हे सारं चालू असतांना मी अन्य ठिकाणीदेखील फोटोंचा शोध घेतच होतो पण निराशाच पदरी पडत होती. कोलते सर जे म्हणत होते त्यात थोडसं तथ्य होतंच पण कलाक्षेत्रातील आणखीन काहींच मत घ्यायचं मी ठरवलं. तेव्हा काहींच्या अशाच कोलते सरांच्या प्रतिक्रियेसारख्याच काहीशा प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या. म्हणून मग एके दिवशी मी सरळ लक्ष्मण श्रेष्ठांनाच फोन केला. लक्ष्मण श्रेष्ठ त्यांच्या स्वतःच्या करिअरच्या प्रारंभापासूनच गायतोंडेंच्या अंतापर्यंत त्यांच्या संपर्कात होते. गायतोंडे मुंबईत येत तेव्हा त्यांच्याचकडे उतरत असत. गुरु-शिष्यांचं छान नातं होतं त्यांच्यात. त्यांना मी फोन केला आणि सारा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी मला लगेचच वेळ दिली आणि म्हणाले मी खूप ऐकलंय तुझ्या ग्रंथाबद्दल मी तो पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. त्यांनी ती ग्रंथाची डमी पाहिली आणि ते भयंकर खूश झाले. म्हणाले गायतोंडे यांच्यावर हे असं काही पुस्तक येईल याची मी मुळीच कल्पना केली नव्हती. खूप मोठं काम केलयस तू. त्यांची पत्नीही ते पाहून खूश झाली.

आणि मग मी मुखपृष्ठाचा प्रॉब्लेम सांगितला तर ते दोघेही अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले, काही बदल करु नकोस यात, केलं आहेस ते काम ग्रेट आहे, मुखपृष्ठाच्या फोटोत बदल करण्याची देखील काही गरज नाही. गायतोंडे जसे होते तसे या ग्रंथात उतरले आहेत. उलट अपघातामुळे आलेल्या या अवस्थेमुळे कुठंही खचून न जाता गायतोंडे ८-९ वर्षांच्या मोठ्या गेपनंतरदेखील पेंटिंग करू लागले. हे या मुखपृष्ठामधून खूप छान व्यक्त होतंय असं मला त्यांनी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. निघतांना मला म्हणाले प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवायला विसरू नकोस. आम्ही नक्की येऊ.

लक्ष्मण यांच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मी खूप आनंदात होतो. वाटलं चला एक टेंशन गेलं, सुटलो एकदाचा अशा काहीशा माझ्या भावना होत्या. घरी येऊन ग्रंथाच्या साऱ्या फाईल्स बेंगलोरला प्रेसमध्ये मेल केल्या. पण त्या नंतर अत्यंत वेगाने अशा काही घटना घडल्या. आणि शेवटच्या क्षणी मुखपृष्ठ बदलण्याचा धाडसी निर्णय मला घ्यावाच लागला. तो का घेतला ? कसा घेतला ? कशामुळे घेतला ? कुणाचं प्रकाशचित्र वापरलं ? का पेंटिंग वापरलं ? हे सारं कसं काय जमून आलं याविषयी मी तुम्हाला आता काहीच सांगू शकणार नाहीये. किंवा बदलेलं मुखपृष्ठही मी तुम्हाला इतक्यात दाखवणार नाहीये. ग्रंथ प्रकाशनाच्या दिवशीच किंवा कदाचित प्रकाशनाचा जो भव्य कार्यक्रम आम्ही योजिला आहे त्याच्या घोषणेच्या वेळीच मी ते तुम्हाला दाखवू शकेन. आतापर्यंत निवडक चिन्हच्या बाबतीत घडलेली प्रत्येक घटना मी 'चिन्ह'च्या वाचकांशी शेअर केली आहे. पण आता मात्र मी थोडसं स्वातंत्र्य घेतोय, द्याल ना ?

सतीश नाईक
संपादक, चिन्ह

३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.