Monday, March 28, 2011

अहो आश्चर्यम! चित्रकार (तेही पुण्यातले) एकत्र आले....


 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत साहित्य, संगीत, नाट्य या कलांची सादरी करणं, संमेलनं, चर्चासत्र, कार्यशाळा वरचेवर होतच असतात. यांच्या तुलनेत दृश्य कलेचे (चित्रकला, शिल्पकला) दृश्य अधिक विस्तारले जावे ही आकांक्षा पुण्यातील चित्रकारांच्या मनात अनेक वर्षांपासून होती. दृश्य कलेच्या प्रचार व प्रसारासाठी ही अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात साकारली गेली ती पुण्यातील कै. ज. द. गोंधळेकर प्रतिष्ठानच्या सक्रिय पुढाकारानं!

 प्रसिद्ध चित्रकार गोंधळेकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेली २७ वर्षे सातत्यानं ज्येष्ठ चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरविणार्‍या या प्रतिष्ठाननं मात्र या वर्षी पुणे व पुणे परिसरातील चित्रकारांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार श्री.व्ही. एस. कुलकर्णी यांचे दीर्घकालीन प्रयत्न त्या मागे आहेत. सर्व चित्रकारांना एकत्र आणून सगळ्यांचं एक नेटवर्क तयार करावं, एकमेकांत स्नेहभाव वाढून कलाविषयक विचारांचं आदान प्रदान होणं, हा या मागचा उद्देश असल्याचं ते म्हणाले.
 ‘कलाछाया’ संस्थेच्या ‘दर्पण’ कलादालनाच्या परिसरात दि. २७ फेब्रुवारीला हा मेळावा भरला. दोन सत्रांत विभागल्या गेलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज. द. गोंधळेकरांच्या कलाप्रवासाचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर पं. भीमसेन जोशी व चित्रकार मुकुंद केळकर यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्री.नवनीत देशपांडे यांच्या हस्ते गोंधळेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. श्री.कुलकर्णी यांनी प्रतिष्ठाननं आजवर आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. इतक्या मोठ्या संख्येनं चित्रकार प्रथमच एकत्र येत असल्यानं काहीतरी ‘नवनीत’ हाती लागेल. मात्र तरुण चित्रकारांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांचं सांकेतिक मनोगत लक्षात घेत आपल्या भाषणात श्री.नवनीत देशपांडे यांनी उपस्थितांना ‘सकाळ’ तर्फे आश्वस्त केलं. ‘‘नानासाहेब परुळेकरांनी सुरू केलेल्या परंपरेची जाण ठेवत ‘सकाळ’ अशा विधायक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देईल’’ असं ते म्हणाले. ‘‘चित्रकला हा व्हिज्युअल मिडीया आहे; पण त्याकडे फार दुर्लक्ष होतं. रसिक व चित्रकार यांच्यात संवादाचा पूल बांधायला हवा. अशा उपक्रमांसाठी सामूहिक मानसिकता महत्त्वाची भूमिका बजावत असते. दृश्य कलेच्या प्रचार व प्रसाराकरिता आपल्या काही योजना असल्यास त्या जरूर कळवा, त्यांना दै.सकाळ मध्ये जागा देऊ’’ असं आश्वासन त्यांनी दिलं. दृश्यकला क्षेत्रातील विविध उपक्रमांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळणार ही या क्षेत्रातील एक नवी ‘सकाळ’ ठरेल, अशी आशा आहे.

 पहिल्या सत्रात ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री.शि.द. फडणीस यांची खुमासदार मुलाखत श्री.सदानंद चांदेकर यांनी घेतली. व्यंगचित्रांचं विश्व व त्याच्याशी संबंधित प्रश्नांना श्री.फडणिसांनी दिलेल्या उत्तरांनी त्यांच्या कलाप्रवासाचा पट उलगडला गेला. मुलाखतीत प्रत्येक कलावंताला विचारण्यात येणारा, ‘एखादी कल्पना कशी सुचते?’ या सनातन प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले, ‘‘...शोध घेण्याची प्रक्रिया असते ती... इथं रेडिमेड कल्पना नसतात! ...फॅन्टसीच्या अंगानं जाणार्‍या त्या कल्पना असतात!’’ चित्राच्या दर्जाइतकीच रसिकाची वैचारिक प्रगल्भता, कलाभिरुची श्रेष्ठ ठरते, याचा वेळोवेळी प्रत्यय आल्याचं ते म्हणाले. मुलाखतीदरम्यान अशी काही सुभाषितवजा वाक्यंही ऐकायला मिळालीत. ही मुलाखत म्हणजे एका ‘हसर्‍या गॅलरी’ची ‘हसरी उठाठेव’ ठरली. तिचं स्वरूप अनौपचारिक असल्यानं सदानंदी ठरली!

 दुसर्‍या सत्रात प्रसिद्ध शिल्पकार श्री.शरद कापुसकर यांचा परिचय ज्येष्ठ चित्रकार. श्री.जयप्रकाश जगताप यांनी करून दिला. प्रतिकूल परिस्थितीत कलाशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी दशेपासून ते प्रथितयश शिल्पकार म्हणून नावलौकिक प्राप्त होईपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचं मार्मिक विवेचन त्यांनी केलं. त्यानंतर कापुसकरांनी व्यक्तिशिल्पाचं प्रात्यक्षिक दिलं. ज्येष्ठ शिल्पकार श्री.दिनकर थोपटे यांचं शिल्प घडविल्यानंतर त्यांनी रसिकांशी साधलेला संवाद एकूणच शिल्पकारिता क्षेत्राविषयी ‘त्रिमित दृष्टी देणारा ठरला शिल्पांकनाचे वेळी त्यांची माती लावण्यातील सहजता योग्य प्रमाणातील लयदार व सुडौल आकार, मातीच्या लवचीकपणाचं दर्शन, या सर्वांतून त्यांचा उत्स्फूर्त आविष्कार शब्दातीत ठरला! एक छान व्हिजुअल ट्रीट मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसला. ‘कलाछाया’च्या संस्थापिका ज्येष्ठ कथक नर्तिका श्रीमती. प्रभाताई मराठे व श्री.भरत जंगम या वेळी उपस्थित होते. श्री.थोपटे यांचा प्रभाताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 उत्तरार्धात, दृश्यकलाक्षेत्राशी संबंधित विषयांवर आधारित खुल्या चर्चेचं सूत्रसंचालन ज्येष्ठ चित्रकार श्री.मुरली लाहोटी, श्री.जगताप व श्री.फडणीस यांनी केलं. मान्यवरांनी दिलेल्या सादाला, प्रतिसादही उत्तम मिळाला! उपस्थितांनी आपल्या भावना, प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विचार मांडले, काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. त्यात चित्रकारांच्या गरजांचा आढावा घेण्यात आला. चित्रकार, शिल्पकारांची सूची तयार करावी, दृश्यकलाविषयक घडणार्‍या घडामोडींची उपक्रमांची माहिती देण्यासाठी बुलेटिन सुरू करावं, चित्रकारांच्या रजिस्ट्रेशनसाठी कमिटी तयार करावी. कला अकादमीच्या सरकारमान्यतेसाठी विविध पातळीवर विधायक प्रयत्न केले जावेत, असं सुचवलं गेले. या चर्चेनं महाराष्ट्रात स्वतंत्र कला अकादमी स्थापन व्हावी याबाबत उपस्थितांचं एकमत झालं. इतर राज्यांत कलावंतांना पुरविण्यात येणार्‍या सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, कला प्रदर्शनासाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणारी कलादालनं, कला शाखेतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च कलाशिक्षणासाठी मिळणार्‍या सुविधा इत्यादींचा तौलनिकदृष्ट्या विचार करता महाराष्ट्रात या सोयी नसल्यानं स्थानिक कलावंताची पीछेहाट होत असल्याचा सूरही आळवला गेला.

 स्वतंत्र कला अकादमी व्हावी ही मागणी काल-परवाची नसून ती होण्यासाठी संबंधितांनी गेली अनेक वर्षे खर्ची घातली आहेत; पण त्यातून फलनिष्पत्ती झाली नसल्यानं आत्ता ध्येयपूर्तीसाठी आपणा सर्वांची सकारात्मक संघभावना फार आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचं ‘लक्ष’ वेधण्यासाठी आपलं ‘लक्ष्य’ एक असावे ही सूचना केली. त्यासाठी भविष्यकाळात सर्वार्थानं प्रयत्न करण्याची जाणीव या मेळाव्यानं प्रत्येक चित्रकाराच्या मनात निर्माण केली. इतर कलाक्षेत्रात संमेलनं चर्चासत्रं वारंवार होतात म्हणून आम्हीही असा ‘घाट’ घालावा, असा आमचा अट्टाहास नसून या क्षेत्राच्या स्वतंत्र गरजा आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी भरीव कार्य करणं ही आमची भूमिका असल्याचा पवित्रा या मेळाव्यानं घेतला.
 जागतिकीकरणाच्या प्रचंड वावटळीत भारतीय चित्रकलेची ‘दशा’व ‘दिशा’ याबाबतही विचारमंथन झालं. खुली चर्चा असल्यानं अगदी ‘कलेच्या व्याख्येपासून’ ते ‘इन्स्टॉलेशन’पर्यंत असा विविध अंगांचा धांडोळा घेण्यात आला. कलाप्रदर्शनं, प्रात्यक्षिकं कलासमिक्षणं, ‘हौशी’ ते ‘व्यावसायिक’ चित्रकार, शालेय तसंच उच्च कलाशिक्षणात सैद्धान्तिक विषयांचं ‘महत्त्व व माहात्म्य’, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व त्याची मर्यादा. असे अनेक विषयही चर्चेत हाताळण्यात आले. श्री नंदकिशोर घाडणेकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. थोडक्यात मेळाव्यास उपस्थित विचारप्रसारक व विचारप्रसारणार्थी यांच्यामध्ये एक दुवा प्रस्थापित झाला व चर्चेच्या उत्तरार्धात तो बंध बळकट. होऊन एकात्मतेची भावना निर्माण झाली. हे या उपयोजनांचं फलित म्हणावं लागेल. अर्थात चित्रकारांचा हा स्नेहमेळावा नजीकच्या काळात होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय चित्रकार संमेलनाची नांदी ठरावा.

प्रा. पंकज. वि.भांबुरकर
 पुणे
 Email : bhamburkar.pankaj@gmail.com.

Friday, March 25, 2011

अकादमींच्या ललित कला

दै. प्रहारच्या  'बुकमार्क' या पानावर दिल्लीच्या ललित कला अकादमीनं प्रसिद्ध केलेल्या 'कलाभारती'या चित्रकलाविषयक अनुवादीत मजकुराच्या दोन खंडाविषयी 'राजा पिंपरखेडकर' यांनी विचारानं लिहिलं आहे. त्यातला वासुदेव  गायतोंडे यांच्या विषयीचा 'तब्बल १६६ पानं गायतोंडे यांच्यावर खर्च केली आहेत' असा उल्लेख सोडला तर संपूर्ण लेखात खटकण्यासारखं काहीच नाहीये. किंबहुना त्याच्या अनेक प्रतिकूल मतांशी आपण सहमत होत होत तो लेख वाचतो. असो या पुस्तका संदर्भात 'चिन्ह'ला काही वेगळंच सांगायचं आहे.
कलाभारतीच्या या ५६७ आणि ५८० पानांच्या या दोन खंडात विविध भारतीय भाषेतल्या चित्रकलाविषयक लेखांचे हिंदी अनुवाद प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पहिल्या खंडातल्या एकूण ६५ लेखांपैकी १९ लेख चिन्हच्या गेल्या दहा अंकामधून घेण्यात आले आहे. ५६७ पानांच्या या जाडजूड खंडामधली तब्बल १७० पानं ही चिन्हच्या लेखांनी व्यापली आहेत. 'खर्च केली आहेत' असा जो गायतोंडेंविषयीचा उल्लेख राजा पिंपरखेडकरांनी केला आहे, ते सर्व लेख चिन्हमधलेच आहेत. बाय द वे गायतोंडे यांच्या वरच्या लेखाच्या पानांची संख्या होते ११५,१६६ नव्हे, असो. चूकभूल द्यावी घ्यावी.
  तर सांगायचा मुद्दा असा की, चिन्हची १७० पानं ज्यांनी 'कलाभारती' मध्ये अनुवाद करून घेऊन प्रसिद्ध केली त्या ललित कला अकादमीवाल्यांनी या ग्रंथाच्या खंडासाठी चिन्हला ७-८ वेळा दिल्लीत फोन करावयास लावला आणि हो ना हो ना करता ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ७-८ महिन्यानं अखेर चिन्हला हे दोन्ही खंड एकदाचे मिळाले.
 ग्रंथ सोबत पाठवत आहोत म्हणून दोन ओळीच पत्रं नाही  उशीर झाला म्हणून दिलगिरी नाही, आभाराची तर बातच सोडा, त्या ग्रंथावर नाव घालून तरी ते पाठवावं इतकंही सौजन्य ललित कला अकादमीवाल्यांकडे नाही. मग मानधन वगैरेंची बातच सोडा.
 सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी असाच एके दिवशी पीयूष दईया नावाच्या माणसाचा फोन दिल्लीहून आला. चिन्हची खूप स्तुती वगैरे, तुम्ही कसं अद्भुत काम केलंय वगैरे आणि आम्ही असा असा एक ग्रंथ प्रसिद्ध करतो असून त्यात 'चिन्ह'मधल्या लेखांची निवड केली आहे. म्हटलं हरकत नाही. पण लेखी काय ते पाठवा. काय करणार ते कळवा, त्याप्रमाणे त्यांनी मेल पाठवली. त्यात 'चिन्ह'मधल्या बर्‍याच लेखांची नावं होती. त्याप्रमाणे 'चिन्ह'चे सर्व अंक ललित कला अकादमीला पाठवण्यात आले.
तोंडी परवानगी देताना त्यांना अट घातली की, या संदर्भात लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे. ती तुम्ही घ्यावी. ज्या लेखांची निवड कराल, त्या लेखकांना आणि त्यांच्या शब्दांकनकर्त्यांना अथवा लेखकांना त्याचं मानधन आणि ग्रंथाची एक प्रतही पाठवावी. त्यांनी होकार दिला.
  पण नंतर ना परवानगी मागणारं पत्रं आलं ना अन्य काही. मधेच एकदा 'चिन्ह'नं वापरलेल्या प्रकाशचित्रांची मागणी आली. तीही पूर्ण केली. त्यानंतर सहा-आठ महिन्यांत किंवा वर्षभरात काही घडलंच नाही, मग अचानक प्रफुल्ल डहाणूकर, मनोहर म्हात्रे वगैरेंकडून फोन येऊ लागले की आपल्याला ग्रंथाची प्रत आलीय. तुम्हांला आलीय का? गणेश विसपुतेंनी फेसबुकवरही लिहिलं. असे सर्वांचेच फोन येऊ लागले. सर्वांना ग्रंथ पोहोचले होते. पण ज्या अंकातून हे १९ लेख निवडले गेले त्या 'चिन्ह'ला मात्र ग्रंथाची प्रत सोडा, साधं पत्र पाठवण्याचं सौजन्यसुद्धा ललित कला अकादमीनं दाखवलं नाही.
न राहून अखेर एकदा श्री. दईया यांना फोन केला तर ते म्हणाले की, ते काम मी सोडलं. कधीच सोडलं. तुम्हांला ग्रंथ आले कसे नाहीत, आश्चर्य आहे, मी व्यवस्था करतो वगैरे. पण त्यानंतरसुद्धा काही घडलं नाही. एके दिवशी चित्रकार मनोहर म्हात्रे यांनी त्या ग्रंथाचं दर्शन घडवलं त्यातलं प्रकाशन संयोजक म्हणून डॉ. ज्योतिष जोशींचं नाव होतं. त्यांना फोन लावला तर टिपिकल सरकारी उत्तर दिलं आणि ग्रंथ पाठवतो म्हणून सांगितलं. त्यानंतर महिन्याभरानं 'चिन्ह'ला ते ग्रंथ आले. प्रकाशकांची परवानगी त्यांनी अद्यापही मागितलेली नाही. त्यामुळे लेखकांना मानधन वगैरे पाठवलं असणं अशक्यच आहे. आता यावर काय कारवाई करायची त्याचा विचार चालू आहे. लेखक, चित्रकार मंडळी म्हणतात ललित कलावाल्यांना नोटीस पाठवा, कोर्टात खेचा पण आपले सारे कामधंदे सोडून हे उपद्व्याप करत बसायचं का?
  कोट्यवधी रुपयांचं ज्याचं बजेट आहे, त्या ललित कला अकादमीचा सारा कारभार हा असा आहे. आता ललित कला अकादमीचं कलासंचालनालय झालंच असं म्हणायचं का कला संचालनालयाची ललित कला अकादमी झाली असं म्हणायचं?
- सतीश नाईक

Tuesday, March 1, 2011

‘चिन्ह’ लवकरच दररोज प्रसिद्ध होणार!



वेबमिडियात उतरायचा निर्णय जेव्हा ‘चिन्ह’नं घेतला तेव्हाच फेसबुक आणि ऑर्कुटवरही आपली निशाणी उमटवायचं ‘चिन्ह’नं निश्चित केलं होतं. पण ऑर्कुटला लागलेली उतरती कळा पाहून फेसबुकवरच सर्व लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज फेसबुकवर ‘चिन्ह’चा १६००पेक्षा जास्त मित्रपरिवार आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातील चित्रकारांचाच समावेश नसून महाराष्ट्राबाहेरील तसंच जगभरातील चित्रकारांचाही समवेश आहे. इतकंच नाही तर जगभरातील तसंच भारतातील महत्त्वाच्या कलासंस्था, कलादालनं यांचाही समावेश आहे. ‘चिन्ह’च्या कट्टर वाचकांचा समावेश त्यात आहेच पण ‘चिन्ह’चं संकेतस्थळ पाहून अन्य भाषिक वाचकही ‘चिन्ह’च्या मित्र परिवारात मोठ्या संख्येनं सामील होत आहेत. सार्‍यांची मागणी एकच आहे ‘चिन्ह’ आता इंग्रजीत हवं. त्या मागणीचा मान राखून ‘चिन्ह’ लवकरच Chinha : The Visual Idiom’’ या नावानं ‘चिन्ह’ची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रसिद्ध करणार आहे. या आवृत्तीत सर्वप्रथम ‘चिन्ह’च्या मराठी आवृत्तीत गाजलेल्या लेखांचं, ज्यात चित्रकार गायतोंडे, भास्कर कुलकर्णी, प्रभाकर बरवे, विश्वनाथ नागेशकर, विनायक मसोजी, रवी वर्मा इत्यादींवरच्या लेखाचा समावेश असणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी ही आवृत्ती प्रसिद्ध व्हावी असा प्रयत्न राहाणार आहे. या इंग्रजी प्रकाशनामुळे महाराष्ट्रातील चित्रकारांचं कर्तृत्व जगभरातल्या कलारसिकांसमोर मोठ्या प्रमाणावर साकारलं जाणार आहे. आज ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर वरील कलावंतांविषयीचं जे साहित्य मराठीत प्रसिद्ध केलं असतानाही जगभरातून कलारसिकांचा, वाचकांचा, अभ्यासकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता इंग्रजी आवृत्तीचं  स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं जाईल याविषयी ‘चिन्ह’च्या मनात तीळमात्रही शंकेला जागा राहिलेली नाही.

‘चिन्ह’च्या संकेतस्थळावरील उपलब्ध असलेले मराठी लेख मोठ्या प्रमाणावर वाचले जात आहेत. त्याची सर्व आकडेवारी ‘चिन्ह’पाशी उपलब्ध आहे. या लेखांमध्ये चित्रकार गायतोंडे, चित्रकार नागेशकर, राजा रवी वर्मा, सुनील गावडे यांच्यावरच्या लेखांचा समावेश आहे. कित्येक हजारो वाचकांची आकडेवारी या आणि अन्य लेखांना लाभली आहे. ते सर्वच वाचक मराठी असतील असा समज करून घेणं चुकीचंच ठरेल. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, नेदरलॅंड, सिंगापूर,इंडोनेशिया, इतकंच काय रशियातूनही ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला मिळालेला वाचकवर्ग मराठी असेल असं म्हणणं योग्य नव्हे. अमेरिकेसारख्या देशातून संकेतस्थळ सुरू झाल्यापासून तब्बल १३ ते १५% हिट्स ज्या अत्यंत नियमितपणे मिळत आहेत त्या केवळ मराठी मानणं योग्य ठरणार नाही. यु.एस एज्युकेशनकडून नियमितपणानं मिळणार्‍या २%  याही मराठी मानता येणार नाहीत. इतकंच काय पण हॉवर्ड विद्यापीठाकडून सातत्यानं येत असलेल्या हिट्सही मराठी निश्चित म्हणता येणार नाहीत.
‘चिन्ह’च्या संदर्भात घडत असलेल्या या सर्वच घडमोडी निश्चितपणानं उत्साह आणि ऊर्जा वाढविणार्‍या तसंच नवीन उमेद देणार्‍या आहेत यात शंका नाही.

‘चिन्ह’चा अंक वर्षातून एकदाच प्रसिद्ध होतो. आधीच्या संपूर्ण वर्षांत घडलेल्या घटनांचं प्रतिबिंब त्या अंकातत पडावं असा प्रयत्न असतो. पण दोन अडीचशे पानांमध्ये काय काय बसवणार? त्यावर उपाय म्हणूनच ‘चिन्ह’च्या ब्लॉगची निर्मिती झाली. महाराष्ट्रातल्या कलशिक्षण व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणता यावी म्हणूनच ‘क(।)लाबाजार’ अंकाची निर्मिती झाली. तो प्रयत्न अपुरा ठरू नये या हेतूनच ‘प्रश्न चिन्ह’ ब्लॉग सुरू झाला. आता हे दोन्ही ब्लॉग चांगलेच स्थिरावले आहेत. त्यांना फॉलोअरही खूप मिळाले आहेत आणि वाचकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. ‘प्रश्न चिन्ह’ ब्लॉगवर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं अनावृत्त पत्र ३००० पेक्षा जास्त लोकांनी वाचलं. ‘चिन्ह’ आणि ‘प्रश्न चिन्ह’ या दोन्ही ब्लॉग्जना आजपर्यंत प्रत्येकी १०,००० वाचक लाभले आहेत आणि त्या वाचकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढच होताना दिसत आहे. लवकरच ‘चिन्ह’चा तिसरा ब्लॉग ‘इंग्रजी ब्लॉग’ प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ‘चिन्ह’च्या इंग्रजी आवृत्तीची सर्वच माहिती जगभरातल्या सर्वच वाचकांना उपलब्ध होणार आहे. इंग्रजी आवृत्तीच्या फेसबुक अकाऊंटमुळे इंग्रजी आवृत्तीचीही इत्यंभूत माहिती जगभरातल्या इंग्रजी वाचकांना उपलब्ध होणार आहे.

‘चिन्ह’च्या ब्लॉग्जना मिळालेलं हे यश पाहून ‘चिन्ह’नं ‘चिन्ह’ ब्लॉगचं रूपांतर लवकरच ‘इंटरनेट वृत्तपत्रात’ (ई पेपर) करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिन्ह’चा आगामी अंक प्रसिद्ध होताच हे वृत्तपत्र वाचकांना दररोज उपलब्ध होईल. ज्यात ‘चिन्ह’च्या विशेष स्टोरीज बरोबर मुंबईच्या कलादालनात भरणारी प्रदर्शनं, चित्रकारांच्या मुलाखती, स्टुडिओंना भेटी, कलाविषयक पुस्तकांची परीक्षणं आणि कलाविषयक बातम्या यांचा समावेश असेल. त्याचबरोबर ‘कलाकीर्द’ ही ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरी ‘चिन्ह’ यावर्षाअखेर सुरू करणार आहे. या डिरेक्टरीमध्ये सुरूवातीला महाराष्ट्रातील आणि नंतर भारतातील चित्रकारांचा समावेश केला जाणार आहे. या डिरेक्टरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या डिरेक्टरीद्वारे जगभरातल्या कुठल्याही कलारसिकाला, कलासंग्राहकाला ‘कलाकीर्द’मध्ये समाविष्ट झालेल्या चित्रकाराचं चित्र किंवा शिल्पकाराचं शिल्प कुठल्याही मध्यस्थाविना (त्यात ‘चिन्ह’सुद्धा आलं) थेट त्या कलावंताकडूनच खरेदी करता येणार आहे. आज भारतात सुमारे चारशे साडे चारशे व्यावसायिक कलादालनं आहेत. पण त्या सर्वांशी संबंधित असलेल्या कलावंतांच्या एकत्रित यादीवर नजर टाकली तर असं दिसतं की ती यादी तीनशे कलावंतांच्या पुढे जात नाही. एकट्या महाराष्ट्रातच १२००पेक्षा जास्त कलावंत आहेत. संपूर्ण भारतात ही संख्या दहा ते बारा हजार इतकी सहज भरावी. मग या कलावंतांनी करायचं काय? त्यांनी आपल्या कलाकृती विकायच्या तरी कशा? ‘कलाकीर्द’ ही ऑनलाईन डिरेक्टरी विशेषत: त्यासाठीच कार्य करणार आहे.

या सर्व उपक्रमांसाठीच ‘चिन्ह’ला कलावंतांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच ‘चिन्ह’ या ब्लॉगद्वारे महाराष्ट्रातील कलावंतांना जाहीर आवाहन करत आहे. ‘चिन्ह’च्या आगामी अंकाचं एक, अर्ध अथवा पाव पान प्रायोजित करा अथवा ‘चिन्ह’ला एक, अर्ध्या किंवा पाव पानाचं जाहिरात प्रायोजकत्त्व द्या.
१) ही जाहिरात आगामी नग्नता : चित्रातली आणि मनातली विशेषांकात प्रसिद्ध होईल.
२) ही जाहिरात त्याच शुल्कात आगामी ‘इंग्रजी’ आवृत्तीतही प्रसिद्ध होईल.
३) याच जाहिराती वरील दोन्ही अंकांच्या ‘ई मॅगझिन’ आवृत्तीतही त्यात शुल्कात प्रसिद्ध होतील.
४) याच जाहिराती ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरही वर्षभर प्रकाशित केल्या जातील.
५) जाहिरात प्रायोजकत्व स्वीकारणार्‍या कलावंतांच्या प्रत्येकी ६ कलाकृती ‘कलाकीर्द’ ऑनलाईन डिरेक्टरीत प्रदर्शित केल्या जातील.

‘चिन्ह’च्या अंकात दरवर्षी पंधरा वीसच स्टोरीज् प्रसिद्ध करता येतात. विषय खूप असतात पण पृष्ठ मर्यादेमुळे विषय खुणावत असूनही त्यांचा अंतर्भाव अंकात करता येत नाही. महाराष्ट्रातल्या कलावंतांची संख्याही खूप आहे. मग त्यांनाही ‘चिन्ह’शी कसं जोडता येईल? या विचारातून गतवर्षी प्राथमिक स्वरूपात ‘जाहिरात प्रायोजकत्व योजना’ सुरू झाली. यंदा त्या योजनेनं चांगलाच आकार घेतला आहे. या योजनेनुसार ‘चिन्ह’ची काही पानं या जाहिरात प्रायोजकत्व योजनेसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. कलावंतांना त्यात नाव, संपर्कासह आपल्या कलाकृती प्रसिद्ध करता येतील. या पानांचं स्वरूप एखाद्या प्रदर्शनाच्या कॅटलॉगसारखं असणार आहे. हा अंक किंवा ज्या अंकात ही पानं पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहेत तो इंग्रजी अंक ज्या कलारसिकाच्या, कलासंग्राहकाच्या हातात पडेल त्याला ज्या कलावंतांचं काम आवडलंय त्याच्याशी थेट संपर्क साधून त्याची कलाकृती मध्यस्थाविना विकत घेता येईल. जहांगीरसारख्या कलादालनाचं बुकिंग पाच पाच, सहा सहा वर्षं करता येत नाही. इतरत्रही प्रदर्शनासाठी कलावंतांना खेटे घालावे लागतात. या सार्‍याला ‘चिन्ह’नं हा एक अभिनव पर्याय उभा करून दिला आहे. आगामी अंकाची घोषणा होताच महाराष्ट्रातील चित्रकारांनी पहिल्या टप्प्यातच या पर्यायाला प्रतिसाद देवून जे भरघोस स्वागत केलं ते पाहता ‘चिन्ह’चा हा उपक्रमही मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरेल शी सु चिन्ह दिसत आहेत.

‘चिन्ह’ हे तद्दन व्यावसायिक नियतकालिक नव्हे. ‘चिन्ह’ही एका चित्रकारानं चित्रकार आणि चित्रकलेसाठी चालवलेली अभिनव चळवळ आहे. त्यामुळे ‘चिन्ह’ नुसत्या जाहिराती प्रसिद्ध करून थांबत नाही तर त्या कलावंतानं भरलेल्या शुल्कापोटी त्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सोयी - सुविधाही जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देऊ इच्छितं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या चित्रकारांना ‘चिन्ह’च्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर आवाहन!

अधिक माहितीसाठी मेल करा किंवा दूरध्वनीवरून थेट संपर्क साधा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------